esakal | 'तो माझ्यासाठी क्रिकेटचा देव होता, पण इथून पुढे..'; मराठी दिग्दर्शक सचिनवर नाराज
sakal

बोलून बातमी शोधा

sameer vidwans and sachin tendulkar

'आपल्याच शेतकऱ्यांना आंदोलनापासून रोखण्यासाठी अश्रुधूर, लाठ्या, बांधलेल्या भिंती आणि ठोकलेले खिळे तुम्हाला पटतात का?'

'तो माझ्यासाठी क्रिकेटचा देव होता, पण इथून पुढे..'; मराठी दिग्दर्शक सचिनवर नाराज

sakal_logo
By
स्वाती वेमूल

दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला जागतिक पातळीवरील सेलिब्रिटींकडून पाठिंबा मिळाल्यानंतर देशातील सेलिब्रिटीसुद्धा ट्विटरवर सक्रिय झाले. भारतीय सेलिब्रिटींकडून ट्विटरवर #IndiaTogether #IndiaAgainstPropaganda हे हॅशटॅग वापरत ट्विट्सची मालिकाच सुरू झाली. यामध्ये क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरनेही ट्विट करत शेतकरी आंदोलनावर भाष्य केलं. मात्र त्याच्या ट्विटवर मराठी दिग्दर्शक समीर विद्वांसने नाराजी व्यक्त केली आहे. राग येतोच आहे पण वाईट जास्त वाटतंय, अशा शब्दांत समीरने त्याच्या भावना व्यक्त केल्या. 

काय होतं सचिन तेंडुलकरचं ट्विट?
भारताच्या सार्वभौमत्वाशी तडतोड मान्य नाही. बाहेरील शक्ती बघ्याच्या भूमिकेत राहू शकतात पण हस्तक्षेप करू शकत नाहीत. भारतीयांना भारत माहित आहे आणि त्यांनी भारतासाठी निर्णय घ्यावा. आपल्या देशासाठी एकत्रित राहुया, असं ट्विट करत सचिनने #IndiaTogether #IndiaAgainstPropaganda हे दोन हॅशटॅग वापरले. 

सचिनच्या या ट्विटबाबत समीर विद्वांस म्हणाला, 'सचिनची बॅटिंग बघत लहानाचा मोठा झालो. तो माझ्यासाठी क्रिकेटचा देव होता. आयुष्यात अनेक निराश क्षणी मी त्याच्या इनिंग्ज बघायचो, खूप बरं वाटायचं. त्याच्या अनेक गोष्टी मनाला पटल्या नाहीत पण हे कधी बदललं नव्हतं. पण आता मात्र इथून पुढे सगळं वेगळं असेल. राग येतोच आहे पण वाईट जास्त वाटतंय.'

हेही वाचा : शेतकरी आंदोलनावर सलमानने सोडलं मौन; म्हणाला..

यापुढच्या ट्विटमध्ये समीरने शेतकरी आंदोलनाबाबत मत व्यक्त केलं. 'भारताबाहेरच्या लोकांनी आपल्या अंतर्गत मामल्यात बोलायची गरज नाही. तुमचं मत. चला ठीक! तुम्हाला सरकारची बाजू पटतेय. ओके! तरीही आपल्याच शेतकऱ्यांना आंदोलनापासून रोखण्यासाठी अश्रुधूर, लाठ्या, बांधलेल्या भिंती आणि ठोकलेले खिळे तुम्हाला पटतात का? ‘भारत समर्थ आहे’ असा?' असा सवाल समीरने केला.