पहिल्यांदाच फडामध्ये ‘पाऊले चालती पंढरीची वाट...’

तमाशा कलेचा तीन पिढ्यांचा वारसा असलेले काळू-बाळू वयाच्या १६ व्या वर्षी तमाशात उभे राहिले आणि त्यांनी तमाशा म्हणजे काळू-बाळू असे समीकरण रूढ करून टाकले. त्यांच्या पोलिस हवालदारांच्या भूमिकांनी रसिकांवर अशी मोहिनी घातली की, त्यांची मूळ नावे महाराष्ट्र विसरून गेला आणि काळू-बाळू हीच त्यांची ओळख बनली.
anand shinde
anand shindesakal
Updated on

- आनंद शिंदे

मराठी तमाशासृष्टीतील ‘काळू-बाळू’ जोडीने इतिहास रचला. त्यांच्यासोबत मी खूप कार्यक्रम केले. असाच एक कार्यक्रम चालू असताना मी माझ्या वडिलांचे ‘पाऊले चालती पंढरीची वाट’ हे गाणे तमाशात गायले आणि मायबाप रसिकांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले. तमाशाच्या फडात वारीचे भक्तिमय वातावरण तयार झाले...

तमाशाच्या फडात माझ्या गाण्यातून जेव्हा पांडुरंग उभा केला तेव्हा एकच हरिनाम दुमदुमला. मनोरंजनाचा हुकमी एक्का म्हणून तमाशा या लोककलेकडे एकेकाळी पाहिले जात असे. विशेषत: ग्रामीण भागातील करमणुकीचे साधन म्हणूनही लोक तमाशाकडे पाहत असत. ज्या काळामध्ये तमाशाला राजाश्रय लाभला होता, त्या वेळी शाहीर होनाजी बाळा, शाहीर अनंत फंदी, शाहीर सगनभाऊ असे नामांकित शाहीर तमाशा फड गाजवत होते. राजदरबारी हजेरी लावत होते. त्यानंतरच्या काळात मात्र राजाश्रयाखाली असणारा तमाशा लोकाश्रयाखाली विस्तारत जाऊ लागला. मराठी तमाशासृष्टीतील ‘काळू-बाळू’ची जोडी हा इतिहास बनला. तमाशा कलेचा तीन पिढ्यांचा वारसा असलेले काळू-बाळू वयाच्या १६ व्या वर्षी तमाशात उभे राहिले आणि त्यांनी तमाशा म्हणजे काळू-बाळू असे समीकरण रूढ करून टाकले. त्यांच्या पोलिस हवालदारांच्या भूमिकांनी रसिकांवर अशी मोहिनी घातली की, त्यांची मूळ नावे महाराष्ट्र विसरून गेला आणि काळू-बाळू हीच त्यांची ओळख बनली.

जवळजवळ १५ वगनाट्य काळू-बाळू तमाशा मंडळाने सादर केली, ज्यात ‘जहरी प्याला’सारख्या सामाजिक, राजकीय घडामोंडीवरील भाष्य करणारी वगनाट्ये सादर केली. महाराष्ट्रातील बहुतेक खेड्यापाड्यांतून नित्यनैमित्तिक स्वरूपाचे जत्रा-उरूस भरत असत. त्यांत सर्वत्र तमाशाचे खेळ व्हायचे. गावागावांत, तालुक्याच्या ठिकाणी काळू बाळू यांचा तमाशा वग ठेवण्यात यायचा. मला आठवते, पूर्वी आत्तासारखे मोठे डिजिटल मंडप नव्हते. साध्या तंबूत हे कार्यक्रम व्हायचे; पण या कार्यक्रमांना खूप गर्दी व्हायची. ग्रामीण भागासह तालुक्याच्या ठिकाणी मनोरंजन करण्याचे दुसरे माध्यम नव्हते. त्यामुळे तमाशा, वगनाट्य लोकसंगीत, भारुड अशा कार्यक्रमांना गर्दी व्हायची.

एकदा असाच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काळू-बाळू यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पहिल्यांदाच वगनाट्यात लोकसंगीत एकत्र करून नवीन प्रयोग करण्याचे काळू-बाळू यांनी ठरवले होते. ‘माझा नवीन पोपट’ खूपच गाजल्यामुळे यात मला सहभागी करण्यात आले. पोपट गाणे चित्रपट-ऑर्केस्ट्रात गाजत होते; पण ग्रामीण भागातील लोकांचे प्रेम पाहून रसिकांसमोर ते सादर करण्यात मला खूप आनंद होत होता. कोल्हापूर जिल्ह्यात जेव्हा आमचा कार्यक्रम झाला तेव्हा पहेलवानालाही मी माझ्या गाण्यावर ठेका धरायला लावला. मग कोल्हापूर, सांगली, सातारा या भागात काळू-बाळू आणि आम्ही खूप कार्यक्रम केले. लोकांचा प्रतिसाद, हारतुरे पाहता काळू-बाळू यांनी मला आपला मुलगा मानलं. माझ्या पत्नीला बोलले की, आजपासून आनंद आमच्यासोबत कार्यक्रम करेल. त्यांनी व त्यांच्या घरातील लोकांनी माझ्या पत्नीला खूप प्रेम दिले. पुढे आम्ही एकत्र खूप कार्यक्रम केले. असाच एक कार्यक्रम चालू असताना मी माझ्या वडिलांचे ‘पाऊले चालती पंढरीची वाट’ हे गाणे या तमाशात गायले आणि पाहतो तर काय, समोरचे मायबाप रसिक प्रेक्षकांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले. तमाशाच्या फडात वारीचे भक्तिमय वातावरण तयार झाले.

anand shinde
उत्तम शिक्षण यशाची गुरुकिल्ली

त्यामुळे त्या गाण्यानंतर पुढे कार्यक्रम बंद करण्यात आला. कारण त्या फडात एक भक्तिमय वातावरण तयार झाल्यानंतर गाणे व तमाशा करणे त्यांना पटले नाही. तेव्हा काळू-बाळू बोलले की, ‘‘साक्षात विठ्ठलदर्शन तू गाण्यातून उभे केलेस. तुझ्या आवाजातून आमचे गुरू स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे यांचे दर्शन आम्हाला झाले. तुझ्या आवाजाने प्रल्हाद शिंदे कायम जिवंत राहतील.’’ माझ्या वडिलांच्या गाण्यावर काळू-बाळू खूप प्रेम करत होते. त्या कार्यक्रमात ते गाणे ऐकून ते खूप रडले व मला मिठीत घेऊन दाद दिली. मी त्यांच्या पाया पडलो, असे वेगळेच वातावरण फडात तयार झाले होते. अशा हजरजबाबी पण प्रेमळ व हळव्या काळू-बाळू यांचा सहवास मला लाभला. आज आपल्याला तमाशा वगनाट्य माहीत नाही; पण आमच्या जुन्या पिढीला काळू-बाळू हे माहीत आहेत. त्याचे ते प्रबोधनात्मक कार्यक्रम, ज्यातून ग्रामीण भागातील प्रत्येक घटकाचे दर्शन व्हायचे. आज कितीही टीव्ही शो करा, पण ते होणार नाही. ते म्हणतात ना, आपल्या गावाच्या लोकांचे जीवन जगण्याची रीत पाहण्यासाठी त्या मातीशी एकरूप होणे गरजेचे असते, ती एकरूपता आता संपली आहे, असे जाणवते. मी त्यानंतर अनेक लोककलावंतांसोबत कार्यक्रम केले; पण काळू-बाळू यांच्यासोबतच्या कार्यक्रमांना जी मज्जा यायची, ती कधी आलीच नाही.

vijayaanandmusicpvtltd@gmail.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com