अभिनयात वजनदार मेहेरजान 

अरुण सुर्वे 
गुरुवार, 20 एप्रिल 2017

खेळाडू बनण्याचं स्वप्न पाहिलं; मात्र अभिनयाची गोडी लागली आणि त्यातच करिअरला सुरुवात केली. नंतर जाहिरातींबरोबरच दिग्दर्शनातही रस वाढत गेला. हळूहळू छोट्या पडद्यावरून बॉलीवूडमध्येही "वजनदार' झेप घेतली... सांगतोय डहाणूचा अभिनेता मेहेरजान माजदा... 

खेळाडू बनण्याचं स्वप्न पाहिलं; मात्र अभिनयाची गोडी लागली आणि त्यातच करिअरला सुरुवात केली. नंतर जाहिरातींबरोबरच दिग्दर्शनातही रस वाढत गेला. हळूहळू छोट्या पडद्यावरून बॉलीवूडमध्येही "वजनदार' झेप घेतली... सांगतोय डहाणूचा अभिनेता मेहेरजान माजदा... 

आमच्या कुटुंबात कुणीही अभिनय क्षेत्रामध्ये नाहीय. माझे आई-बाबा तर हिंदी चित्रपटही फार कमी पाहतात; मात्र अभिनय क्षेत्राबद्दल गोडी होती. त्यामुळेच मी 2009 पासून अभिनयामध्ये करिअर करायला सुरुवात केली. त्याआधी नाटकांकडे माझा ओढा होता. त्यामुळेच शाळेत असताना मी सांस्कृतिक कार्यक्रमांत सहभागी होत असे; तसेच बालनाट्यांमध्येही काम केलं आहे. पण तेव्हा अभिनयातच करिअर करायचं, असा विचार मनात कधीच आला नव्हता. उलट खेळाडू बनण्याचं माझं स्वप्न होतं. महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर असलेलं डहाणू हे माझं गाव. माझं शालेय शिक्षण डहाणूमधील सेंट मेरीज स्कूलमध्ये; तर पुण्यातील सिम्बॉयसिस कॉलेजमधून मी पदवीधर झालो. 

वायआरएफ टेलिफिल्म्स निर्मित "सेव्हन' या मालिकेत मला 2010 मध्ये अभिनयाची संधी मिळाली. त्यात मी मुख्य भूमिका साकारली. दरम्यान, "पीके' चित्रपटासाठी राजू हिरानी यांच्यासोबत सहायक दिग्दर्शकाचीही भूमिका बजावली आहे. जाहिरातींमध्ये काम करण्याबरोबरच दिग्दर्शनातही मला रस आहे. विशेष म्हणजे मी माझ्या काही जाहिरातींमध्ये किंगखान शाहरूख खानसोबतही काम केलं आहे. 

आतापर्यंत मी "सेव्हन', "निशा और उसके कझिन' या मालिकांमध्ये तर "लव्ह का दी एंड' या चित्रपटात अभिनय केला आहे. तसेच अनेक वेब सीरिजमध्येही काम केलं आहे. सध्या मी "ढाई किलो प्रेम' या मालिकेत पियुषची भूमिका साकारत आहे. हीच भूमिका माझी सर्वाधिक आवडती आहे. कारण, मला हा लठ्ठ मुलगा मनापासून आवडला आहे. तो दररोजच्या समस्यांसोबत झगडतो आहे. अशा प्रकारची भूमिका यापूर्वी मी कधीही साकारलेली नाही. त्यामुळेच ती माझ्या हृदयाच्या जवळ आहे. 

"ढाई किलो प्रेम' ही दोन इम्परफेक्‍ट व्यक्तींची प्रेमकथा असून ते दोघेही लठ्‌ठ पण एकमेकांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत. पियुष हा असंतुष्ट आणि आत्मविश्‍वासाची कमतरता असलेला मुलगा आहे. याउलट दीपिका ऊर्फ अंजली आनंदचा आत्मविश्‍वास मात्र दृढ आहे आणि ती आनंदी मुलगी आहे. कोणासाठीही तिला बदलण्याची गरज वाटत नाही. पियुषचं सर्वांत मोठं स्वप्न म्हणजे त्याला दीपिका पादुकोणसारख्या सडपातळ मुलीशी लग्न करायचं आहे. खरं तर ही ताज्या दमाची कथा असून प्रेक्षकांना ती आपलीशी वाटेल, अशीच आहे. जेव्हा माझा शो ऑन एअर गेला तेव्हा माझे आई-बाबा आणि मित्रांनी माझं खूप कौतुक केलं. माझ्या आईला तर काय बोलावं, हेच सुचत नव्हतं. "फिट ते फॅट'चा प्रवासही लक्षात राहण्याजोगा आहे. 

माझ्या अभिनयाच्या कारकिर्दीला "ढाई किलो प्रेम' यातील भूमिकेमुळेच वळण मिळालं. यातील भूमिकेसाठी मला शारीरिक प्रशिक्षण आणि कार्यशाळांमध्ये भाग घ्यावा लागला. पियुषसारखी भूमिका कोणीही साकारू शकत नाही आणि ही भूमिका मिळाली, याचा मला आनंद आहे. माझ्या कामाने जर मी समाजासाठी काहीतरी चांगलं करत असेल तर तोच माझ्यासाठी माझा सर्वोत्तम परफॉर्मन्स असेल. लठ्‌ठ लोकांकडे पाहण्याच्या समाजाच्या दृष्टिकोनात मी थोडा जरी बदल घडवू शकलो, तर मला नक्कीच चांगलं वाटेल. आगामी काळात मला माझ्या करिअरवरच लक्ष केंद्रित करायचं आहे. मी त्यासाठी जी ध्येयं आखली आहेत; ती पूर्ण करायची आहेत. मात्र सध्या तरी लग्नाचा विचार नाहीये. मालिकेतील पियुषच्या भूमिकेचा आनंद लुटतोय. 

Web Title: Dhai Kilo Prem Fame meherzan mazda interview