मराठी रंगभूमी
मराठी रंगभूमीsakal

मराठी रंगभूमी : संस्कृतीचा समर्थ वारसा

१८४३ ते १९४३ चा विचार करता,असे लक्षात येते मराठी रंगभूमीचा वसा विविध ठिकाणी पोचला

भारतीय सोज्वळतेचे प्रतीक प्रारंभापासून रंगभूमीतून दिसते. भारतीय संस्कृतीचा अस्सल वारसा मराठी रंगभूमीला लाभला असून तिची वाटचाल १८० वर्षे पूर्ण करुन द्विशतकाकडे सुरु आहे. मराठी रंगभूमी दिनानिमित्त संस्कृतीने समृद्ध अशा समर्थ मराठी रंगभूमीचा घेतलेला आढावा.

डॉ.राजू पाटोदकर

विविधतेतून एकता हा आपल्या भारतीय संस्कृतीचा एक महत्त्वाचा गाभा. तोच गाभा मराठी रंगभूमीचा आहे. मराठी रंगभूमी ही अस्सल देशी वाण असलेली आहे,कारण या रंगभूमीची पाळेमुळे ही ज्यांना इंग्रजीचा गंधही नव्हता,अशा आपल्याच पूर्वजांच्या देशी मनांनी निर्माण केलेली आहेत. यातील पात्रे ही दशग्रंथी वेदमूर्तींपासून ते आश्रितांची आहेत. अगदी टाळ- मृदंगाच्या साथीने नाटकातील गाणी गायली जायची.

कै. विष्णूदास ऊर्फ विष्णू अमृत भावे यांनी ‘सीता स्वयंवर’ या आख्यानवजा मराठी संगीत नाटकाची सुरुवात सांगली येथे यांनी पाच नोव्हेंबर १८४३ रोजी केली आणि आधुनिक मराठी रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली. आज जवळपास १८० वर्षाची ही ऐतिहासिक घटना, तमाम मराठी रंगकर्मीसाठी एखाद्या सणासारखी आहे. विष्णूदासांचे वडील सुभेदार अमृत भावे. त्यांच्या घरी सांगलीचे श्रीमंत अप्पासाहेब पटवर्धन आले असता अमृतरावांनी आपल्या मुलाने काढलेली शाळूची मातीची चित्रे व देखावे श्रीमंतांना दाखविले. हे देखावे पाहून श्रीमंत खूष झाले.

आपल्या दरबारी मराठी नाटके व्हावीत, अशी इच्छा श्रीमंतांना झाली आणि त्यांनी विष्णूवर ही जबाबदारी सोपविली. त्यावेळी विष्णूचे वय साधारण २० वर्षे असावे. विष्णूने ‘सीतास्वयंवर’ हे आख्यान तयार केले. पात्रांचे कपडे, मेकअप, आभुषणे मिळविली आणि ५ नोव्हेंबरला श्रीमंतासमोर प्रयोग सादर केला. हा प्रयोग श्रीमंतांना खूप आवडला. विष्णूदासांच्या नाट्यकलेला राजाश्रय मिळाला.

मुंबईत पहिला प्रयोग

१८४३ ते १९४३ चा विचार करता,असे लक्षात येते मराठी रंगभूमीचा वसा विविध ठिकाणी पोचला होता. त्यातूनच प्रेरणा घेऊन सांगलीकर, इचलकरंजीकर यांनी तो पुढे सक्षमपणे सुरु ठेवला. बाळंभट बापट, अंनाजीपंत ताम्हानकर, स्त्री पात्र करणारे बळवंतराव बापट, बाळा तपकिरे,

विष्णू वाटवे, मुखवटे तयार करणारे अप्पा तेली, बावाजीशास्त्री दातार या अनेक मातब्बर मंडळींनी रंगभूमीची अविरत सेवा केली.विष्णूदास भावे यांनी ९ मार्च १८५३ रोजी मुंबईच्या ग्रॅन्टरोड थिएटरमध्ये मराठी नाटकाचा पहिला प्रयोग केला. त्याने प्रेरित होऊन मुंबईकर मंडळींनी भावेंच्या पौराणिक नाटकाचा कित्ता गिरविलाच,पुढे त्यास इंग्रजांच्या नाटकातील फार्स सारखी आपल्या विनोदाची जोड दिली. असे म्हणतात की, अमरचंदनवाडीकर मंडळींनी फार्सची प्रथा सुरु केली.

लोकजागृतीसाठी नाटकाचा उपयोग

स्वातंत्र्यपूर्वीच्या काळात महाराष्ट्रात नाटकाचा उपयोग स्वराज्याचे आंदोलन अधिक तीव्र कसे होईल. लोकजागृती कशी होईल यासाठी केला. किर्लोस्कर, देवल, श्री.कृ.कोल्हटकर, खाडिलकर, वरेरकर, शं.प. जोशी, वीर वामनराव जोशी, शुक्ल यांनी पौराणिक तसेच सामाजिक विषय आपल्या नाटकांतून हाताळले.१९३० नंतर महाराष्ट्रात रंगभूमीवरील नाट्य प्रयोगामध्ये नावीन्य निर्माण झाले. वरेरकरांनी पूर्वीचं हे केले होते.

बोलपटाचे नवयुग सुरु झाले असले तरी १९३३ च्या दरम्यान काही मंडळी काहीतरी वेगळे करण्याचा मानस करुन नाट्य क्षेत्रात कामाला लागली. यात वर्तक, काणेकर, तळेकर आदी होते. आचार्य अत्रे यांनी आपल्या नाटकातून वेगळेपण दाखवले. तसेच मो.ग.रांगणेकर यांनी कुलवधू या आपल्या नाटकाद्वारे असाच एक वेगळा प्रयत्न केला. तात्यासाहेबांच्या म्हणजे वि.वा.शिरवाडकरांच्या आगमनाने नाट्यसृष्टीला चैतन्य लाभले.

स्वातंत्र्यानंतर रंगभूमीवर विविध प्रयोग

१९४३मध्ये सांगली येथे शतसांवत्सरिक रंगभूमीचा सोहळा झाला. या सोहळ्याने रंगभूमीला प्रेरणा, उर्जा, नवतेज दिले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपल्या देशातील नाट्यकला चौफेर वाढली. स्वातंत्र्यांनंतरच्या पुढील सात दशकांत मराठी रंगभूमीवर विविध प्रयोग झाले. स्वातंत्र्यानंतरच्या मराठी रंगभूमीचा विचार करताना या काळात झालेल्या विविध प्रयोगांचा विचार करणे महत्त्वाचे ठरते. या १९५० ते ७० या काळातील नाटककांरांनी थोडेसे धाडस दाखवून पूर्वीच्या काळातील पौराणिक, सामाजिक,

राजकीय विषयांचा आक्रस्तळेपणा नष्ट केला. नाट्य रसिकांना निखळ मनोरंजन दिले. या कालावधीत लेखकांनी चौफेर लेखन केले, ते एकाच प्रवाहात अडकले नाहीत. या काळात व्यावसायिक, प्रायोगिक लोकरंगभूमी, बालरंगभूमी एकांकिका अशा सर्वच नाट्य प्रकारांचे लेखन झाले. व्यावसायिक नाटकासोबत प्रायोगिक, समांतर नाटक होऊ लागली. वि.वा. शिरवाडकर, पु.ल.देशपांडे, विजय तेंडुलकर, वसंत कानेटकर, पु.भा.भावे, गो.नि.दांडेकर, बाळ कोल्हटकर,, रत्नाकर मतकरी, विद्याधर गोखले, पुरुषोत्तम दारव्हेकर यांनी या काळात विपुल लेखन केले आणि मराठी रंगभूमीला समृद्धी दिली.

रंगभूमीवरील वादळे

१९७०ते ८० या दशकाचा कालखंड मराठी रंगभूमीसाठी वादळी कालखंड ठरला. रंगभूमीवर वादळ निर्माण होणे, ही बाब काही नवी नव्हती. भाऊबंदकी त्याआधीचे कीचकवध या नाटकांचा १९१० मध्ये प्रेस ॲक्टने बळी घेतला होता कीचकवधात जुलमी राज्यकर्त्यांचा वध दाखवला म्हणून ते प्रेस ॲक्टच्या कहरात ते नाटक दगावले, भाऊबंदकीत राज्यकर्त्यांचा केवळ निषेध असल्यामुळे ते बचावले. अशी ही उदाहरणे आहेत. मात्र या ७०ते ८० च्या दशकात नव्या दृष्टीने विचार करावयास प्रेरित केले गेले .

वसंत कानेटकरांनी आपले अजरामर नाटक ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ लिहिले. तसेच तेंडुलकरांनी ‘घाशीराम कोतवाल’ लिहून वादळ निर्माण केले. या नव्या प्रयोगाने प्रायोगिक नाटकांकडे पाहण्याची वेगळी दृष्टी दिली. याच काळात सखाराम बाईंडर, एक शून्य बाजीराव, महानिर्वाण, माता द्रौपदी, लोककथा ७८, वासनाकांड, नटसम्राट, हमीदाबाईची कोठी, अलवरा डाकू, टिळक आगरकर आदी नाटकं प्रेक्षकांच्या समोर आली.तसेच या काळात आणखी एक नवीन गोष्ट झाली ती म्हणजे मराठीतील काही नाटके परभाषेत गेली तर काही परभाषेतून मराठीत आली.

१९८० ते ९० या दशकातील नाटके केवळ त्या त्या दशकापुरतीच मर्यादित न राहता आजही रंगभूमीवर आपले अस्तित्व दाखवत आहेत. याचे श्रेय त्या नाटककारांनाच जाते. महेश एलकुंचवार, रत्नाकर मतकरी, वि.वा.शिरवाडकर, वसंत कानेटकर, विजय तेंडुलकर, मधुकर तोरडमल, जयवंत दळवी, वसंत सबनीस, सई परांजपे, प्र.ल.मयेकर. प्रेमानंद गज्वी यांनी मोठे व्यावसायिक यश मिळविले. २०-३० वर्षानंतर म्हणजे आजही यांची नाटके व्यावसायिक पातळीवर यशस्वी होताना दिसतात.

अनेक नामवंत नाटककारांनी, दिग्दर्शकांनी आपली वेगवेगळी शैली वापरून रंगभूमीवर उत्तम प्रयोग केले. व्यावसायिक पासून ते प्रायोगिक अशा स्तरांवर नवनवीन अविष्कार या काळात पहावयास मिळाले. कोणी महानाट्य तर कोणी त्रिनाट्य तर कोणी दीर्घांक असे नाट्यप्रयोग यशस्वीरीत्या साकारले.यासाठीचे श्रेय सर्वांनाच...कारण चार-दोन नावे घेतली तर इतरांवर अन्याय होईल. आजही मराठी रंगभूमीवरील चैतन्य टिकून आहे.

(लेखक विभागीय माहिती कार्यालय, पुणे विभाग येथे उपसंचालक,आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com