...आणि जागी झाली ‘अस्मिता’

मयूरी वाघ
शुक्रवार, 26 मे 2017

‘अस्मिता’ या मालिकेत मी ‘डिटेक्‍टिव्ह अस्मिता’ची मुख्य भूमिका साकारत होते. या मालिकेच्या माध्यमातून आम्ही अन्याय- अत्याचारांना वाचा फोडली. याच मालिकेमुळं मी घराघरांत पोचले. त्यामुळं सर्व जण मला ‘अस्मिता’ याच नावानंच ओळखू लागले. ही मालिका तब्बल तीन वर्षे चालली आणि तिला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.

‘अस्मिता’ या मालिकेत मी ‘डिटेक्‍टिव्ह अस्मिता’ची मुख्य भूमिका साकारत होते. या मालिकेच्या माध्यमातून आम्ही अन्याय- अत्याचारांना वाचा फोडली. याच मालिकेमुळं मी घराघरांत पोचले. त्यामुळं सर्व जण मला ‘अस्मिता’ याच नावानंच ओळखू लागले. ही मालिका तब्बल तीन वर्षे चालली आणि तिला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.

लहानपणापासूनच मला नृत्याची आवड होती. डोंबिवलीमध्ये शालेय शिक्षण घेत असताना मी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असे. वयाच्या पाचव्या वर्षापासूनच मी भरतनाट्यमचं प्रशिक्षण घेण्यास सुरवात केली. नृत्यामध्येच करिअर करावं, असं मला नेहमीच वाटत असे. शिक्षणाबरोबरच नृत्यावरही भर देत होते. केळकर महाविद्यालयात मी अर्थशास्त्र या विषयात बी. ए. पदवी घेतली. त्यानंतर वेलिंगकर महाविद्यालयात एच.आर.मध्ये पदव्युत्तर पदवी घेतली. हे शिक्षण घेत असतानाच मी दोन्ही महाविद्यालयांतील सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असे. सुरवातीला मी ‘साइड डान्सर’ म्हणून काम करू लागले. पण, आपणही इतरांप्रमाणे सर्वांसमोर,  मध्यभागी उभं राहून नृत्य करावं, असं वाटू लागलं. त्यानंतर मी मध्यभागी उभं राहून नृत्य करू लागले आणि त्यामुळं माझा आत्मविश्‍वास वाढला. नृत्य करताना मला अभिनयाचीही गोडी लागली.

अभिनय क्षेत्रामध्ये मला पहिला ब्रेक ‘वचन दिले तू मला’ या मालिकेच्या माध्यमातून मिळाला. त्यानंतर सयाजी शिंदे यांची निर्मिती असलेल्या ‘माझी माणसं’ चित्रपटातही अभिनय करण्याची संधी मिळाली. यात मी सयाजी शिंदे यांच्या मुलीची भूमिका साकारली. त्यानंतर ‘हाऊसफुल्ल’, ‘सुगरण’ या ‘शो’चं अँकरिंग केलं. दरम्यानच्या कालावधीत ‘मांगल्याचं लेणं’, ‘सोहळा गोष्ट प्रेमाची’ या नाटकांमध्येही अभिनय केला. त्याचबरोबर ‘कॉमेडी एक्‍स्प्रेस’, ‘या वळणावर’, ‘मेजवानी- परिपूर्ण किचन’ यामध्येही काम केलं. ‘मन्या- द वंडर बॉय’ या चित्रपटामध्येही अभिनयाची संधी मिळाली.

दरम्यान, अभिनय क्षेत्रातून मी दोन वर्षे ब्रेक घेतला होता. त्या कालावधीत मी फक्त जाहिरातींसाठीच काम करत होते. ‘हारपीक’, ‘डाबर च्यवनप्राश’ यांसह विविध मसाले आणि इतर जाहिरातींमध्येही काम केलं. तसेच, दाक्षिणात्य वाहिन्यांवरील जाहिरातींमध्येही काम केलं. मला खऱ्या अर्थाने मोठा ब्रेक मिळाला तो ‘अस्मिता’ या मालिकेच्या माध्यमातून.  ‘अस्मिता’ मालिकाच माझ्या करिअरची टर्निंग पॉइंट ठरली. यात मी डिटेक्‍टिव्ह अस्मिताची मुख्य भूमिका साकारत होते. या मालिकेच्या माध्यमातून आम्ही अन्याय-अत्याचारांना वाचा फोडली. याच मालिकेमुळे मी घराघरांत पोचले. त्यामुळं सर्वजण मला ‘अस्मिता’ याच नावानेच ओळखू लागले. ही मालिका तब्बल तीन वर्षे चालली आणि तिला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.
दरम्यान, अभिनेता पियुष रानडे याच्याबरोबर माझं लग्न झालं. त्यामुळं मैत्रीचं नातं प्रेमात आणि नंतर गृहिणीच्या भूमिकेत बदललं. लग्नानंतरही पियुष मला खंबीर साथ देत आहे. त्याचबरोबर सासू- सासऱ्यांचाही पाठिंबा मिळत आहे. ‘हेच कर, तेच कर...’ असा सल्ला ते मला कधीही देत नाहीत. तसेच, कोणतंही बंधन माझ्यावर लादलं जात नाही. अभिनयाचा प्रवास सुरू असताना माझ्या आईवडिलांनीही मला खंबीर साथ आणि प्रोत्साहन दिलं. ज्यावेळी मी नाटकांमध्ये वा टीव्हीवर छोट्या- छोट्या भूमिका साकारत होते, त्यावेळी माझी आई माझ्याबरोबर येत असे. घरी आल्यावर तीच जेवण बनवून घर आवरत असे. सकाळीच उठून भावाचा डबाही बनवत असे. तिने याबाबत कधीही तक्रार केली नाही. माझ्यापेक्षा आईबाबांनीच माझ्यासाठी खूप त्रास सोसला.
सध्या नाटक, चित्रपट, मालिकांसाठी मला अनेक संधी येत आहेत. मात्र, मला ‘अस्मिता’च्या तोडीचीच भूमिका साकारायची आहे. तसेच, दाक्षिणात्य भाषेतही अभिनय करायचा आहे. कारण, तिथली कामाची पद्धत खूपच चांगली असून तेथे अभिनय करणं मला नक्कीच आवडेल. सध्या बॉलिवूडचा विचार केला नसला तरी चांगली भूमिका असल्यास त्याचाही नक्कीच विचार केल्याशिवाय राहणार नाही.

(शब्दांकन - अरुण सुर्वे)

Web Title: entertainment marathi actress mayuri wagh