बॉलिवूड अभिनेता इम्रान खानचा चित्रपटसृष्टीला रामराम; मित्राने केला खुलासा

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 18 November 2020

बॉलिवूडमध्ये गेल्या काही वर्षामध्ये कलाकारांकडून अभिनय क्षेत्र सोडण्याचं प्रमाण वाढताना दिसत आहे. आता आमिर खानचा भाचा इम्रान खान यानेही अभिनय क्षेत्र सोडलं आहे.

मुंबई - बॉलिवूडमध्ये गेल्या काही वर्षामध्ये कलाकारांकडून अभिनय क्षेत्र सोडण्याचं प्रमाण वाढताना दिसत आहे. आता आमिर खानचा भाचा इम्रान खान यानेही अभिनय क्षेत्र सोडलं आहे. याबाबतची माहिती त्याचा मित्र अक्षय ओबेरॉयने एका मुलाखतीवेळी दिली. खरंतर गेल्या 5 वर्षांपासून इम्रान खान कोणत्याच चित्रपटात दिसलेला नाही. 2008 मध्ये त्याने जाने तू या जाने ना या चित्रपटातून पदार्पण केलं होतं. 

अक्षय ओबेरॉयने नवभारत टाइम्सला मुलाखत देताना म्हटलं की, माझा मित्र इम्रानने अभिनय करणं बंद केलं आहे. गेल्या 18 वर्षांपासून आम्ही एकमेकांना ओळखतो. इम्रान एक चांगला लेखक आणि दिग्दर्शक होऊ शकतो. पण त्यानं दिग्दर्शनात उतरावं यासाठी त्याच्यावर कोणता दबाव आणणार नाही. त्याला जे करावं वाटतं ते त्यानं करावं असं मतही अक्षयने यावेळी व्यक्त केलं. 

हे वाचा - कतरिना कैफच्या 'चिकनी चमेली'वर हृतिक रोशनचा बुक्क्यांचा मार पाहिलात का? हसून व्हाल लोटपोट

इम्रान खान याआधी त्याच्या खासगी आयुष्यामुळे बराच काळ चर्चेत होता. त्याची पत्नी अवंतिका मलिक हिच्याशी घटस्फोट घेणार असल्याची चर्चा होती. मात्र ही चर्चा अवंतिकाच्या आईने फेटाळून लावली होती. घटस्फोटाची चर्चा खोटी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. 2011 मध्ये इम्रान आणि अवंतिका यांनी लग्न केलं होतं. त्यांना इमारा नावाची एक मुलगीसुद्धा आहे.

2008 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या इम्रानने याआधीचा चित्रपट 2015 मध्ये केला होता. कट्टी बट्टी या सिनेमातून तो पडद्यावर दिसला होता. त्यानंतर एकाही चित्रपटात त्यानं काम केलेलं नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bollywood actor imran khan quit acting says akshay oberai