सिनेमा हा राजकारणाचाच विस्तार आहे : शालिनी ठाकरे; 'लव्ह सोनिया' सिनेमानिमित्त गप्पा...

रविवार, 2 सप्टेंबर 2018

'लव्ह सोनिया' हा सिनेमा येत्या 14 सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे. देहविक्री आणि मानवी तस्करीची दाहकता मांडलेला हा सिनेमा आहे. सिनेमानिमित्त सिनेमाच्या निर्मात्यांपैकी एक शालिनी ठाकरे यांनी 'सकाळ' प्रतिनिधीशी साधलेला संवाद...

देहविक्री आणि मानवी तस्करीची दाहकता मांडलेला सिनेमा 'लव्ह सोनिया' 14 सप्टेंबरला प्रदर्शित होण्यास सज्ज आहे. याच निमित्ताने सिनेमाच्या निर्मातीची जबाबदारी स्वीकारणाऱ्या शालिनी ठाकरे यांनी 'सकाळ' प्रतिनिधीशी साधलेला संवाद...

1) मानवी तस्करी सारखा संवेदनशील आणि तितक्याच गंभीर विषयावरील सिनेमासाठी निर्माती म्हणून काम करावं हा विचार कसा आला? 
- मुळात हा विषय जनतेसाठी नवीन नाही. या विषयावर आधीही विविध भाषेत सिनेमे येऊन गेले आहेत. 'लव्ह सोनिया'मध्ये दाखविण्यात आलेली परिस्थिती तर काही जणांनी अनुभवलीही असेल. फक्त सिनेमा म्हणून नाही तर जे या विषयासंबंधी घडतं तसंच मला लोकांसमोर मांडायचं होतं. जे या सिनेमात मांडलं आहे. फक्त भारतातच नाही तर परदेशातही देहविक्री आणि मानवी तस्करीचं मोठं रॅकेट आहे. आपल्याकडील बऱ्याच लोकांचा हा गैरसमज आहे की देहविक्री आणि मानवी तस्करी याचा बाजार भारतातच मोठ्या प्रमाणात आहे. हा गैरसमज या सिनेमातून दूर होईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी महिला कल्याण आणि सक्षमीकरण या क्षेत्रात काम करते म्हणून या विषयावर सिनेमाद्वारे काम करण्यासाठी मनाची वेगळी तयारी करावी लागली नाही. 

2) याविषयावर काम करण्यासाठी काही नियोजन होते की हा विषय ओघाने तुमच्याकडे आला?  
- मनोरंजन क्षेत्रात माझी स्वतःची प्रोडक्शन कंपनी आहे. मला हा विषय सिनेमातून लोकांसमोर आणायचा होता. कारण सिनेमा हे खुप प्रभावी आणि मोठं प्लॅटफॉर्म आहे. तबरेज यांच्याकडे या विषयावर पक्की स्टोरी होती. तरबेज यांना महिला कल्याण आणि सक्षमीकरण या क्षेत्रातलं माझं काम माहित होतं. त्यामुळे त्याने 'लव्ह सोनिया'साठी विचारल्याबरोबर मी सकारात्मकता दाखवली. असं आम्ही दोघंही या कामासाठी एकमेकांना पुरक होतो.

3) सिनेमाचे दिग्दर्शक तबरेज नुरानी यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?
- मी सुध्दा याच क्षेत्रासाठी काम करते. पण गेल्या 13 वर्षापासून तबरेज यांचा या विषयावर अभ्यास सुरु आहे. त्यामुळे विषयाचे बारकावे हे आम्हाला त्यांच्या अभ्यासातून कळले. त्यांनी सिनेमातून मांडलेली परिस्थिती माहित होती पण त्याचे पैलू तबरेज यांनी उलगडून परिस्थितीचे बारकावे टिपले. त्यांनी या सिनेमासाठी जे काम केलंय त्याच्यावर ते ठाम होते. म्हणून आमच्या संपूर्ण टिमचा त्यांच्यावर खुप विश्वास आहे आणि त्यांच्या विश्वासावर विश्वास ठेऊनच आम्ही सगळ्यांनी काम केलं.  

4) 'लव्ह सोनिया'च्या स्क्रिप्टमध्ये हे फायनल करायचं असं का वाटलं? 
- हा विषय आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचा आहे. पण स्क्रिप्ट वाचून नवीन गोष्टी उलगडल्या. ज्या आतापर्यंत लोकांसमोर नीट मांडल्या गेल्या नाहीत. विषयाबद्दल अर्धवट माहितीच फक्त आजपर्यंत पसरली आहे. म्हणून लोकांपर्यंत हे जाणं गरजेचं आहे असं वाटलं. ही कथा दुष्काळाचं सावट असलेल्या मराठवाड्यातून सुरु होते तर ते पार हाँगकाँग आणि ऐले पर्यंत जाते... एक 17 वर्षाची मुलगी या कथेचा हिरो आहे. अशा मुली खऱ्या आयुष्यातही आहेत. त्या संघर्ष करत आहे, जगत आहे... त्यामुळे लोकांना फक्त ज्ञान देणे नाही तर एक गोष्टं सांगतोय या उद्देशाने स्क्रिप्टची रचना होती, जी मला आवडली. 

5) सिनेमात भारत आणि परदेशातील मानवी तस्करी विषयी दाखवलं आहे. या सगळ्यासाठी बराच अभ्यास करावा लागला असेल. तर या प्रक्रियेत तुम्ही होतात का? काही फॅक्ट्स तुमच्या नजरेत आलेत का?
- या सिनेमासाठी काम करण्याचा माझा उद्देश हा होता की या विषयाबद्दल लोकांमध्ये जागृकता झाली पाहिजे. जी मला कमी वाटते. माझं राजकारणातलं काम महिलांच्या बाबतीत जास्त असल्यानं मी आपोआप या प्रक्रियेत जुळत गेले. फॅक्ट्स म्हणाल तर देहविक्री आणि मानवी तस्करी किती मोठ्या प्रमाणात होते याची गंभीरतेचा अंदाजच लोकांना नाही आहे. देशात सतरा महिन्यात 32 हजार मुली-महिला गायब झाल्याचा आकडा समोर आला. पण यावर सरकारची काही भुमिकाच नाही. या घटनेवर कुणाचं विशेष लक्षंच नाही. म्हणून यावर सगळ्यांचं लक्षं वेधायचं असेल ज्या प्लॅटफॉर्मला लोक सगळ्यात जास्त पसंती दाखवतात त्या प्लॅटफॉर्मवरुन असे विषय मांडणे गरजेचं वाटतं. 

6) सिेनेमाचा ट्रेलर सध्या लोकांच्या खुप पसंतीस पडत आहे. याविषयी काय सांगाल?
- ट्रेलर प्रदर्शित झाला आणि लोकांच्या पसंतीचा बार उडाला. खरंतर इतक्या कमी वेळात ट्रेलरला इतका भरभरुन प्रतिसाद मिळेल असं वाटलं नव्हतं. पण या प्रतिसादाने मी खुप भारावले आहे आणि जबाबदारीतही वाढ झाली आहे असं मी म्हणेन. सोशल मिडीयावर मी बघितलं की तरुणवर्ग किती मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत आहे. कौतुक करत आहे. यावरुन तरी मला असं वाटतं की आपला प्रेक्षकवर्ग अशा प्रकारच्या कन्टेन्टसाठी खरच तयार आहे. विशेषतः तरुणवर्ग. 

7) या सिनेमाच्या निमित्ताने बॉलिवूडमध्ये आंतरराष्ट्रीय कलाकारांना सोबत घेऊन काम करण्याचा आपला हा पहिलाच अनुभव आहे. तर निर्माती म्हणून काय विशेष गोष्टी तुम्हाला कटाक्षाने जाणवल्यात?
- पहिलं म्हणजे कमर्शिअल सिनेमा अशा विषयांना घेऊन बनवण्याची नितांत गरज मला वाटते. जे 'लव्ह सोनिया'तून मी केलं. लोक इंडस्ट्रीला इतकं प्रेम करतात की आता इंडस्ट्रीची जबाबदारी आहे की या विषयांबाबत फॅक्ट्स मांडून जागृकता निर्माण करावी. दुसरी गोष्टं म्हणजे परदेशी कलाकारंमध्ये जी व्यावसायिकता आहे ते बघून आपणही जास्तं वचनबध्दतेनं काम करतो. हा ताळमेळ खुप छान सांभाळता आला. या सिनेमाचे आणखी एक निर्माते डेविड वोमार्क यांची कामाबद्दलची समर्पकता मला फार भावली. सिनेमा हा राजकारणाचाच विस्तार आहे असं मला वाटतं. तेव्हा या मिडीयाचा अशा संवेदनशील विषयांना योग्य दिशा देण्यासाठी वापर करुन घेता येईल यासाठी मी प्रयत्न करत असते. 

8) तुमच्या पुढील प्रोजेक्ट्सविषयी काय सांगाल?
- मी इंडस्ट्रीत मराठी सिनेमापासून कामास सुरवात केली होती. पण आता हिंदी सिनेमासाठीही मी काम करत आहे. 'मान्सून फुटबॉल' नावाच्या मराठी सिनेमासाठी माझ्या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत काम सुरु आहे. महिलांचा विषय केंद्रस्थानी असलेल्या विषयावर आणखी एका सिनेमासाठी माझं काम सुरु आहे. 'चक दे' सिनेमातील महिला हॉकीच्या टिममध्ये जे कलाकार होते त्यापैकी काही कलाकार या सिनेमात काम करणार आहेत. असे दोन ते तीन मराठी सिनेमांसाठी मी प्रयत्न करत आहे. शिवाय हिंदी सिनेमासाठीही माझं काम सुरु आहे.   

तमाशा टॉकीज, सम्राज टॉकीज आणि इंडीया टेक वन प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने 'लव्ह सोनिया' सिनेमाची निर्मिती झाली आहे. सिनेमात मृणाल ठाकूर हिने मुख्य पात्र साकारले आहे. शिवाय सिनेमात मनोज वाजपेयी, राजकुमार राव, रिचा चड्डा, अनुपम खेर, सई ताम्हणकर, फ्रिडा पिंटो, डेमी मूर, रिया सिसोदिया, आदिल हुसैन आणि सनी पवार यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहे.  

  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cinema is a extension of politics says shalini thakaeray talking on love sonia upcoming movie