
Brahmastra चा धमाका सुरु असतानाच अयान मुखर्जीचा 'ब्रह्मास्त्र 2' विषयी मोठा खुलासा
Brahmastra part 2: दिग्दर्शक अयान मुखर्जीच्या सिनेमानं बॉक्सऑफिसवर धमाका केलेला आपण सर्वांनी पाहिलाच असेल. सिनेमा १०० करोडच्या क्लबमध्ये सामिल झाला आहे. आणि आशा आहे की लवकरच तो २०० करोडची कमाई करण्यातही यशस्वी ठरेल. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट,मौनी रॉय,अमिताभ बच्चन,शाहरुख खान,नागार्जुन यांच्या भूमिका असलेल्या ब्रह्मास्त्रला प्रेक्षक तसंच समिक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. पण असं असलं तरी बॉक्सऑफिसवर मात्र ब्रह्मास्त्रची घोडदौड चांगली सुरु आहे आणि मुळात प्रेक्षकवर्ग सिनेमाच्या दुसऱ्या भागाविषयी उत्सुक असलेले पहायला मिळत आहेत. यादरम्यान आता ब्रह्मास्त्र पार्ट २ 'देव' च्या रिलीज संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. (Brahmastra part 2 Dev' New Update From Ayan Mukerji in latest interview)
ब्रह्मास्त्रच्या पहिल्या पार्टला बनवण्यासाठी जवळपास ८ वर्ष लागली. पण असं असलं तरी म्हणतायत की ब्रह्मास्त्रचा दुसरा पार्ट मात्र प्रेक्षकांच्या भेटीस लवकर येणार आहे. अयान मुखर्जी याने नुकत्याच एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत याविषयी खुलासा करत म्हटलं आहे की,''सध्या मी 'ब्रह्मास्त्र पार्ट २ देव' विषयी खूप जास्त काही सांगू शकत नाही. पण देव मध्ये भूतकाळ,वर्तमानकाळ दोन्ही दाखवले जाणार आहेत.
ब्रह्मास्त्र पार्ट २ च्या कलाकारांविषयी प्रश्न विचारताच अयान म्हणाला,''सिनेमाचा पहिला भाग फक्त फाऊंडेशन होतं,स्टोरी सेटअपसाठी. पण असं असलं तरी या नवीन भागात देव कोण साकारणार हे मी सांगू शकत नाही. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा घोषणा होईलच. पार्ट २ चं कथानक तेव्हापासून तयार आहे जेव्हापासून पहिल्या भागाचं काम सुरू होतं. यावेळी सिनेमाच्या प्रॉडक्शनवर काम करण्याची प्रोसेस कदाचित लांबेल''.
मुलाखती दरम्यानच अयान म्हणाला की,''ब्रह्मास्त्रच्या दुसऱ्या भागावर तेव्हा काम सुरू होईल जेव्हा पहिल्या भागावरचं सगळं काम संपेल. आणि आमची टीम म्हणेल की,चला आता सुरु करुया नवीन भागावर काम. आमचा प्रयत्न असेल की पार्ट २ डिसेंबर २०२५ मध्ये रिलीज करावा. अयाननं इतकं सगळं सांगितलं तरी राहून राहून गाडी मात्र थांबतेय ती सिनेमात देव आणि अमृता ही दोन मुख्य पात्र कोण रंगवणार? अद्याप यावर अधिकृत अशी कोणतीच माहिती समोर आलेली नाही.