'घरौंदा' सिनेमाचे दिग्दर्शक भीमसेन खुराना यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 एप्रिल 2018

'घरौंदा', 'एक अनेक एकता' यासारख्या सिनेमांसाठी भीमनेस खुराना यांना ओळखलं जाई. 'एक अनेक एकता' मध्ये 'एक चिड़िया, अनेक चिड़िया' हे बच्चे कंपनीचं पॉप्युलर गाणं होतं.

मुंबई : 'एक चिड़िया, अनेक चिड़िया' हे प्रसिद्ध अॅनिमेटेड गाणं बनवणारे भीमसेन खुराना यांचे मुंबईत एका रुग्णालयात वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. त्यांना अॅनिमेशन लघुपटांसाठी अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. 

खुराना यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. काल रात्री जुहू येथील एका रुग्णालयात उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी नीलम आणि हिमांशु व किरीट खुराना ही दोन मुले आहेत. 

'घरौंदा', 'एक अनेक एकता' यासारख्या सिनेमांसाठी भीमनेस खुराना यांना ओळखलं जाई. 'एक अनेक एकता' मध्ये 'एक चिड़िया, अनेक चिड़िया' हे बच्चे कंपनीचं पॉप्युलर गाणं होतं. दूरदर्शनचा सुवर्णकाळ सुरू होता तेव्हापासून खुराना दूरदर्शनसाठी काम करत होते. टीव्ही आणि सिनेमे अशा दोन्ही जगतात त्यांनी आपल्या प्रतिभेचा ठसा उमटवला होता. 

खुराना यांचा जन्म १९३६ मध्ये मुल्तान येथे झाला होता. त्यांनी फाइन आर्ट्स आणि शास्त्रीय संगीत या विषयांत लखनऊ विद्यापीठातून पदविका घेतली होती. १९७० मध्ये 'द क्लाइम्ब' या अॅनिमेशन लघुपटाद्वारे त्यांनी दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं. या लघुपटाला शिकागो फिल्म फेस्टिव्हलमध्ये सिल्व्हर ह्युगो पुरस्कार मिळाला होता. 

'एक चिड़िया, अनेक चिड़िया' हे सुप्रसिद्ध गाणं खुराना यांच्या 'एक अनेक एकता' या अॅनिमेशन लघुपटातलं आहे. विजय मलय यांच्यासोबत खुराना यांनी हे गाणं बनवलं होतं. हा अॅनिमेशन पट १९७४ साली प्रदर्शित झाला होता. त्यांनी अनेक अॅनिमेशनपट तसेच जाहिराती बनवल्या. 'ना', 'एक दो', 'फायर', 'मुन्नी', 'फ्रीडम इज ए थिन लाय', 'मेहमान', 'कहानी हर जमाने की', 'बिझनेस इज पीपल' या अॅनिमेशन पटांचा समावेश आहे. 

१९७६ मध्ये त्यांनी 'घरौंदा' या सिनेमाचं दिग्दर्शन केलं. या सिनेमाची पटकथा गुलजार यांची होती. अमोल पालेकर आणि झरिना वहाब यांनी या सिनेमात भूमिका केली होती. १९८५ मध्ये खुराना पुन्हा 'छोटी बडी बातें' द्वारे टेलिव्हिजनकडे वळले. त्यांनी अनेक माहितीपटही बनवले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bhimsen khurana director of movie gharounda expired