Fact check : 'छपाक' मध्ये ऍसिड हल्ला करणाऱ्या आरोपीचा बदलला धर्म ?

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 जानेवारी 2020

नुकताच #boycottchhapaak असा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड करण्यात आला. तिचा आगामी 'छपाक' चित्रपट कोणीही बघू नका असे आवाहन सोशल मीडियावर केले जात आहे.हा शिवाय चित्रपटातील मालती अग्रवाल (दीपिका पदुकोन) हिच्यावर ऍसिड हल्ला करणाऱ्या आरोपीचं नाव 'राजेश' असं दाखविण्यात आल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु होती.

मुंबई : जेएनयुमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या हणामारीचा निषेध देशभरातून होत असतानाच, बॉलिवूडची मंडळीही या आंदोलनात सक्रिय सहभाग घेताना दिसत आहेत. अशातच 'छपाक'गर्ल दीपिका पदुकोन काल (ता. 7) थेट जेएनयुमध्ये पोहोचली. तिच्या या आंदोलनात सहभागी होण्यावरून सोशल मीडियावर तिला ट्रोल करण्यात येत आहे. #boycottchhapaak असा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड करण्यात आला. तिचा आगामी 'छपाक' चित्रपट कोणीही बघू नका असे आवाहन सोशल मीडियावर केले जात आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाला एक दिवस राहिला असून त्याच्या रिलिज होण्यासाठी सोशल मीडियावर आक्षेप घेतला जातोय. 

हा वाद इथेच थांबला नसून चित्रपटावर आणखी एक आरोप केला जात आहे. चित्रपटातील मालती अग्रवाल (दीपिका पदुकोन) हिच्यावर अॅसिड हल्ला करणाऱ्या आरोपीचं नाव 'राजेश' असं दाखविण्यात आल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु होती. पण, जिच्यावर हा हल्ला झाला आहे ती लक्ष्मी अग्रवालच्या आरोपीचं खरं नाव नदीम खान असं होतं. 

काय झाले ?
त्यामुळे अनेकांनी हे नाव का बदलण्यात आलं आहे ? असा सवाल केला. शिवाय धर्माचं नाव जोडून आरोपीचं नाव हिंदू करण्यात आलं आहे यावर आक्षेप घेण्यात आला. पुराव्याअभावी हे आरोप सोशल मीडियावर करण्यात आले आणि चित्रपट बॉयकॉट करण्याचा ट्रेंड करण्यात आला. भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनीही एक ट्विट केले ज्यामध्ये त्यांनी लिहिलं, "चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्माते दीपिका पदुकोन यांना एक कायदेशीर नोटीस तयार करत आहे. जर, चित्रपटात मुस्लिम आरोपीचं नाव बदलून हिंदू ठेवण्यात आलं असेल तर ही नोटीस पाठविण्यात येईल. ही बदनामी आहे.''

हे आहे सत्य...
'स्वराज' नावाच्या मॅगझीनमध्ये चित्रपटात मुस्लिम आरोपीचं नाव हिंदू करण्यात आलं असल्याची माहिती देण्यात आली होती. हा एका प्रकारचा अजेंडा असल्यातचा उल्लेख त्यांनी केला. ही माहिती सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आणि लोकांनी हाच मुद्दा धरुन लावला. शिवाय सिनेमा बॅन करण्याचा ट्रेंड केला.

न्यूजलॉन्ड्री चे सीईओ अभिनंदन सेखरी यांनी याविषयीचे एक महत्त्वपूर्ण ट्विट केले. त्यांनी लिहिलं, "मी चित्रपटाचं स्क्रिनींग पाहिलं आहे. त्यामध्ये आरोपीचा धर्म बदलण्यात आलेला नाही.'' मीडियाशी बोलताना त्यांनी हेही सांगितले की आरोपीचं नाव चित्रपटामध्ये बशीर उर्फ बाबू करण्यात आलं आहे. लक्ष्मी अग्रवालच्या आरोपीचं नाव नईम खान होतं आणि त्याला गुड्डू या नावाने बोलवत असत. त्यामुळे राजेश या नावाचा करण्यात आलेला दावा खोटा आहे. पत्रकार राधिका शर्मानेही हा दावा खोटा असल्याचं सांगितलं आहे. 

 

'छपाक' वादाच्या भोवऱ्यात अडकला असून आता मात्र कोर्टाकडून त्याला दिलासा मिळाला आहे. वकील अपर्णा भट्ट यांनी चित्रपटाविरोधात याचिका दाखल केली होती. अॅसिड हल्ला पिडीत लक्ष्मी अग्रवालची केस त्यांनी अनेक वर्षे लढली. सिनेमाच्या दिग्दशकांनी चित्रपटामध्ये अपर्णा यांना योग्य क्रेडिट देण्याचं आश्वासन दिलं होतं. पण, चित्रपटाच्या प्रिमिअरमध्ये तसे झाले नाही म्हणूनच अपर्णा यांनी चित्रपटाच्या रिलिजवर आक्षेप घेतला. अखेर पटियाला हाऊस कोर्टने चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांना क्रेडिट देण्याचे आदेश दिले असून प्रदर्शना कोणत्याही प्रकारचा रोख नसल्याचा निर्णय दिला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Chhapaak movie the religion of acid attack convict has been changed fact check