esakal | 'फेशिअल ट्रिटमेंट' पडली महागात; अभिनेत्रीच्या बिघडलेल्या चेहऱ्याबाबत डॉक्टरांचं स्पष्टीकरण

बोलून बातमी शोधा

Raiza Wilson
'फेशिअल ट्रिटमेंट' पडली महागात; अभिनेत्रीच्या बिघडलेल्या चेहऱ्याबाबत डॉक्टरांचं स्पष्टीकरण
sakal_logo
By
स्वाती वेमूल

सुपरिचित तमिळ अभिनेत्री आणि 'बिग बॉस तमिळ'च्या पहिल्या पर्वातील स्पर्धक रायझा विल्सन हिला 'फेशिअल ट्रिटमेंट' करणं महागात पडलं आहे. मला सर्जरीची गरज नाही असं सांगूनही डर्मेटोलॉजिस्टने बळजबरी काही औषधं दिली आणि त्यामुळे चेहऱ्याला सूज आल्याचं तिने सोशल मीडियावर सांगितलं होतं. यासोबतच तिने स्वत:चे काही फोटोदेखील पोस्ट केले होते. संबंधित डॉक्टरांशी संपर्क साधला असता त्यांनी टाळाटाळ केल्याचंही ती म्हणाली होती. मात्र आता या संपूर्ण प्रकरणावर डॉक्टरांनी त्यांची बाजू मांडली आहे.

चेन्नईमधील प्रसिद्ध डर्मेटोलॉजिस्ट भैरवी सेंथिल यांनी रायझाला 'डर्मल फिलर्स'चा उपचार दिल्याचं सांगितलं. डर्मल फिलर्समुळे चेहऱ्यावरील त्वचा ही एकसारखी दिसण्यास मदत होते असं त्यांनी सांगितलं. "रायझाने याआधीही हा उपचार घेतला होता आणि दुसऱ्यांदा डर्मल फिलर्ससाठी माझ्याकडे आली होती. डर्मल फिलर्समुळे चेहऱ्यावर थोडी सूज येते पण आठवड्याभरानंतर ही सूज कमीदेखील होते. याबद्दल रायझाला सगळी माहिती होती. तरीसुद्धा ती माझी बदनामी करतेय आणि उपचाराचे पैसे परत मागतेय", असं डॉक्टर म्हणाल्या.

हेही वाचा : "तेव्हा आत्महत्येचा विचार आला होता मनात"; मनोज वाजपेयीचा बिहार ते बॉलिवूडचा संघर्ष

img

रायझाचे आरोप

'चेहऱ्याच्या काही सामान्य उपचारासाठी मी डॉ. भैरवी सेंथिल यांना भेटले होते. त्यांनी आवश्यक नसतानाही माझ्यावर एक उपचारपद्धती केली आणि त्याचा परिणाम असा झाला. आज त्यांनी मला भेटण्यास आणि माझ्याशी बोलण्यासही नकार दिला. त्या शहराबाहेर गेल्याचं स्टाफने सांगितलं', अशी पोस्ट रायझाने लिहिली होती.

'वेलाइल्ला पट्टथारी २' या चित्रपटातून रायझाने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. यामध्ये तिने धनुष आणि काजोलसोबत भूमिका साकारली होती. तिने अर्जुन रेड्डी या चित्रपटाच्या तामिळ रिमेकमध्येही काम केलं आहे. याशिवाय 'बिग बॉस तामिळ'च्या पहिल्या पर्वात तिने भाग घेतला होता.