विद्या बालनच्या अभिनयानं "जान' ( नवा चित्रपट - बेगम जान )

महेश बर्दापूरकर
शनिवार, 15 एप्रिल 2017

निर्मिती : मुकेश व विशेष भट 
दिग्दर्शन : श्रीजीत मुखर्जी 
भूमिका : विद्या बालन, नसिरुद्दीन शहा, पल्लवी शारदा, गोहर खान आदी. 
श्रेणी : 3.5 
 

"बेगम जान' हा चित्रपट देशाच्या फाळणीच्या वेळी घडलेल्या एका घटनेची गोष्ट सांगत तिला आजच्या काळाशी जोडतो, "वह सुबह हमीसे आयेगी,' असं सांगत महिलाशक्तीला सलामही करतो. भारत-पाक सीमेवरील एका कोठ्यामध्ये घडणाऱ्या कथेमध्ये नाट्य ओतप्रोत भरलेलं आहे आणि दिग्दर्शक श्रीजीत मुखर्जी यांनी ते नेटकेपणानं साकारलं आहे. विद्या बालनसह सर्वच कलाकारांचा बहारदार अभिनय, सुश्राव्य संगीत, छायाचित्रण या जमेच्या बाजू आहेत. पहिल्या प्रसंगापासूनच चित्रपटाची दिशा आणि शेवट स्पष्ट होत असल्यानं कथा अनेक ठिकाणी रेंगाळते, ही त्रुटी आहे. 

"बेगम जान'ची कथा स्वातंत्र्यपूर्व काळातील पंजाबमध्ये सुरू होते. एका गावाच्या बाहेर असलेल्या कोठ्याची मालकीण बेगम जान (विद्या बालन) आपली अम्मा (इला अरुण), रुबिना (गोहर खान), गुलाबो (पल्लवी शारदा) यांसह अनेक मुलींबरोबर राहात असते. मास्टर (विवेक मुश्रन) त्यांना मदत करीत असतो. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर कोठ्यामध्ये जल्लोष होतो, मात्र त्यापाठोपाठ फाळणीच्या बातम्या येऊ लागतात. फाळणीची रेषा बेगम जानच्या कोठ्याला भेदत जाणार असते. सरकारी अधिकारी (आशिष विद्यार्थी व रजत कपूर) तशी कल्पना बेगमला देतात. या संकटापासून वाचण्यासाठी बेगम राजाजींना (नसिरुद्दीन शाह) गळ घालते, मात्र खूप उशीर झालेला असतो. सरकारी अधिकारी कबीर (चंकी पांडे) या गुंडाला कोठा खाली करण्यासाठी सुपारी देतात. फाळणीच्या दंगलींच्या पार्श्‍वभूमीवर हा संघर्ष पेटतो आणि भळभळणारी जखम देऊनच शांत होतो. 

चित्रपटाची कथा फाळणीच्या अनेक जखमांपैकी एकावरील खपली काढून दाखवते. कथेमध्ये संघर्ष ठासून भरला आहे आणि तो दिग्दर्शकानं जिवंत केला आहे. त्याला आजच्या काळाची जोड देण्याचा प्रयत्नही कौतुकास्पद. मात्र, कोठ्यावरील मुलींच्या आयुष्याच्या कथा अधूनमधून येत राहतात व मूळ कथा मागं पडते. रुबिनाचं कोठ्यावरील हरकाम्याबरोबरचं नातं, गुलाबोचे मास्टरबरोबरचे प्रेमसंबंध ही उपकथानकं कथेचा वेग मंदावतात. सुरजित या पात्राचं कोठ्यावरील सगळ्या मुलांचा आवाज काढण्याचं कसब आणि त्याचा कथेच्या शेवटी करून घेतलेला उपयोग दाद देण्यासारखा. भारत व पाकचे सरकारी अधिकारी बोलत असताना त्यांच्यातील मतभेद दाखवण्यासाठी पडद्यावर त्यांच्या चेहऱ्याचा अर्धा-अर्धा भाग दाखवण्याचा प्रयोगही जमला आहे. अम्मा लहान मुलीला इतिहासातील वीरांगनांच्या गोष्टी सांगते, तेव्हा या प्रत्येक कथेमध्ये बेगम जानला दाखवण्याचा अट्टहास मात्र हास्यास्पद ठरतो. कबीरनं कोठ्यावर हल्ला केल्यावर चित्रपट वेग पकडतो आणि शेवटही हेलावून टाकतो. 

विद्या बालननं आपल्या अभिनयाच्या जोरावर हा चित्रपट एकहाती पेलला आहे. वेश्‍येची देहबोली, संवाद, तिचं कोठ्यावरील मुलींबद्दलचं ममत्व, समाजाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न आणि एका टप्प्यावर पेटून उठणं तिनं जबरदस्त साकारलं आहे. विद्या बालनच्या वाट्याला टाळ्या मिळवणारे अनेक संवादही आले असून, नसिरुद्धीन शाह यांच्याबरोबरची तिची अभिनयाची जुगलबंदी दाद मिळवून जाते. गोहर खान, इला अरुण, पल्लवी शारदा यांच्या वाट्याला आलेल्या भूमिका त्यांनी चोख बजावल्या आहेत. नसिरुद्दीन शाह, आशिष विद्यार्थी, रजत कपूर, चंकी पांडे यांनी छोट्या भूमिकांत जान ओतली आहे. चित्रपटाचं संगीत श्रवणीय असून, आशा भोसलेंच्या आवाजातील "प्रेममें तोहरे' व अरिजित सिंगच्या आवाजातील "मुरशिदा...' ही गाणी लक्षात राहतात. चित्रपटाचा लक्षात राहणारा शेवट करण्यात दिग्दर्शकाला यश आलं आहे. 

एकंदरीतच, फाळणीच्या काळातील हेलावून टाकणाऱ्या या कथेत विद्या बालनमुळंच जान आली आहे. 

Web Title: Begum Jaan Movie Review write mahesh bardapurkar