"ध्यानीमनी' नसताना स्वप्नपूर्ती... 

संतोष भिंगार्डे 
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

"माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता अभिजित खांडकेकर "ध्यानीमनी' चित्रपटात एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. त्यानिमित्ताने त्याच्याशी केलेली ही बातचीत- 

"माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता अभिजित खांडकेकर "ध्यानीमनी' चित्रपटात एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. त्यानिमित्ताने त्याच्याशी केलेली ही बातचीत- 

"ध्यानीमनी' या चित्रपटात काम करण्याचा योग कसा काय जुळून आला? 
- एके दिवशी मला चंद्रकांत कुलकर्णी यांचा फोन आला आणि तू माझ्या चित्रपटात काम करतो आहेस...अन्य माहिती तुला लवकरच दिली जाईल, असं त्यांनी सांगितलं. चंद्रकांत कुलकर्णी काय किंवा महेश मांजरेकर काय... यांच्याबरोबर काम करायला कुणाला आवडणार नाही? प्रत्येकालाच त्यांच्याबरोबर काम करावं असं वाटत असतं. मी जेव्हापासून नाटकात काम करतोय किंवा अभिनय करतोय तेव्हापासूनच त्यांच्याबरोबर काम करण्याची माझी इच्छा होती. मग काय... मी लगेच हो म्हटलं. त्यानंतर पटकथेचं वाचन करत असताना हळूहळू सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला. खरं तर सुरुवातीला मनावर दडपण आलं होतं. कारण दोन दिग्गज दिग्दर्शक, अश्‍विनी भावेसारखी अनुभवी व कसलेली अभिनेत्री. त्यांचा तर मी लहानपणापासूनच फॅन. पण या सगळ्या मंडळींबरोबर काम करताना खूप मजा आली. हा चित्रपट म्हणजे माझ्यासाठी वर्कशॉप होता. या चित्रपटात काम केल्यामुळे माझं स्वप्न पूर्ण झालं. 

या चित्रपटात तुझी भूमिका कशा प्रकारची आहे? 
- मी एका क्‍लिनिकल सायकॉलॉजिस्टची भूमिका या चित्रपटात साकारतोय. या चित्रपटात एका जोडप्याची गोष्ट सांगण्यात आली आहे. त्यांच्या भावभावनांची ही कथा आहे. त्यांना गुंत्यातून बाहेर काढण्याचं काम मी करतो. या चित्रपटात एक ट्‌विस्ट आहे आणि तोच मला खूपच कमाल वाटला. जेव्हा मला हा ट्‌विस्ट ऐकवला गेला तेव्हा माझ्या अंगावर काटा आला. मला असं वाटतं की नेहमीची मारामारी आणि लव्हस्टोरी पाहून कंटाळलेल्या प्रेक्षकांना हा चित्रपट म्हणजे उत्तम मेजवानी आहे. एक उत्तम कलाकृती पाहिल्याचं समाधान त्यांना मिळेल हे निश्‍चित. 

या भूमिकेसाठी तू कशा प्रकारची तयारी केलीस... 
- माझी पत्नी सुखदा क्‍लिनिकल सायकॉलॉजिस्ट आहे. त्यामुळे तिच्याकडून मला बरंच काही शिकता आलं. समोरच्या माणसाची मानसिकता ओळखून त्याच्याशी कसं बोलावं हे एक शास्त्र आहे. तो कशा पद्धतीने सांगेल... त्याच्याशी आपण कशा पद्धतीने बोललं पाहिजे... ते सगळं मला माझ्या पत्नीने सांगितलं. त्यामुळे अर्धंअधिक काम तिथेच झालं. बाकी चंदूसरांनी सांगितलं. 

महेश मांजरेकर आणि चंद्रकांत कुलकर्णी यांच्याबरोबर काम करतानाचा अनुभव कसा होता? 
- चंदूसरांबरोबर पहिल्यांदा वाचन केल्यानंतर मी पुरता भांबावलो होतो. कारण त्यांना असलेली अभिनयाची जाण आणि त्यांचं मराठी भाषेवरील प्रभुत्व पाहिल्यानंतर माझ्यासारख्या नवख्या कलाकाराला हे सगळं जमेल की नाही अशी शंका मनात आली. मग मी बाहेर आलो आणि माझा जवळचा मित्र जितेंद्र जोशीला फोन लावला. त्याला फोनवर मी अमुक चित्रपट करत आहे, असं सांगितलं आणि चंदूसरांच्या पहिल्याच भेटीत माझा आत्मविश्‍वास काहीसा गेला आहे, असंही त्याला म्हणालो. त्यानंतर त्याने मला असं सांगितलं की, तू त्यांच्याबरोबर काम कर...अभिनेता म्हणून तुला खूप फायदा होईल आणि आता तस्संच झालं आहे. नाटक, चित्रपट, दिग्दर्शन आणि निर्मिती अशा सर्व अंगांची माहिती असणाऱ्या दोन दिग्गज मंडळींबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली आणि त्यांच्याकडून खूप काही शिकता आलं. कधी सीन करताना मी चुकलो तर चंदूसर मला सांगत असत. कधी कधी महेश सर जवळ बोलावून काही टिप्स देत असत. त्यामुळे माझा आत्मविश्‍वास वाढला. हे सगळं मी एखाद्या अभिनय संस्थेत गेलो असतो तरी शिकायला मिळालं नसतं. 

"माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका सध्या खूपच गाजतेय. तुझ्यातला गॅरी काय म्हणतोय? 
- सुरुवातीला ही भूमिका साकारताना माझ्या मनात काहीशी भीती होती. कारण ही भूमिका तशी पाहिली तर निगेटिव्ह. आतापर्यंत अशी भूमिका साकारली नव्हती. परंतु या मालिकेचं आणि माझ्या भूमिकेचं प्रेक्षकांनी चांगलं स्वागत केलं, याचा आनंद आहे आणि प्रेक्षकांचा मी आभारीही आहे. हे यश आमच्या सर्वांचं आहे. लेखक, दिग्दर्शक, निर्माते तसेच चॅनेल आणि प्रॉडक्‍शन हाऊसची क्रिएटिव्ह टीम यांचं हे यश आहे. कारण त्यांनी एक लाईन ठरवलेली असते आणि त्याप्रमाणे मालिका पुढे सरकत असते. त्यामुळे मालिकेचं यश हे आमच्या सगळ्यांचं आहे. 

तब्बल सहाएक वर्षे तू मालिका स्वीकारली नाहीस, यामागे काही खास कारण? 
- मालिकांच्या ऑफर्स मला येत होत्या; परंतु मी स्वतःच काही वर्षं छोट्या पडद्यापासून ब्रेक घ्यायचं ठरवलं होतं. त्यामुळे छोट्या पडद्यावर काम केलं नाही. कारण एखादी मालिका स्वीकारली की तिला महिन्याचे पंचवीस किंवा सव्वीस दिवस द्यावे लागतात. मी तेवढे दिवस देऊ शकत नव्हतो. कारण विविध शोज्‌ आणि नाटकांमध्ये बिझी होतो. "माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेची वनलाईन मला आवडली आणि म्हणूनच मी त्यामध्ये काम करायचं ठरवलं. 
 

Web Title: dreams complete abhijeet khandakekar