एकीकडे मोदींचं बायोपिक प्रदर्शित तर दुसरीकडे विवेक ओबेरॉयच्या घरी छापेमारी, काय आहे कनेक्शन?

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Saturday, 17 October 2020

'बॉलिवूडमध्ये इतके मोठे निर्माते असताना केवळ संदिप सिंह याच्याच कंपनीची निवड बायोपिकसाठी का केली? या बायोपिकच्या पोस्टर अनावरणासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपला अमुल्य वेळ काढून गेले होते तर संदिप सिंहचा पार्टनर हा अभिनेता विवेक ओबेरॉय आहे.'

मुंबई- अभिनेता सुशांतसिंह मृत्यू प्रकरणी तीन-तीन तपास यंत्रणांनी चौकशी करुनही काहीच निष्पन्न झाले नाही. एनसीबीची चौकशीसुद्धा जनतेची दिशाभूल करण्याकरता केली गेली आणि ती फार्सच ठरली. या प्रकरणात भाजपाचा ड्रग अँगल समोर आला होता आणि मोदींच्या बायोपिक निर्मात्यांचे नावही चर्चेत आले होते म्हणून बॉलीवूड व भाजपा ड्रग कनेक्शनची चौकशी करावी अशी मागणी काँग्रेसने ३१ ऑगस्ट २०२० रोजी केली होती त्या मागणीचा पुनरुच्चार करण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिली.

हे ही वाचा: 'फिल्मसिटी मुंबईबाहेर न्यायची हे तर मोठं कारस्थान', अमेय खोपकरांचा आरोप    

यासंदर्भात सचिन सावंत म्हणाले की, 'हे ड्रग कनेक्शनचं प्रकरण अत्यंत गंभीर आहे असं गृहमंत्री म्हणाले असून विवेक ओबेरॉयचे भाजपाशी घनिष्ठ संबंध आहेत. ते भाजपाचे स्टार प्रचारक राहिले आहेत. या अगोदर या प्रकरणाच्या चौकशीसाठी महाराष्ट्र सरकारर्फे राष्ट्रीय तपास यंत्रणांना विनंती करण्यात आली होती, परंतु या तपास यंत्रणांवर मोठा दबाव असल्याचं दिसून आलं. तरीदेखील पुन्हा एनसीबीकडे या मागणीचा पुनरुच्चार केला जाईल आणि त्यांनी चौकशी केली नाही तर मुंबई पोलीस चौकशी करतील असं आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलं' असल्याची माहिती सचिन सावंत यांनी दिली.  

सावंत पुढे म्हणाले की, 'या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिक निर्मात्याचे संदीप सिंहचं नाव येत होतं. त्या निर्मात्याची चौकशी करण्याची मागणी भाजपा नेते सुब्रम्हण्यम स्वामी यांनी देखील केली होती परंतु त्या दिशेने तपासच केला गेला नाही. राज्य सरकारने विनंती करुनही याचा तपास केला गेला नाही. या संदर्भात संदिप सिंह व विवेक ओबेरॉय यांचं नाव पुढे येत होतं. ड्रग कनेक्शन संदर्भात बंगळूरु पोलिसांनी मुंबईत येऊन अभिनेता विवेक ओबेरॉयच्या घरी छापे मारले परंतु राष्ट्रीय तपास यंत्रणांना वेळ मिळत नाही' हे आश्चर्याचं असल्याचं त्यांनी म्हटलंय.

तसंच काही महत्वाचे प्रश्न अद्यापही अनुत्तरीत राहिले आहेत. 'बॉलिवूडमध्ये इतके मोठे निर्माते असताना केवळ संदिप सिंह याच्याच कंपनीची निवड बायोपिकसाठी का केली? या बायोपिकच्या पोस्टर अनावरणासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपला अमुल्य वेळ काढून गेले होते तर संदिप सिंहचा पार्टनर हा अभिनेता विवेक ओबेरॉय आहे. या दोघांनी मोदींचं बायोपिक काढलं आहे तसंच मोदींची भूमिकाही विवेकनेच केली आहे. विवेक ओबेरॉय गुजरातमध्ये भाजपाचे स्टार प्रचारक होते. केवळ या दोघांच्या कंपनीलाच गुजरात सरकारने बोलवून वायब्रंट गुजरातमध्ये १७७ कोटी रुपयांचा करार केला होता.

कर्नाटकमध्ये भाजपाच्या प्रचारात सामिल झालेली अभिनेत्री रागिनी द्विवेदी ही सँडलवूड ड्रग रॅकेटमध्ये पकडली गेली आहे. तिच्याबरोबर १२ लोकांवर ड्रग पेडलींगचा गुन्हा दाखल केलेला आहे. या १२ लोकांमध्ये आदित्य अल्वा नावाचा व्यक्ती देखील असून तो अद्याप फरार आहे आणि आदित्य अल्वा हा विवेक ओबेरॉयचा सख्खा मेव्हणा आहे. ही सर्व माहिती चौकशीकरता दिली होती परंतु राष्ट्रीय तपास यंत्रणांनी अद्याप यावर कोणतीही कारवाई केलेली नाही' असेही ते म्हणाले.

'बंगळूरु पोलीसांनी १५ ऑक्टोबरला अभिनेता विवेक ओबेरॉयच्या मुंबईतील घरी छापे मारले त्याच दिवशी लॉकडाऊन नंतर देशभरात जो पहिला सिनेमा प्रदर्शित करण्यात आला तो नरेंद्र मोदींचा बायोपिक होता. हा नियतीने ठरवलेला योगायोग आहे. महाराष्ट्र भाजपा कार्यालयात संदिप सिंहने ५३ वेळा कोणाला फोन केला याचंही उत्तर अजून मिळालेलं नाही' असं सावंत यांनी म्हटलंय.  

congress alleges vivek oberoi sandip singh link in drugs case demands inquiry  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: congress alleges vivek oberoi sandip singh link in drugs case demands inquiry