कलापूरनंच दिली संशोधन कार्याची प्रेरणा...!

संभाजी गंडमाळे
Monday, 29 April 2019

अभिनय, नृत्य दिग्दर्शन हेच करियर मानले. पण, या साऱ्या गोष्टी करत असतानाच अभिनयातून ‘पीएच. डी.’ संपादन केली. आजवर या क्षेत्रातील कलाकारांनी ‘पीएच. डी.’ जरूर केल्या. मात्र, अभिनय हा विषय घेऊन पीएच. डी. करणारी कदाचित देशातील मी पहिलीच असावी. अर्थातच कलापुरातच हे संशोधन कार्य करता आले, याचा निश्‍चित अभिमान आहे.

- अभिनेत्री डॉ. राजश्री खटावकर

कलापुरातील गुजरी आणि गंगावेश परिसरात आजवरचं सारं आयुष्य गेलं. शहराचा हा तसा जुना भाग आणि त्यामुळेच लहानपणापासून सांस्कृतिक वातावरणातच घडत गेले. पुढे अभिनय, नृत्य दिग्दर्शन हेच करियर मानले. पण, या साऱ्या गोष्टी करत असतानाच अभिनयातून ‘पीएच. डी.’ संपादन केली. आजवर या क्षेत्रातील कलाकारांनी ‘पीएच. डी.’ जरूर केल्या. मात्र, अभिनय हा विषय घेऊन पीएच. डी. करणारी कदाचित देशातील मी पहिलीच असावी. अर्थातच कलापुरातच हे संशोधन कार्य करता आले, याचा निश्‍चित अभिमान आहे...अभिनेत्री डॉ. राजश्री खटावकर संवाद साधत असतात आणि एकूणच प्रवासाबरोबरच त्यांनी केलेले संशोधन कार्यही उलगडत जातात.  
गेली काही वर्षे रंगभूमीवर यशस्वी घोडदौड करणाऱ्या ‘सोकाजीराव टांगमारे’ नाटकातील मैनेची त्यांची भूमिका साऱ्यांनाच भुरळ पाडते. एकूणच नाटक, चित्रपटातील अभिनय असो किंवा नृत्यदिग्दर्शनात त्यांनी वेगळा ठसा उमटवलाच. पण, जाणीवपूर्वक अभिनयात ‘पीएच. डी.’ संपादन करताना केलेले कामही पुढच्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरणारे आहे. ‘डान्स, ड्रामा, थिएटर’ या विषयात ‘नेट’ उत्तीर्ण होणाऱ्या त्या शिवाजी विद्यापीठातील पहिल्या विद्यार्थिनी ठरल्या आहेत.

आजवर वीसहून अधिक नाटकांचे सतराशेहून अधिक प्रयोग त्यांनी केले. ‘सोकाजीराव’, ‘अपना सपना फनी फनी’, ‘आषाढातील एक दिवस’, ‘विच्छा माझी पुरी करा’, ‘जोडीदार’, ‘सासू ४२०’, ‘संगीत शहा शिवाजी’, ‘झिम पोरी झिम’ आदी नाटकांचा त्यात समावेश आहे. त्याशिवाय दहाहून अधिक चित्रपटांसाठी त्यांनी नृत्यदिग्दर्शनही केले आहे. ‘भूक’, ‘शाळा’, ‘घायाळ हरिणी’ या चित्रपटांनंतर आता ‘हालगी’ या चित्रपटातून त्या रसिकांच्या भेटीस येणार आहेत. ‘भूक’ चित्रपटाचं तर ‘पॅनोरमा’च्या माध्यमातून ‘ऑस्कर’साठी नामांकन झालं होतं. त्याशिवाय अनेक बक्षिसांची लयलूटही त्यांनी केली आहे. 

स्वतःचे करिअर म्हणून तर आहेच. पण, नव्या पिढीला व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने ‘फिनिक्‍स’ची टीम घेऊन प्रत्येक वर्षी राज्य नाट्य स्पर्धेत उतरतो. अभिनेता संजय मोहिते आणि ‘फिनिक्‍स’च्या टीमने सुरू केलेला राज्यस्तरीय प्रहसन नाट्य स्पर्धेचा उपक्रमही आता व्यापक होतो आहे. 
- डॉ. राजश्री खटावकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Rajshree Khatavkar interview in Amhi Kolhapuri