चित्रपटातील प्रत्येक जण "बादशाहो' 

संतोष भिंगार्डे  
मंगळवार, 20 जून 2017

"कच्चे धागे', "टॅक्‍सी नं. 9211', "द डर्टी पिक्‍चर', "वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई' यांसारखे यशस्वी चित्रपट देणारे दिग्दर्शक मीलन लुथरिया आता "बादशाहो' चित्रपटाद्वारे पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. "बादशाहो' या ऍक्‍शन थ्रिलर चित्रपटात तगडी स्टारकास्ट आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याशी मारलेल्या गप्पा... 

"कच्चे धागे', "टॅक्‍सी नं. 9211', "द डर्टी पिक्‍चर', "वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई' यांसारखे यशस्वी चित्रपट देणारे दिग्दर्शक मीलन लुथरिया आता "बादशाहो' चित्रपटाद्वारे पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. "बादशाहो' या ऍक्‍शन थ्रिलर चित्रपटात तगडी स्टारकास्ट आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याशी मारलेल्या गप्पा... 

"द डर्टी पिक्‍चर' तुम्ही दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट यशस्वी झाला. एवढंच नाही; तर या चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. त्यानंतर एकापाठोपाठ एक चरित्रपट येऊ लागले. चरित्रपटचा हा ट्रेण्ड तुम्ही सेट केलात असं काही जण म्हणतात. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? 
- एवढं मोठं क्रेडिट मी घेऊ शकत नाही आणि मलादेखील असं काही वाटत नाही. मी एक चांगला चित्रपट बनवला आणि तो यशस्वी झाला, एवढंच मी सांगेन. मी नेहमीच माझ्या चित्रपटात कॉमेडी, ड्रामा, रोमान्स, ऍक्‍शन... अशा सर्वच गोष्टींचा समावेश करतो. कारण लोकांना थिएटरमध्ये गेल्यानंतर आपले पैसे वसूल झाले असं वाटलं पाहिजे, या मताचा मी आहे. त्यामुळे आम्ही चित्रपट एन्टरटेन्मेंट, एन्टरटेन्मेंट आणि एन्टरटेन्मेंटसाठीच बनवतो. आमचं ते ब्रीदवाक्‍य आहे आणि आम्ही ते सोडणार नाही. खरं तर मी डर्टी पिक्‍चर बनवायला घेतला तेव्हा काही मंडळींनी मला मूर्खात काढलं होतं. "वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई' यशस्वी झाल्यानंतर तुला कोणताही मोठा स्टार नाही म्हणणार नाही आणि अचानक तू स्त्री-प्रधान चित्रपट का बनवत आहेस? असं काही जण मला म्हणाले. पण मी त्याकडे लक्ष दिलं नाही. कारण माझा माझ्यावर आणि माझ्या स्क्रीप्टवर विश्‍वास होता. शिवाय मी पुरुषप्रधान चित्रपट बनवला असता तर माझ्यावर एक प्रकारचा शिक्का बसला असता. हा केवळ अशाच प्रकारचे चित्रपट बनवतो, असेही टोमणे काही जणांनी मारले असते. त्यामुळे मी नायिकाप्रधान चित्रपटच बनवायचा असा निर्णय घेतला. 

तुमचा आता येणारा "बादशाहो' हा चित्रपट मल्टिस्टारर आहे. 
अजय देवगण, इमरान हाश्‍मी, इलियाना डिक्रूस, इशा गुप्ता, विद्युत जामवाल, संजय मिश्रा अशी तगडी स्टारकास्ट आहे. या सर्व कलाकारांना घेऊन चित्रपट बनवणं अवघड गेलं का? 

- नाही. कारण यापूर्वीही मी अनेक कलाकारांबरोबर काम केलं आहे. त्या सर्वच कलाकारांचा माझ्यावर विश्‍वास आहे. महत्त्वाचं म्हणजे मी कोणत्याही कलाकारावर अन्याय होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतो. त्यामुळे हे सगळे कलाकार माझ्याबरोबर काम करण्यास सदैव तयार असतात. कारण आम्ही चित्रपट कसा चांगला बनेल याकडे लक्ष देत असतो. "बादशाहो' चित्रपटात रणदीप हुडाही आहे. जेव्हा त्याला मी त्याची भूमिका ऐकवली तेव्हा काहीसा तो संभ्रमात पडलेला मला दिसला. या सर्व कलाकारांच्या मांदियाळीत आपल्याला किती स्कोप असेल असं त्याला वाटलं. माझ्या ही गोष्ट लक्षात आली. मग मी त्याला समजावलं. त्याला सांगितलं की, तुझी ही भूमिका तुला एक पाऊल पुढे घेऊन जाईल. 

"बादशाहो' चित्रपटाच्या शीर्षकातील गंमत काय आहे? 
- "बादशाहो' या नावावरून ही कथा कुणा एकाची आहे असं सर्वांना वाटत असलं, तरी तसं काहीही नाही. या चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखा बादशाहो आहे. ही कथा आहे 1975 मधील. तेव्हा आणीबाणीचं वातावरण होतं. सगळीकडे छापे टाकण्यात आले होते. राजेशाही घराण्यांवर छापे टाकून सोने जप्त करण्यात आले होते. तेव्हाच्या काळात घडणारी ही कथा आहे. यातील बहुतेक व्यक्तिरेखा ग्रे शेड्‌सच्या आहेत. रजत अरोरा आणि मी विचार करूनच स्क्रीन प्ले बांधलेला आहे. हा चित्रपट म्हणजे एक वेगळ्या प्रकारची बिर्याणी आहे. 

1975 मधील आणीबाणीचा काळ उलगडताना काही विशेष अभ्यास करावा लागला का? 
- हा काळ दाखविताना मला फारसे कष्ट घ्यावे लागले नाहीत. कारण यापूर्वी मी "वन्स अपॉन टाईम इन मुंबई' हा चित्रपट बनवला होता. त्यामध्ये 1976 चा काळ दाखवला होता. तो काळही आणीबाणीचाच होता. आमचा हा नवीन चित्रपट त्या काळातील असला तरी आताचा काळदेखील त्यामध्ये दाखवला आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण जोधपूर, जैसलमेर आणि बिकानेर येथे झालं आहे. ही कहाणी राजस्थानमधील आहे. या चित्रपटासाठी आम्ही पाच हजार किलोमीटर प्रवास केला आहे. प्रत्येक पात्राचं दिसणं वेगळं आहे. पाच गाणी आहेत. त्यातील एक गाणं कबीर कॅफे या बॅण्डचं आहे. तसेच अन्य गाणी आहेतच. 

अजय देवगणबरोबर तुमचा हा चौथा चित्रपट आहे. तसेच इलियाना डिक्रूझ आणि इशा गुप्ता यांची तुम्ही निवड केलीत त्याचीही एक वेगळी कहाणी आहे. त्याबद्दल काही... 
- अक्षयकुमारचा "एअरलिफ्ट' हा चित्रपट मला पाहायचा होता. जेव्हा मी हा चित्रपट पाहायचं ठरवलं तेव्हा तो काही थिएटरमधून उतरलेला होता. फक्त वडाळा येथील आयमॅक्‍समध्ये तो लागलेला होता. मी तिथे हा चित्रपट पाहण्यासाठी गेलो. चित्रपट पाहिल्यानंतर अभिनंदन करण्यासाठी अक्षयकुमारला फोन केला. तेव्हा त्याने मला विचारलं की आता तू कुठे आहे? मी म्हटलं, वडाळ्यात आहे. तेव्हा तो म्हणाला, की मी आर. के. स्टुडिओमध्ये शूटिंग करीत आहे. तिथे तू ये आपण एकत्र लंच करू. त्याप्रमाणे मी गेलो आणि तिथे माझी भेट इलियाना आणि इशाबरोबर झाली. तेव्हाच मी "बादशाहो'साठी त्यांना घेण्याचं नक्की केलं. कारण त्या वेळी नायिका कोण कोण घ्याव्यात, असा विचार माझ्या डोक्‍यात घोळत होता आणि अचानक त्यांची भेट झाल्यामुळे त्यांना घेण्याचं नक्की केलं. अजयबद्दल सांगायचं झालं तर तो गुणी कलाकार आहे. "कच्चे धागे', "चोरी चोरी', "वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई' आणि आताचा हा चौथा चित्रपट माझा त्याच्याबरोबर आहे. त्याच्याकडून कसं काम काढून घ्यायचं हे मला ठाऊक आहे. काम करताना त्याच्या मनावर कोणतंही दडपण नसतं. 

अलीकडे बिग बजेट चित्रपटांबरोबरच स्मॉल बजेटचे चित्रपटही चांगला व्यवसाय करीत आहेत. त्याबद्दल... 
- हे खरं आहे. सध्या स्मॉल बजेटचे चित्रपट कोट्यवधी रुपयांची कमाई करीत आहेत. हिंदी मीडियम, मसान या चित्रपटांनी चांगली कमाई केली. मला अशी एखादी चांगली स्क्रीप्ट मिळाली तर नक्कीच मी चित्रपट काढीन. इरफान खानला घेऊन चित्रपट बनवायची इच्छा आहे. 

Web Title: Everyone in the film "Badshaho"