भाऊ कदमांचा दिवस सर्वसामान्यांसारखाच! 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 24 April 2020

वीकएण्डला चित्रपट पाहणे किंवा दूरवर लांब फिरायला जाणे मी टाळतो. माझे संपूर्ण कुटुंब शनिवारी किंवा रविवारी चित्रपट पाहायला जाते. अगदी सर्वसामान्य माणसाचा जसा वीकएण्ड असतो, तसाच माझाही असतो.

माझ्या नाटकाचे प्रयोग शनिवारी आणि रविवारी असतात. त्यामुळे सहसा मला वेळ मिळत नाही. मात्र, वेळ मिळाल्यावर मी माझ्या संपूर्ण कुटुंबाबरोबर फिरायला जातो. सध्या मी ठाण्यात राहत आहे आणि येथील तलाव पाळीला फिरायला जातो. त्यातच माझ्या नाटकाचा प्रयोग ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे असल्यास माझी मुले कधी कधी नाटक पाहायला येतात. ती नाटक पाहायला आली नाहीत, तर मी त्यांना तलाव पाळीला फिरायला या असे सांगतो.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नाटक संपल्यानंतर मी त्यांना जॉईन होतो. मग घोडागाडीची रपेट मारणे आणि चमचमीत काही तरी खाणे आलेच. अर्थात, तेथे मला काही चाहते गराडा घालतात. फोटो किंवा सही मागतात. त्यांच्यातून मार्ग काढणे कठीण होते, पण कसाबसा घोडागाडीत बसतो. वेळ अधिक झाल्यास हॉटेलात जेवायला जातो. मात्र, हॉटेलात कधी जायचे आणि कोणत्या हॉटेलात जायचे हा सर्वस्वी निर्णय माझी मुले घेतात. त्यांना ठाण्यामध्ये कुठे काय चांगले मिळते, हे ठाऊक आहे. त्यामुळे आम्ही कधी कधी हॉटेलात जाण्याचा बेत आखतो. रविवारी सकाळी बाजार आणण्याची माझी किंवा माझ्या भावाची वेळ असते. मी नाटक आटोपून उशिरा आलो असलो, तर माझी पत्नीही बाजार आणायला जाते. रविवारी काही नातेवाईक मंडळी आमच्या घरी येतात आणि त्यांना मलाच भेटायचे असते. नाटक नसल्यास मी त्यांना भेटतो. अनेकदा दुपारच्या जेवणाचा बेत त्यांच्याबरोबर असतो. मात्र, वीकएण्डला चित्रपट पाहणे किंवा दूरवर लांब फिरायला जाणे मी टाळतो. कारण चाहत्यांचा गराडा पडतो आणि सगळा वेळ त्यातच जातो. त्यामुळे माझे संपूर्ण कुटुंब शनिवारी किंवा रविवारी चित्रपट पाहायला जाते. अगदी सर्वसामान्य माणसाचा जसा वीकएण्ड असतो, तसाच माझाही असतो. 

मनोरंजन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhau kadam day is the same as usual