नवोदित कलाकार टॅलेंटेड आणि पॅशनेट..!

संतोष भिंगार्डे 
शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016

'तुम बिन', 'दस', 'रा वन' यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे दिग्दर्शक अनुभव सिन्हा आता 'तुम बिन-2' हा चित्रपट घेऊन येत आहेत. या चित्रपटात ते निर्माता, दिग्दर्शक आणि लेखक अशा तिहेरी भूमिकेत आहेत. त्याबद्दल त्यांच्याशी केलेली बातचीत. 

प्रश्न:  'तुम बिन' हा चित्रपट हिट झाला होता आणि त्याची गाणी खूप गाजली होती; पण या चित्रपटाचा सिक्वेल करावा, असं का वाटलं? 

'तुम बिन', 'दस', 'रा वन' यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे दिग्दर्शक अनुभव सिन्हा आता 'तुम बिन-2' हा चित्रपट घेऊन येत आहेत. या चित्रपटात ते निर्माता, दिग्दर्शक आणि लेखक अशा तिहेरी भूमिकेत आहेत. त्याबद्दल त्यांच्याशी केलेली बातचीत. 

प्रश्न:  'तुम बिन' हा चित्रपट हिट झाला होता आणि त्याची गाणी खूप गाजली होती; पण या चित्रपटाचा सिक्वेल करावा, असं का वाटलं? 

अनुभव सिन्हा : सन 2001 मध्ये 'तुम बिन' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आमच्या चित्रपटाच्या अगोदर 'गदर' आणि 'लगान' हे चित्रपट आले होते. आमच्याबरोबर 'अक्‍स' चित्रपट रिलिज झाला होता आणि त्यानंतर 'दिल चाहता है'. त्यामुळे आमच्या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली; पण उशिरा. ज्या प्रमाणात हा चित्रपट सगळीकडे पोहोचणं आवश्‍यक होतं, त्या प्रमाणात तो पोहोचला नाही. कारण या बड्या चित्रपटांच्या भाऊगर्दीत आम्हाला थिएटर कमी मिळाली. त्यामुळे कुठे तरी रुखरुख मनात होती.

त्यानंतर तिनेक वर्षांनी मला, 'तुमचा चित्रपट चांगला होता, आम्हाला आवडला', अशी प्रतिक्रिया काहींनी दिली. कारण तो चित्रपट टीव्हीवर अनेकांनी पाहिला आणि आम्हाला चांगली प्रतिक्रिया दिली. त्यामुळे माझ्या मनात विचारचक्र सुरू झालं. 'तुम बिन' चित्रपटातील गाण्यांनी रसिक मनाला भुरळ घातली होती. गाण्यातूनच खरंतर या चित्रपटाचा आशय प्रभावीपणे व्यक्त झाला होता. एकूण 12 गाणी त्यात होती. माझ्याही मनात ती गाणी सतत रुंजी घालत असत. त्यामुळे या चित्रपट विषयाच्या मी पुन्हा प्रेमात पडलो आणि ठरविलं की ,'तुम बिन'चा दुसरा भाग आणायचाच. कारण ही पूर्णतः क्रिएटिव्ह प्रोसेस आहे आणि तिने पहिल्यांदा माझ्यातल्या लेखकाला साद घातली. 

प्रश्नः तरीही एवढा कालावधी का लागला? 

अनुभव सिन्हा : मी 'रा वन' चित्रपटामध्ये बिझी होतो. 'तुम बिन'चा दुसरा भाग बनवायचा म्हणजे चांगली कथा मिळणंही आवश्‍यक होतं; पण 'तुम बिन'च्या कॉन्सेप्टमध्ये प्रोग्रेस करण्याचा मला खूपच छान वाव दिसत होता आणि माझ्यातला लेखक मला स्वस्थ बसू देत नव्हता. त्यामुळे पहिल्या भागाप्रमाणे या सिक्वलचं लेखन मीच करायचं असं ठरवलं. त्यानंतर भूषण कुमार आणि माझी टीम आम्ही एकत्र बसलो. त्यानंतर सगळी फिल्मची प्रोसेस सुरू झाली आणि ती पूर्णत्वास आली आहे. मनापासून ही क्रिएटिव्ह प्रोसेस मी एन्जॉय केली, याचं समाधान आहे. 

प्रश्नः 'तुम बिन 2' ची गाणी रिलीज झाल्यापासून त्यातील नव्या चेहऱ्यांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे, त्याविषयी काय सांगाल? 

अनुभव सिन्हा : या चित्रपटाच्या कथेतच नाविण्य आहे आणि आम्ही नवीन कलाकारांबरोबरच काम करायचं आधीपासूनच ठरवलं होतं. नेहा शर्मा, आदित्य सील, आशिम गुलाटी हे कलाकार यात काम करत आहेत. या तीनही कलाकारांमध्ये मला फ्रेशनेस जाणवला. त्यांच्या निवडीमागचं खास कारण म्हणजे, या तिघांचेही बोलके डोळे. ही लव्हस्टोरी आहे आणि आम्ही ती नव्या पद्धतीने मांडलेली आहे. आपण आपल्या जीवनात नेहमीच चांगला विचार करत असतो आणि नेहमीच योग्य निर्णय घेण्याचा प्रयत्न करतो; पण कधी कधी आपला निर्णय चुकतो. अशीच साधारण ही कथा आहे; आणि या कथेला तिघा कलाकारांनी आपापलं बेस्ट दिलं आहे. त्यांच्याबरोबर स्कॉटलंडमधील ग्लॉसगो आणि एडिनबर्ग या शहरात; तसेच विविध लोकेशन्सवर हा चित्रपट चित्रित करताना खूप मजा आली. काही वेळा शूट करताना, 'अरे हे असंच पाहिजे होतं... एकदम करेक्‍ट' असं माझ्या तोंडून निघालं की, ते तिघेही खूश व्हायचे. 

प्रश्नः सिक्‍वेल करताय आणि तुम्ही तिहेरी भूमिकेत आहात? याचं किती दडपण आहे? 

अनुभव सिन्हा : मला वाटतं, मी या तिन्ही भूमिका माझ्यापरीने उत्तम वठविल्या आहेत. फक्त हीच काळजी आहे की, या फिल्मची आधीच्या फिल्मशी तुलना होता कामा नये. नाहीतर प्रेक्षक या कलाकृतीचा निखळ आनंद घेऊ शकणार नाहीत. प्रेक्षकांनी कुठलेही अंदाज आणि अडाखे न बांधता हा चित्रपट बघावा, असं मला वाटतं. 

प्रश्नः नवोदित कलावंत असल्यामुळे हा चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर हिट होईल की नाही, असा विचार मनात आला का? 

अनुभव सिन्हा : मला नवोदित कलाकारांना संधी द्यायला आवडतं. कारण नव्या कलाकारांकडे चांगलं टॅलंट आहे, पॅशन आहे. मेहनत घेण्याची त्यांची तयारी प्रचंड असते; पण त्यांना योग्य दिशा द्यायला हवी, मार्गदर्शन करायला हवं, म्हणूनच नवोदितांना घेऊन चित्रपट बनवायचा, हे आम्ही नक्की केलं होतं. आम्ही त्यांचं ऍक्‍टिंगचं वर्कशॉप घेतलं. त्यांच्याकडून चांगली तयारी करून घेतली आणि नंतरच सेटवर गेलो. कोणताही चित्रपट बजेटवर चालत नाही, तर त्याची कथा चांगली असणं आवश्‍यक असते. माझा विश्‍वास माझ्या कथेवर आहे.

Web Title: Director Anubhav Sinha interview by Santosh Bhingarde on the sidelines of 'Tum Bin 2'