
दिल्लीच्या वेशींवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर सलमानने प्रथमच भाष्य केलं आहे.
बॉलिवूडचा 'भाईजान' अर्थात अभिनेता सलमान खानने शेतकरी आंदोलनावर मौन सोडलं आहे. दिल्लीच्या वेशींवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर सलमानने प्रथमच भाष्य केलं आहे. जे योग्य आहे ते केलं पाहिजे, असं मत सलमानने मांडलं. 'स्पॉटबॉय ई'शी बोलताना त्याने हे मत व्यक्त केलं.
शेतकरी आंदोलनाविषयी सलमानला प्रश्न विचारला गेला असता तो म्हणाला, "जे योग्य आहे ते केलं पाहिजे, जी सर्वांत योग्य आणि सर्वांत उदात्त गोष्ट असेल ते केलं पाहिजे." विख्यात अमेरिकी पॉप गायिका रिहानाने शेतकरी आंदोलनाबाबत ट्विट केल्यानंतर ट्विटरवर सेलिब्रिटी व्यक्त होऊ लागले. रिहानासोबत पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गनेही आंदोलनाला पाठिंबा दिला. ग्लोबल सेलिब्रिटी मंडळींकडून आंदोलनाबाबत ट्विट केले जात असतानाच बॉलिवूड सेलिब्रिटींनी ट्विटची मालिका सुरू केली. #IndiaTogether हा हॅशटॅग वापरत बॉलिवूड सेलिब्रिटींनी ट्विट करण्यास सुरुवात केली.
हेही वाचा : बाहेरच्या सेलिब्रिटींनी ट्विट केल्यावर जाग आली का? अजित पवारांचा बॉलिवूडकरांना सवाल
रिहाना, ग्रेटा यांच्यासोबतच अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांची पुतणी मीना हॅरिस यांच्यासह अनेक नामवंतांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला. दरम्यान, भारताने केलेले तीन नवे कृषी कायदे हे सुधारणांसाठी टाकलेले महत्त्वाचे पाऊल असल्याचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले आहे.