चला, मराठी सिनेअभिनेत्रींची बुकिंग सुरू!

सोमवार, 18 सप्टेंबर 2017

हा मथळा वाचून चपापलात ना..? पण अशा मथळ्याची पोस्टर्स सध्या व्हायरल होतायत. नवरात्री, दसरा, दिवाळी आदींच्या कार्यक्रमाला कलाकारांना मागणी असते हे ताडून अनेकांनी स्वत: ला कलाकारांचे एजंट मानायला सुरूवात केली आहे. आणि हे असे मथळे देऊन कलाकारजगताची पब्लिक प्राॅपर्टी बनवली आहे. विशेष बाब अशी की याची काहीच कल्पना संबंधित कलाकारांना देण्यात आलेली नाही. 

नवरात्र, दिवाळी आदी उत्सवांच्या पार्श्वभूमीवर फसवेगिरीला ऊत

पुणे : श्रावण, दहीहंडी, नवरात्री, दिवाळी आदि उत्सवांमध्ये लोकांना कलाकारांना पाहायचं असतं. वेगवेगळ्या इव्हंंटसमध्ये कलाकारांची त्यातही अभिनेत्रींची असलेली उपस्थिती ही आयोजकांसाठी चर्चेचा विषय असतो. कलाकारांना घेतलं की त्या इव्हेंटला गर्दी खूप होईल असा कयास आयोजकांनी बांधलेला असतो. बऱ्याचदा हे आयोजक इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांशी याबाबत चर्चा करतात. काहीवेळी कलाकारांशी जोडणाऱ्या एजन्सीज असतात. आता मात्र कलाकारांच्या नावाखाली लोकांना फसवण्याचा धंदा तेजीत आला आहे. संबंधित कलाकारांना कोणतीही माहिती न देता, त्यांचे फोटो छापून संपर्कासाठी स्वत:चा काॅंटॅक्ट नंबर द्यायची फसवेगिरी चालू आहे. फेसबुकवर अशाच एका बनावट एजंटला सिनसृष्टीतील काही मान्यवरांनी जाब विचारल्यावर त्याने आपल्या 'दुकानाचे' शटर डाऊन केलं. 

मराठी चित्रपटसृष्टीतील मान्यवरांच्या लक्षात हा प्रकार आला आहे. दिवाळी, नवरात्रीसाठी मराठी-हिंदी कलाकारांना बोलवा. तुमच्या हातातील स्मार्टफोन घ्या आणि लगेच व्हाॅटसअॅप करा असं सांगत त्याचे रीतसर एक पत्रकच तयार करण्यात आलं आहे. या पोस्टर वजा पत्रकावर क्रांती रेडकर, अलका कुबल. तेजस्विनी पंडीत, सोनाली कुलकर्णी, उर्मिला कानेटकर, स्मिता गोंदकर, मुक्ताा बर्वे, सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर, नेहा महाजन आदी नायिकांचे फोटो बिनदिक्कत त्यांच्या परवानगी शिवाय छापण्यात आले आहेत. पुण्याचा पत्ता असलेल्या अर्जुन नोटके या इसमाच्या या दुकानदारीवरून या चर्चेला उधाण आले. पैकी काहींनी त्याला फोन करून खडसावल्यानंतर फोटो लावण्यासाठी परवानगी घ्यावी लागत असल्याची कल्पना आपल्याला नव्हती असं सांगितलं आहे. त्यानंतर लगेच त्याने आपल्या अकाऊंटवर शटर ओढलेले फोटो टाकले आहेत. 

हा प्रकार अत्यंत नींदनीय असल्याची प्रतिक्रीया मराठी सिनजगतातून उमटली आहे. कुणी किती पैसे घ्यावेत आणि कुणी कुणाला बोलवावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण पब्लिक प्राॅपर्टी असल्यागत जो हा प्रकार सुरू आहे तो थांबायलाच हवा असं यापैकी काहींचं म्हणणं आहे. या प्रकाराला आळा बसायला हवा असंही काहींनी बोलून दाखवलं. याबाबत अर्जुन नकोटे यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क साधला असता हा नंबर बंद होता. 

आता मराठी चित्रपटसृष्टीचे कैवारी असणारे चित्रपट महामंडळ याकडे कशापद्धतीने पाहाते ते औत्सुक्याचे ठरणार आहे. 

 

Web Title: cheating in marathi film industry esakal news