कंगनाविरुद्ध तक्रार दाखल; 'ते' ट्विट पडलं महागात 

स्वाती वेमूल
Tuesday, 9 February 2021

वादग्रस्त विधानांमुळे सतत चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना राणावतविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

वादग्रस्त विधानांमुळे सतत चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना राणावतविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. शेतकरी आंदोलनाबद्दल ट्विट करताना शेतकऱ्यांचा उल्लेख दहशतवादी असा केल्याने तिच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. 'टाइम्स नाऊ'ने दिलेल्या वृत्तानुसार, बेळगाव इथले वकील हर्शवर्धन पाटील यांनी कंगनाविरोधात तक्रार केली आहे. 

विख्यात पॉप गायिका रिहानाने शेतकरी आंदोलनासंदर्भात ट्विट केलं होतं. 'या विषयावर आपण गप्प का आहोत', असा सवाल तिने ट्विटरवर केला होता. तिचं हे ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं. त्यावर उत्तर देताना कंगनाने शेतकऱ्यांचा उल्लेख दहशतवादी असा केल्याचा आरोप हर्शवर्धन यांनी केला. 'या विषयावर कोणीच बोलत नाहीये कारण ते शेतकरी नसून भारताचं विभाजन करणारे दहशतवादी आहेत. तू गप्प बस मूर्ख, आम्ही तुमच्यासारखे आमच्या देशाला विकलं नाहीये', असं ट्विट कंगनाने केलं होतं. कंगनाने या ट्विटमधून केवळ शेतकऱ्यांचा अपमानच केला नाही तर किसान समाजाचं विभाजन करण्याचाही प्रयत्न केला आहे, असा आरोप तक्रारकर्त्याने केला. 

हेही वाचा : 'अभिनेत्री व्हायचं असेल तर आधी सर्जरी कर, दिग्दर्शकाची होती अट'

याआधीही कंगना आणि तिची बहीण रंगोली यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी दोघींना समन्स बजावले होते. कंगना तिच्या ट्विटद्वारे सामाजिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला होता. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: complaint filed against Kangana Ranaut for allegedly calling farmers terrorists