सेलिब्रिटी वीकएण्ड : गर्दीपासून दूर जातो...

सेलिब्रिटी वीकएण्ड : गर्दीपासून दूर जातो...

अमेय वाघ, अभिनेता
अभिनय क्षेत्रामध्ये असल्याने अनेक कलाकारांना स्वतःसह कुटुंबीयांसाठी वेळ देता येत नाही. मला नाटकांचे प्रयोग असल्याने वीकएण्डचे प्लॅनिंग नेहमीच फसते. नाटकाचे प्रयोग पुणे, मुंबईसह कोकण, विदर्भ व मराठवाड्यात होतात. त्यामुळे शनिवार, रविवार नाटकांमध्येच जातो. मात्र रंगभूमीवर नाटक सादर केल्यानंतर प्रेक्षकांचा जो प्रतिसाद मिळतो, तो खूपच प्रेरणादायी असतो. त्यामुळे आपल्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. नवनवीन काहीतरी शिकायला मिळते. त्यानिमित्तानं वेगवेगळ्या शहरांमध्ये जाणं होतं. तिथं थोडंफार फिरणंही होतं. 

मला वेळ मिळतो, त्या वेळी मी बायकोबरोबर फिरायला जातो. अशावेळी मोबाईल बंद ठेवतो. कारण मोबाईल सुरू राहिल्यास चित्रीकरण, नाटकाचे प्रयोग, चाहत्यांचे फोन सुरूच असतात. त्यातच सोशल मीडियाकडंही नकळत लक्ष जातं. त्यामुळं बायकोला वेळही देता येत नाही. म्हणूनच आम्ही अशाच ठिकाणी जातो, जिथं मोबाईलला रेंजच नसते! त्यामुळं एकमेकांसाठी वेळ देता येतो. मला निसर्गाच्या ठिकाणी फिरायला खूप आवडतं. पुण्याजवळच अहिरे हे आमचं गाव आहे. तिथं आमची जमीन, घर अन् मंदिरही आहे. अनेकदा आम्ही गावी जातो अन् कुटुंबीयांसमवेत मौजमजा करतो. त्यानिमित्तानं गावाशीही संपर्क ठेवता येतो. अनेकदा विकएण्डला नावाजलेल्या ठिकाणी गेल्यास प्रायव्हसी मिळत नाही. अनेक जण ओळखीचे भेटतात. त्यामुळं कुटुंबाला वेळ देता येत नाही. त्यामुळं आम्ही फिरण्यासाठी कमी गर्दीचं ठिकाणच निवडतो. वर्षातून एक-दोनदा परराज्यांत किंवा परदेशातही फिरायला जातो. त्यामुळं तेथे नवनवीन माहिती मिळते. परिणामी, मन आनंदित होते. 

कॉलेजला असताना आम्ही मित्रमंडळी खूप मजा करत होतो. त्या वेळी फारशी बंधन नव्हती. त्या वेळची एक अविस्मरणीय आठवण आहे. मी त्या वेळी नवीन बाइक घेतली होती. मला ती चालवून पाहायची होती. त्यासाठी सिंहगड हे ठिकाण निवडलं. मित्र-मंडळींसमवेत आम्ही सिंहगडाच्या पायथ्याजवळ गेलो. त्यानंतर गडावर चढू लागलो. आम्ही लिंबू सरबत, दही, पिठलं-भाकरीवर ताव मारला. त्या काळात कॉलेज करत असल्यानं आमच्याकडं फारसे पैसेही नसायचे. म्हणून शेअरिंगमध्ये आम्ही या सर्व गोष्टी करत होतो. त्याचप्रमाणं खडकवासला धरण परिसरामध्ये फिरून फार्म हाउसवर राहत होतो. आम्ही दिवसभर सिंहगडावर फिरलो आणि खाली उतरताना खूप अंधार झाला. त्यामुळं खाली येताना आम्हाला खूप भीती वाटत होती. त्यातच एवढ्या रात्रीची बाइक चालवायची सवयही नव्हती. पण तो दिवस आम्ही कधीच विसरू शकत नाही. अशा अनेक गोष्टी आहेत, त्या माझ्यासाठी अविस्मरणीय आहेत.

(शब्दांकन - अरुण सुर्वे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com