esakal | ज्येष्ठ चित्रपट संकलक वामन भोसले यांचे निधन

बोलून बातमी शोधा

film editor waman bhosale passed away
ज्येष्ठ चित्रपट संकलक वामन भोसले यांचे निधन
sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई : दो रास्ते, रॉकी, आंधी, अंगूर, दोस्ताना, अग्निपथ, खलनायक, सौदागर, मि. इंडिया या हिंदी चित्रपटांबरोबरच कैरी आणि सर्जा या मराठी चित्रपटांचे संकलन करणारे ज्येष्ठ चित्रपट संकलक वामन भोसले (वय 89) यांचे सोमवारी पहाटे राहत्या घरी वृद्धापकाळानं निधन झालं. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगी, तीन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर गोरेगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

वामन भोसले यांनी हिंदीतील मोठमोठ्या निर्मात्या व दिग्दर्शकांबरोबर काम केले होते. त्यात गुलजार, राज खोसला, सुभाष घई, अनिल गांगुली, शेखर कपूर, बोनी कपूर, महेश भट यांचा समावेश आहे. 1978 मध्ये इन्कार या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात त्यांना गौरविण्यात आले होते. सन 2019 मध्ये महाराष्ट्र सरकारने त्यांना राज कपूर जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला होता. हिंदीबरोबरच राजदत्त यांच्या सर्जा आणि अमोल पालेकर यांच्या कैरी या मराठी चित्रपटांचे संकलन त्यांनी केले होते. निर्माते व दिग्दर्शक सुभाष घई यांनी सोशल मीडियावर वामन भोसले यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ते शोक व्यक्त करताना म्हणतात, की माझ्या पहिल्या 'कालीचरण' या चित्रपटाचे संकलन त्यांनी केले. ते नंतर 'खलनायकपर्यंत माझ्या सर्व चित्रपटाचे एडिटर होते. त्यांनी मला 'ताल'सारख्या चित्रपटांच्या एडिटिंगसाठी प्रेरणा दिली, एक उत्तम शिक्षक होते.

ज्येष्ठ चित्रपट संकलक वामन भोसले यांचा अल्पपरिचय :

वामन भोसले यांचा जन्म 19 फेब्रुवारी १९३२ रोजी गोव्यातील पामबुरपा (बार्देश) या छोट्याशा गावी झाला. त्यांचे शिक्षण गोव्यातील मयडे येथे झाले. १९५५ च्या सुमारास वामन भोसले प्राथमिक शिक्षणानंतर पुढील शिक्षणासाठी मुंबईत आले. तेव्हाचे प्रसिद्ध चित्रपट संकलक डी.  एन. पै हे त्यांचे आदर्श होत. डी. एन. पै यांनी वामन भोसले यांना संकलनाच्या क्षेत्रात पदार्पण करण्याची सूचना केली. त्यांच्याकडेच त्यांनी संकलन शिकण्यास सुरुवात केली. श्री. भोसले यांनी फिल्मीस्थान स्टुडिओत सुमारे बारा वर्षे संकलनाचे काम केले. त्यांनी पडोसन, गुमनाम, वह कौन थी, पेईंग गेस्ट, ताज, हीर, वचन, नागीन वगैरे चित्रपटांसाठी त्यांनी सहायक संकलनाचे काम केले. नंतर 1967 मध्ये त्यांनी ‘दो रास्ते’ या चित्रपटाद्वारे स्वतंत्रपणे चित्रपट संकलक म्हणून काम करायला सुरुवात केली. त्यांच्या कामाचे चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी कौतुक केले. एकापाठोपाठ एक चित्रपट मिळत गेले. वेषभूषा विभागातही त्यांनी काम केले. चौराहा, डिस्को डान्सर, खुदा कसम या चित्रपटांसाठी त्यांनी वेषभूषेचे काम केले. ‘नमकिन’ चित्रपटात शबाना आझमी उंच सुळक्यावरून उडी घेतानाचे दृष्य, ‘गुलाम’ चित्रपटातील आमिर खानचा रेल्वे गाडीसमोर धावतानाचा फोटो वगैरेच्या संकलनासाठी भोसले यांची भरपूर स्तुती झाली होती. गुलामसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता.

वामन भोसले यांनी काम सुरू केले, तेव्हा आजच्या सारखे तंत्रज्ञान नव्हते. त्यांनी राज खोसला, गुलजार, रवी टंडन, अनिल गांगुली, सुनील दत्त, अशोक गायकवाड, महेश भट, नरेंद्र बेदी, शेखर कपूर, सुभाष घई, राज सिप्पी, विक्रम भट अशा अनेक दिग्गजांसाठी संकलक म्हणून काम केले. मेरे गांव मेरा देश, दो रास्ते, दोस्ताना, गुलाम, अग्निपथ, परिचय, मौसम, आंधी, कालिचरण, कर्ज, साहीब, राम लखन, सौदागर आदी चित्रपटांच्या संकलनाची धुरा त्यांनी सांभाळली. वामन भोसले यांना ‘इन्कार’ या चित्रपटासाठी 1978 चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. तसेच 1992 साली आलेल्या सौदागर चित्रपटासाठी फिल्मफेअर, 1997 मध्ये चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी पुणे फिल्म्स डिव्हीजनचा पुरस्कार मिळाला होता. 1998 मध्ये गुलाम साठी अनेक पुरस्कार मिळाले. 2003 साली गोव्यात इफ्फीमध्ये त्यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता. 2008 मध्येही बिमल राय जीवनगौरव पुरस्कार मिळाला. हिंदीबरोबरच काही मराठी चित्रपटांसाठी त्यांनी संकलक म्हणून काम केले.