रणवीरच्या नाठाळ 'माकडउड्या', सर्कशीचा 'खेळखंडोबा'! Cirkus Review | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cirkus Review

Cirkus Review: रणवीरच्या नाठाळ 'माकडउड्या', सर्कशीचा 'खेळखंडोबा'!

Cirkus Review: मसालापटाच्या नावानं हल्ली दिग्दर्शक जे काही सादर करत आहे ते पाहून आपण हा चित्रपट का पाहायला आलो असं वाटण्याची शक्यताच अधिक आहे. रोहित शेट्टी हा बॉलीवूडचा तगडा दिग्दर्शक. बॅक टू बॅक ब्लॉकबस्टर हिट देणाऱ्या या दिग्दर्शकाचा सर्कस नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आहे. मात्र ही सर्कस पाहण्यासाठी थिएटरमध्ये फारशी गर्दीच नसल्याचे दिसून आले आहे.

करंट लगा रे.. दीपिका आणि रणवीर सिंगचं ते गाणं सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांच्या उत्साहाला पारावार राहिला नव्हता. एक आगळीवेगळी मेजवानी आपल्याला थिटएरमध्ये मिळणार असल्याचा त्यांचा आनंद हा काही फार वेळ टिकणारा नाही. अशातच प्रचंड उत्साहाचा स्त्रोत असणाऱ्या रणवीर सिंगनं देशभर केलेल्या प्रमोशनमुळे देखील सर्कशीला गर्दी होईल असे म्हटले जात होते. मात्र तेही काही झाले नाही. गोलमालच्या चित्रपटांची मोठी मालिका काढून प्रेक्षकांना मनमुराद हसवणाऱ्या रोहित शेट्टीच्या सर्कसनं प्रेक्षकांना नाराज केल्याचे दिसून आले आहे.

Also Read- Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

कॉमेडीच्या नावाखाली ओढून ताणून केलेला विनोद, अचकट, विचकट हावभाव, त्याच्या जोडीला कानठळ्या बसविणारे संगीत यामुळे सर्कस मनोरंजक न ठरता डोकेदुखी ठरु लागतो हे सांगावे लागेल. सिंघम, सिम्बा, त्यानंतर अक्षय कुमारला घेऊन केलेला सुर्यवंशी देखील फार काळ बॉक्स ऑफिसवर टिकला नाही. हवेत गाड्या उडवणं, त्यांची आदळाआपट करणं हा रोहित शेट्टीचा नेहमीचा फंडा आहे. म्हणून त्यानं सर्कसमध्ये काही वेगळं करण्याचा प्रयत्न केला. वेगळा विषय, वेगळी मांडणी म्हणून त्याचं कौतूक पण सर्कस फारशी भावताना दिसत नाही.

रणवीरला यंदाच्या वर्षात काही सूर गवसलेला दिसलेला नाही. सुरुवातीला त्याचा ८३ आला होता. त्यामध्ये त्यानं कपिल देवची भूमिका साकारली होती. यानंतर आलेल्या जयेशभाई जोरदारकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली होती. तो काही बॉक्स ऑफिसवर चालला नाही. त्यामुळे आता सर्कसकडून त्याच्या चाहत्यांना अपेक्षा होत्या. मात्र त्यातही रणवीर हा काठावर पास झालेला दिसून येतो आहे. दीपिकाची आणि त्याची त्या गाण्यातील केमिस्ट्री प्रेक्षकांच्या काळजात रुतून बसते हेही आवर्जुन सांगायला हवं. रोहितनं करंट लगा रे गाण्यातून खूप काही जिंकण्याचा प्रयत्न केला आहे. शेवटी कथेतच फारसा दम नसेल तर काय होणार हे सर्कसमधून दिसून आले आहे.

हेही वाचा: Deepika Bikini: दीपिकाची 'भगवी' बिकीनी तयार केली, शालीनची 'लॉटरीच' लागली! आता...

१९४२ पासून सुरु होणारं हे कथानक पहिल्यापासून पकड घेण्याचा प्रयत्न करतं पण ते यशस्वी होत नाही. एक शास्त्रज्ञ त्या दशकांत आपल्या सहकाऱ्यांना सरोगसीची गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करताना दिसतो आहे. संस्कार हे काही परंपरागत नसतात तर ते आपल्या भोवतालच्या परिस्थितीनुसार आपल्यावर होत असतात. हे तो सांगण्याचा प्रयत्न करतो. वास्तविक ही गोष्ट यापूर्वी अमिताभ बच्चन आणि विनोद खन्ना यांच्या परवरिश चित्रपटांतून मांडण्यात आली आहे. सर्कसमध्ये देखील दोन जुळी मुलं आहेत. वेगवेगळया राज्यांमध्ये त्यांची वाढ होऊ लागते. पुन्हा ते एकमेकांना कसे भेटतात, त्यांची प्रेमप्रकरणे, त्यातील अडथळे आणि तोच तो नेहमीचा संघर्ष असं सारं कथानक आहे.

हेही वाचा: Avatar The Way Of Water Review: तिकीट कितीचे का असेना, 'अवतार' खूश करतोच! अविस्मरणीय अनुभव

ज्यांनी प्रसिद्ध गीतकार आणि दिग्दर्शक गुलजार यांचा अंगूर पाहिला असेल त्यांना रणवीरचा सर्कस हा एकदम पांचट वाटण्याची शक्यता आहे. चित्रपटात विशेष असे काही नाही. जुन्या अंगुरला जी लोकप्रियता मिळाली तेवढीही या अंगुरला मिळेल की नाही ही मोठी शंका आहे. रोहित शेट्टीच्या या चित्रपटामध्ये स्टारकास्ट तगडी आहे. त्यात जॅकलीन, रणवीर सिंग, पुजा हेगडे, मुकेश तिवारी, आपल्या सर्वांचा आवडता सिद्धार्थ जाधवही आहे. असं असलं तरी सर्कस फार रंगलेली नाही. त्यामुळे तिचं तिकिट काढून वाट्याला निराशाच येण्याची शक्यता अधिक...

चित्रपटाचे नाव - सर्कस

दिग्दर्शक - रोहित शेट्टी

कलाकार - रणवीर सिंग, पुजा हेगडे, मुकेश तिवारी, जॅकलीन फर्नांडिझ, सिद्धार्थ जाधव

रेटिंग - ** 1/2 - अडीच स्टार