एकता कपूर पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, भारतीय सेनेच्या दुखावल्या भावना

संतोष भिंगार्डे
Tuesday, 4 August 2020

एकता कपूरची आगामी 'ट्रिपल एक्स अन्सेन्सर 2' या वेबसीरिजमुळे ती पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

मुंबईः आपल्या कलाकृतींमधून दाखविल्या जाणाऱ्या कथा आणि सीन्समुळे निर्माती एकता कपूर बरेचदा अडचणीत येत असल्याच्या घटना या अगोदर घडलेल्या आहेत. मात्र त्यातून तिने काही बोध घेतल्याचे दिसून येत नाही. आताही एकता कपूरच्या आगामी 'ट्रिपल एक्स अन्सेन्सर 2' या वेबसीरिजमुळे वादाच्या भोवऱ्यात ती सापडली आहे. वेबसीरिजमध्ये आर्मी ऑफिसरच्या पत्नीच्या काही वादग्रस्त दृश्यांमुळे भारतीय सेनेने जोरदार हरकत घेतली आहे. आता सदर वेबसीरिज भारतीय संरक्षण मंत्रालयाची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय प्रदर्शित होऊ नये असे म्हटले आहे. त्यामुळे आता एकता कपूर संरक्षण मंत्रालय सोबतच सरकारच्या निशाण्यावर आली आहे.

एकताची 'ट्रिपल एक्स-अन सेन्सर 2' ही वेबसीरिज प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. मात्र त्यात आर्मी अधिकाऱ्याच्या पत्नीचे कथित सीन्स दाखविले आहेत.  त्यामुळे भारतीय सेनेची प्रतिमा खराब झाल्याचे म्हटले जात आहे.

या वेबसीरिजमध्ये अभिनेत्री आदिती कोहलीने आर्मी ऑफिसरच्या पत्नीची तर तिच्या मित्राची भूमिका रीबू मेहरा या अभिनेत्याने केली आहे. एकता कपूरबद्दल सामान्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. बिग बॉसमधील माजी स्पर्धक असलेल्या  हिंदुस्तानी भाऊनं एकता कपूरच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केल्याचे समजतंय.

दरम्यान भारतीय संरक्षण मंत्रालयाने वेबसिरीजचे निर्माते आणि संबंधितांना नोटीस दिल्याचे समजत आहे. तसेच सदर वेबसीरिज प्रदर्शित होण्याच्या अगोदर भारतीय संरक्षण मंत्रालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेण्याविषयी बजावले आहे.

(संपादनः पूजा विचारे)

Ekta Kapoor web series based Army reportedly hurt sentiments Armed forces


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ekta Kapoor web series based Army reportedly hurt sentiments Armed forces