
मराठी चित्रपट, मालिका व नाटकांमध्ये दमदार अभिनयासाठी वाखाणले गेलेले अभिनेते डॉ. गिरीश ओक यांनी कारकिर्दीतील पन्नासाव्या नाटकाचा टप्पा गाठला आहे. रंगभूमीवरील अडतीस वर्षांच्या वाटचालीचा वेध घेण्यासाठी नीला शर्मा यांनी त्यांच्याशी केलेली बातचीत...
डॉ. गिरीश ओक यांची नाट्य अभिनयाची पन्नाशी
सगळ्यात पहिलं नाटक कोणतं केलं? त्यानंतरचा प्रवास कसा झाला?
डॉ. ओक : ‘साहेब विरुद्ध मी’ हे प्रभाकर नेवगी लिखित व शशिकांत निकते दिग्दर्शित नाटक मी १९८४ मध्ये केलं. ते पाहून प्रसिद्ध रंगकर्मी मोहन कोठीवान यांनी मला नाट्यक्षेत्रात यायला प्रोत्साहन दिलं. त्यांच्यासारखाच मीही नागपूरचा. त्यांच्याबरोबर मी तीन नाटकांतून भूमिका केल्या. मग मुंबईत आलो. एका नटाला शक्य नाही म्हणून त्याची भूमिका अवघ्या तीन दिवसांत करण्याचं आव्हान माझ्यासमोर आलं. मी ते स्वीकारायचा निर्धार केला. तेव्हा मी भवानी शंकर रस्त्यावरील विदर्भ वैभव मंदिरात दहा रुपये कॉट, या दराने राहात होतो. आणखी सात-आठजण त्या एकाच खोलीत राहात. त्यांना माझ्या आवाजाचा त्रास नको म्हणून जिन्यात बसून रात्रभरात नाटक पाठ केलं दुसऱ्या दिवशी तालमीला उभा राहिलो. शिवाजी मंदिरात दुपारी साडेचारला झालेला ‘मखमल’ या नाटकाचा तो प्रयोग मी विसरूच शकत नाही. यानंतर अशीच रिप्लेसमेंट असलेली दोन-तीन नाटकं केली.
‘तो मी नव्हेच,’ करताना आलेले अनुभव सांगा?
डॉ. ओक : थोड्या वाटचालीनंतर आचार्य अत्रे यांनी लिहिलेल्या व प्रभाकर पणशीकर यांनी लखोबा लोखंडे हे पाचपेडी पात्र रंगवून अजरामर केलेल्या ‘तो मी नव्हेच’ या नाटकात संधी मिळाली. यातील साक्षीदार अग्निहोत्री, ही भूमिका साकारताना ध्यानीमनीही नव्हतं की, कालांतराने हेच नाटक नव्या संचात येईल, तेव्हा मी लखोबाच्या भूमिकेत असेन. स्वतः पणशीकरांनी समोर बसून मी साकारलेल्या लखोबाचे शहाण्णव प्रयोग पाहिले. त्यांनी महत्त्वाचे तंत्र व मंत्र सांगितले तरी माझ्या पद्धतीने भूमिका विकसित करण्याचं स्वातंत्र्य दिलं. मधुकर तोरडमल यांच्याबरोबर ‘तरुण तुर्क’ नाटकाच्या नव्या रूपात मला संधी मिळाली. त्यांच्याच बरोबर ‘बेईमान’ हे नाटक करताना मी छोटी भूमिका करायचो, शिवाय त्यांचा सहकारी म्हणून जबाबदारीही सांभाळली. मग आलेल्या ‘दीपस्तंभ’ने मला नवा तजेला दिला. माझी खास ओळख निर्माण झाली. मध्यंतरी हे सारं सोडून नागपूरला परत जायचा विचार मनात घोळायचा. पण या नाटकाने कलाटणी दिली आणि मराठी रंगभूमीच्या मुख्य प्रवाहातील अभिनेता म्हणून माझी ओळख वाढत गेली. पुढे ज्याचा त्याचा प्रश्न, कुसुम मनोहर लेले, षडयंत्र, सुंदर मी होणार, अभिनेत्री, लव्हबर्ड्स आदी नाटकांमधून मी येथपर्यंत येऊन पोहोचलो. या पन्नास नाटकांपैकी काहींमध्ये मी एकापेक्षा जास्त भूमिका केल्या आहेत.
या प्रवासात मराठी रंगभूमीवर कोणते बदल ठळकपणे जाणवले?
डॉ. ओक : कारकिर्दीच्या सुरवातीला नाटकांमध्ये प्रायोगिक, समव्यावसायिक, व्यावसायिक यांसारखे फरक केले जात. हळूहळू त्यांच्यातील विभाजक रेषा पुसट होत गेल्या. ताकदीच्या लेखक, दिग्दर्शक, अभिनेत्यांनी मांडणीची पठडीच लवचिक केली. प्रायोगिकमधील नवे विषय, आशय व सादरीकरणाची उंची व्यावसायिक नाटकांच्या पंखांना बळ देऊ लागली. आर्थिक गणितं लक्षात घेऊन पूर्वीसारखी तडजोड करण्यापलीकडे व्यावसायिक रंगभूमी गेली. नव्या दमाच्या समर्थ रंगकर्मींप्रमाणेच नवा रसिक प्रेक्षकही तयार होऊ लागला.
वेगवेगळ्या भूमिकांनी तुम्हाला काय दिलं?
डॉ. ओक : विविध प्रकारच्या व्यक्तिरेखांचा जीवनपट अनुभवताना माझ्याही वैचारिक व भावनिक कक्षा विस्तारल्या. काही पात्रांच्या तोंडची मार्मिक, संदेशपर किंवा आदर्श वाटणारी वाक्यं माझ्या मनात खोलवर रुतून बसतात. प्रत्यक्ष जीवनात मी त्यानुसार वागतो का, यावर जणू ती जागता पहारा ठेवतात. निरनिराळ्या लेखकांच्या
कसदार भाषेचा परिणाम नकळतपणे होतो. मी फक्त आयुर्वेदतज्ज्ञ म्हणूनच कार्यरत राहिलो असतो तर कदाचित एवढ्या मोठ्या संख्येने लोकांना बरं करू शकलो असतो का? पण नाटकांच्या माध्यमातून जगाच्या पाठीवर कुठे कुठे फिरून मराठी माणसांच्या मनात, चांगली नाट्यकृती बघण्याचा आनंद पेरता आला. या टप्प्यावर मी खूप समाधानी आहे. अजून पुष्कळ प्रयोग करायचे आहेत. अभिनयाप्रमाणेच मी काव्यलेखन, सूत्रसंचालन, संपादन आदींमध्येही वेगळं काही करत असतो. निरनिराळ्या माध्यमांतून चौफेर अभिव्यक्तीतील समाधान शब्दातीत आहे.
Web Title: Fifty Years Of Drama Acting Dr Girish Oak Interview
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..