दुनियादारी : कानातलं आणि मनातलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

marriage

दुनियादारी : कानातलं आणि मनातलं

कानातलं आणि मनातलं

‘‘का य मग, आता पुढचं तुझं ना?’’

‘‘कधी देणार मग आम्हाला बुंदीचे लाडू?’’

‘‘लवकर योग्य वयात करून घे!’’

ह्या सगळ्या प्रश्नांना आणि सल्ल्यांना डॉज करत वल्लभ त्याच्या मैत्रिणीच्या लग्नात इकडून तिकडे वावरत होता. त्याच लग्नात साधारण अशाच काही प्रश्नांना डॉज करत अवंतिकाही वावरत होती. दोघंही एकमेकांना ओळखत होते, पण ओळख नुसत्या ओळखीपेक्षा जरा जास्तीची असल्यानं त्यात लग्नाच्या माहोलाचा आणि आजूबाजूच्या लोकांच्या उपस्थितीचा एक ऑकवर्डनेस होता. आल्या आल्या केलेलं ''हाय'' आणि नंतर वल्लभनं २-३ वेळा काहीतरी बोलायला सुरू केलेला विषय त्यांच्यात कोण ना कोण ओळखीचं बोलायला आल्यानं क्षणातच संपला होता. आता दोघंही नुसते गर्दीतून सारखे एकमेकांच्या नजरेला नजर मिळवत स्वतःला आणखी थोडं ऑकवर्ड करण्याच्या शर्यतीत एकमेकांविरुद्ध आघाडी घेत होते.

‘‘कमीत कमी जेवण तरी मनसोक्त करू,’’ असं मनातल्या मनात म्हणत वल्लभ बुफेच्या लायनीत लागतो. बासुंदी आहे का श्रीखंड, हे मान उंचावून बघत असताना वल्लभला तेवढ्यात तिची काळी इरकली साडी सांभाळत तिथं येणारी अवंतिका दिसते. तो पटकन मान परत जाग्यावर ठेवतो आणि एक छान स्माईल देत तीसुद्धा बुफेसाठी ताट हातात घेत त्याच्या मागे थांबते.

‘‘मला वाटलं वेळ असेल तुला जेवायला...’’

‘‘अरे, सुट्टी घेतली आहे ना आज ऑफिसला, तर जेवून मस्त झोपायचा प्लॅन आहे.’’

दोघं काहीबाही बोलायचं म्हणून बोलतात.

अवंतिका चालता बोलता डोकं हलवायची तेव्हा तिचे सुंदर झुमके सुद्धा सोबत छोट्या उड्या मारत. दोघंही एकमेकांकडं बघून उगाच नुसतं खोटं खोटं हसत होते.

तेवढ्यात अवंतिका ऑलमोस्ट ओरडते, ‘अरे देवा!!’

‘‘काय झालं?’’

‘‘स्सsss काही नाही, ते काका येत आहेत ना... ते सारखं, ‘काय मग, शोधला का कोणी? मी फेसबुकवर पाहात असतो तुझे फोटो...’ असलं पाणचट बोलत राहतात.’’

‘‘हाहाहा... असं असतातच गं लग्नात ४-५ तरी नग!’’

‘‘बघ की अरे! होपफुली त्यांनां मी इथं तुझ्यासोबत दिसणार नाही.’’

‘‘असं होणं अशक्य आहे. एक काम कर, तोवर जा तुला पुरी, श्रीखंड वगैरे घेऊन ये ताटात.’’

‘‘गुड आयडिया! स्मार्ट आहेस की तू...’’असं म्हणत अवंतिका वल्लभच्या पुढं जाते. ते काका लोकांना ‘सावकाश जेवा’चा जप करत पुढं जातात.

‘‘वाचले... थँक्स!’’ ती म्हणते. त्यावर वल्लभ फक्त तिला एक छान मोठी स्माईल देतो.

‘‘तुझे डुल... वेगळेच आहेत...’’ वल्लभ अर्धवट काहीतरी म्हणतो.

‘‘डुल?? डुल काय अरे? झुमके म्हण किंवा कानातले म्हण!’’ ती नकळत त्याची शिकवणी घेण्याचा टोन लावत म्हणते.

‘‘हां, तेच कानातले... छान आहेत. सुंदर दिसत आहेत. अगदी साडीच्या काठाला मॅचिंग...’’

अवंतिका मगासपेक्षा जास्तं सुंदर हसते आणि म्हणते, ‘‘इतकं ऑब्सर्व करून तारीफ करण्यासाठी थँक्यू... दिवसभरातली ही पहिली अशी कॉमप्लिमेंट आहे ज्याच्यापुढं विषय माझ्या लग्नाशी वगैरे जोडला नाही गेलाय.’’

तेलकट पुरीचा हात टाळी देत दोघंही हसतात.

‘‘हे कानातले ना... मी शेवटचे घालतेय आज...’’

‘‘का बरं?’’

‘‘माझ्या ताईला देऊन टाकणारे मी हे. तिला खूप अवडलेत.’’

‘‘मग दुसरे घे, असेच सेम.’’

‘‘नाही मिळणार रे असेच सेम.’’

"मग आणखी सुंदर दिसतील असे घे..."

दोघांच्यात अचानक एक ऑकवर्ड शांतता होते. ह्या सगळ्यात ताट घेऊन लायनीत मागं थांबलेला वल्लभ एक हिमतीने मोठा श्‍वास घेतो आणि अवंतिकाच्या शेजारून कानात वाकून हळूच म्हणतो, ‘‘परवानगी दिलीस तर मला तुझ्यासोबत तुझ्यासाठी नवीन कानातले घ्यायला जायला नक्की आवडेल...’’

हे काय आत्ता घडलं, ह्या विचारात थोडीशी चकित झालेली अवंतिका मागं वळून वल्लभकडं कौतुकानं बघते. ते न ठरवता एकत्र एका टेबलावर जेवायला बसतात. कानातलं मनात जपता आलं पाहिजे आणि मनातलं कानात सांगता आलं पाहिजे, म्हणजे इरिटेटिंग लग्नांमध्ये सुद्धा मजा येते...

mahajanadi333@gmail.com