पाकिस्तानी गायिकेचा मराठीत 'जीव रंगला...'

टीम ई सकाळ
मंगळवार, 4 जुलै 2017

संगीताला सीमा नसते. आपण एकमेकांवर प्रेम करू या. आणि या जगाला आणखी सुंदर बनवू या.

-  नाझिया 

पाकिस्तानमध्ये उर्दू किंवा हिंदी भाषा बोलली जाते. मात्र भाषा, प्रांत आणि देशाच्याही सीमा ओलांडत मराठी गाणं आणि संगीताने पाकिस्तानी गायिकेला भुरळ घातली आहे. पाकिस्तानी गायिका नाझिया अमीन हिने चक्क मराठी गाणं गायलं असून, तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर लोकप्रिय झाला आहे. 

मूळची पाकिस्तानातील कराची येथील असणारी नाझिया अमीन मोहंमद सध्या दुबईमध्ये राहते. "एका उर्दू भाषिक पाकिस्तानी व्यक्तीने मराठी भाषेला दिलेली ही एक प्रेमाची दाद तथा सांगितिक आदरांजली आहे. भारतातील आणि जगभरातील माझ्या सर्व प्रिय मराठी भाषिक मित्रांसाठी ही भेट आहे," असे सांगत भारतीयांना आणि मराठीजनांना तिच्या आवाजातलं हे गाणं नाझियाने समर्पित केलं आहे. 

नाझियाने व्हिडिओच्या सुरवातीला याबाबत भावना व्यक्त करताना सांगितले की, "खूप खूप प्रेम, आदर, शुभचिंतन आणि प्रार्थनांसह एका देशाकडून दुसऱ्या देशाला दिलेली ही भेट आहे. सीमारेषेच्या या बाजूच्या माणसांनी त्या बाजूच्या माणसांना दिलेली ही भेट... संगीताला सीमा नसते. आपण एकमेकांवर प्रेम करू या. आणि या जगाला आणखी सुंदर बनवू या."

तसेच, या गाण्याबद्दल बोलताना नाझिया म्हणते, "आध्यात्मिक आणि सांगितिक आनंद देणारं हे सुंदर गाणं सर अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलं आहे. स्वर्गीय सुरांचा आनंद देणाऱ्या हरिहरन आणि श्रेया घोषाल यांनी हे गाणं गायलं आहे." तसेच, माझ्याकडून उच्चाराच्या चुका झाल्या असतील तर मला माफ करा, असेही नाझिया नम्रपणे नमूद करते. 
 

Web Title: entertainment news singer nazia amin sings marathi song jiv rangala