'या' मराठी चित्रपटाचा होणार हिंदी 'रिमेक', बॉलिवूडची 'ही' अभिनेत्री साकारणार मुख्य भूमिका

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 31 May 2020

'ड्रीम गर्ल' यांसारख्या चित्रपटांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यानंतर आता तिच्या एका नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.

मुंबई : अभिनेत्री नुसरत भारूचाला 'प्यार का पंचनामा' चित्रपटापासून नावलौकिक मिळाला. त्यानंतर तिने 'प्यार का पंचनामा 2', सोनू के टिटू की स्विटी', 'ड्रीम गर्ल' यांसारख्या चित्रपटांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यानंतर आता तिच्या एका नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. चित्रपटाचे नाव 'छोरी' असे आहे. हा हॉरर चित्रपट आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट तीन वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'लपाछपी' या मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या मराठी चित्रपटात अभिनेत्री पूजा सावंतने मुख्य भूमिका साकारली होती.

नक्की वाचा : 'या' दिग्दर्शकाच्या अनाथ आश्रमात १८ मुलांना झाली कोरोनाची लागण

पूजा सावंतसह अभिनेता विक्रम गायकवाड, अनिल गवस व उषा नाईक हे कलाकारही या चित्रपटात होते. हा थरारक असा रहस्यपट होता. आता या चित्रपटाचा हिंदी रिमेक बनत आहे आणि या रिमेकमध्ये नुसरत मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल फुरिया यांचे असणार आहे. विशालने या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. कथा व पटकथा विशाल फुरिया व विशाल कपूर यांची होती. छोरी चित्रपटाचे संवाद विशाल कपूर यांनी लिहिले असून साइक प्रॉडक्शन्स या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. 

महत्वाची बातमी : कटिंगला जायचे आहे? खिशालाही मोठी कात्री बसणार! काय असतील संभावित दर; वाचा

अभिनयाचा कस लागणार
नुसरतने तिच्या सोशल मीडियावर या चित्रपटाच्या नावाचा फोटो शेअर करत याची माहिती दिली आहे. नुसरत म्हणते की, माझ्या अभिनयाचा अनोखा अंदाज तुम्हाला या चित्रपटात पाहायला मिळेल. यातील माझी भूमिका आतापर्यंत केलेल्या भूमिकांपेक्षा वेगळी आहे आणि माझ्या अभिनयाचा कस लागणार आहे.

Bollywood news chori Hindi remake of Marathi movie This actress is in the lead role


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bollywood news chori Hindi remake of Marathi movie This actress is in the lead role