esakal | कलापूरनं घडवलं दिला मान-सन्मानही !
sakal

बोलून बातमी शोधा

कलापूरनं घडवलं दिला मान-सन्मानही !

अनेक दिग्गज कलाकारांबरोबर सध्या साथसंगत करतो. माझी ढोलकी अगदी आत्मविश्‍वासाने कडाडते आणि साऱ्यांना डोलवते; पण मी जे काही घडलो, ते कोल्हापुरात. या कलापूरनंच मला घडवलं आणि मान-सन्मानही मिळवून दिला...प्रसिद्ध ढोलकीपटू भार्गव कांबळे संवाद साधत असतो आणि एकूणच संघर्षातून फुललेली एक यशोगाथा उलगडत जाते. 

कलापूरनं घडवलं दिला मान-सन्मानही !

sakal_logo
By
संभाजी गंडमाळे

अनेक दिग्गज कलाकारांबरोबर सध्या साथसंगत करतो. माझी ढोलकी अगदी आत्मविश्‍वासाने कडाडते आणि साऱ्यांना डोलवते; पण मी जे काही घडलो, ते कोल्हापुरात. या कलापूरनंच मला घडवलं आणि मान-सन्मानही मिळवून दिला...प्रसिद्ध ढोलकीपटू भार्गव कांबळे संवाद साधत असतो आणि एकूणच संघर्षातून फुललेली एक यशोगाथा उलगडत जाते. 

भार्गव वारे वसाहत झोपडपट्टीत राहणारा. लहानपणीच वडिलांचे छत्र हरपले आणि देवदासी असणाऱ्या आईबरोबर मग तो दारोदार जोगवा मागत फिरू लागला. आईला मदत करताना तो चौंडकं वाजवण्यात माहिर झाला. या साऱ्या संघर्षाच्या प्रवासात शिक्षणमध्येच सुटलं; पण आईनं त्याला जाणीवपूर्वक तबला शिकायला घातले. मात्र, फीच्या पैशाअभावी तोही सोडावा लागला. मग, भजनी मंडळ ढोलकंवादनासाठी त्याला हक्काचे ठिकाण बनले. दरम्यान, शिवशाहीर राजू राऊत यांनी त्याची दोन वर्षांची फी भरली आणि महेश देसाई यांच्याकडे तबल्याच्या प्रशिक्षणासाठी त्याला पाठवले.

शाहिरांच्या कार्यक्रमातही तो सहभागी होऊ लागला. गीतकार जगदीश खेबुडकर यांच्या ‘गावरान मेवा’ या कार्यक्रमात पहिल्यांदा संधी मिळाली आणि झंकार ऑर्केस्ट्रामध्येही त्यानं काम केलं. पुढे सचिन कचोटे यांच्याकडे तबल्याचे प्रशिक्षण घेतले आणि सध्या प्रसिद्ध ढोलकीपटू पांडुरंग घोलकर (मुंबई) यांच्याकडे ढोलकीचे शिक्षणही सुरू आहे. याच दरम्यान सह्याद्री वाहिनीवरील ‘ढोलकी झाली बोलकी’ या रिॲलिटी शोमध्ये तो सहभागी झाला आणि साऱ्या महाराष्ट्रात त्याचा चाहतावर्ग तयार झाला. या रिॲलिटी शोमध्ये त्यांनं बाजी मारली.

त्याशिवाय ‘दादांची दुनियादारी’ या कार्यक्रमातही त्याचा सहभाग असतो. दूरचित्रवाणी वाहिनीवरील ‘एकदम कडक’ या कार्यक्रमातून त्यानं अख्ख्या महाराष्ट्राला डोलवलं. प्रसिद्ध ढोलकीपटू विजय चव्हाण यांच्याशी भार्गवनं चौंडक्‍याची रंगवलेली ही जुगलबंदी भल्याभल्यांना भुरळ घालणारी ठरली. उस्ताद झाकीर हुसेन, संगीतकार बाळ पळसुले, संजय गीते, विठ्ठल उमप, उषा मंगेशकर, उत्तरा केळकर, वर्षा उसगावकर, सुरेश वाडकर आदींना भार्गवनं आजवर साथसंगत केली आहे. अनिष प्रधान आणि शुभा मुदगल यांच्या ग्रुपमधून त्याच्या तबला, ढोलकी आदी वाद्यांचा ताल आता साऱ्या देशभर घुमतो आहे. भार्गव सांगतो, ‘‘लोककला जपण्यासाठी माझ्या परीनं जितका प्रयत्न करता येईल, तेवढा प्रामाणिकपणे करतो आहे. अर्थात कोल्हापूरचं पाठबळ नेहमीच माझ्या पाठीशी राहिलं आहे.’’

loading image