
'गंदी बात' फेम अभिनेत्री गहना वशिष्ठला रविवारी अटक करण्यात आली.
"गहना वशिष्ठ ऊर्फ वंदना तिवारी ही पूर्णपणे निर्दोष आहे. ती कोणत्याच पॉर्न फिल्म रॅकेटमध्ये सहभागी नाही. जीव्ही स्टुडिओ या कंपनीची निर्माती आणि दिग्दर्शक म्हणून तिने फक्त अशाच चित्रपटांची निर्मिती व दिग्दर्शन केले आहे ज्यांना कायद्याची परवानगी असेल आणि फार फार तर त्यांचं वर्गीकरण 'इरोटिका' (कामुक) या विषयात केले जाऊ शकेल", असं स्पष्टीकरण 'गंदी बात' फेम अभिनेत्री गहना वशिष्ठच्या टीमकडून देण्यात आलं आहे. गहनाला रविवारी अटक करण्यात आली. चित्रपट, मालिका तसंच वेब सीरिजमध्ये संधी मिळवून देण्याच्या नावाखाली तरुणींचे अश्लील व्हिडीओ पॉर्न साईटवर अपलोड करीत लाखोंची कमाई करणाऱ्या रॅकेटचा मालमत्ता कक्षाने पर्दाफाश केला. याप्रकरणी आता गहनाच्या कायदेशीर आणि प्रेस टीमचे प्रमुख फ्लीन रेमेडीओज यांनी त्यांची बाजू मांडली आहे.
गहनावर खोटे आरोप करण्यात आले असून व्यावसायिक स्पर्धकांनी तिला अडकवण्याचा प्रयत्न केला आहे, असंही त्यांनी म्हटलं. "गहनाच्या व्यावसायिक स्पर्धकांनी तिला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. आम्हाला भारतीय न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. दुर्दैवाने मुंबई पोलिसांनी, जी जगातील सर्वोत्कृष्ट पोलीस दल म्हणून ओळखली जाते, त्यांनी गहनाच्या इरॉटिका फिल्म मेकिंगची तुलना हार्ड पॉर्नशी केली आहे. इरॉटिका, कामुक, बोल्ड फिल्म्स आणि हार्ड पॉर्न यांमध्ये बराच फरक आहे. पण दुर्दैवाने पोलिसांनी या सगळ्यांची गणती एकातच केली आहे. आम्हाला आशा आहे की न्यायालय हा फरक ओळखू शकेल आणि गहनाला न्याय मिळू शकेल", असं ते पुढे म्हणाले.
हेही वाचा : अनुष्काच्या मुलीपासून हार्दिकच्या मुलापर्यंत; जाणून घ्या स्टारकिड्सच्या नावांचा अर्थ
काय आहे प्रकरण?
४ फेब्रुवारी रोजी मढ येथील ग्रीन पार्क बंगला येथे मालमत्ता कक्षाने छापा टाकला, तेव्हा अर्धनग्न अवस्थेत तरुण-तरुणींच्या अश्लील कृत्याचे चित्रीकरण सुरू होते. त्यानुसार पथकाने दोन महिलांसह पाच जणांना अटक केली. या प्रकरणाच्या तपासात गहना वशिष्ठचे नाव समोर आले. गहनाचे स्वत:चे प्रॉडक्शन हाऊस आहे. गहना वेब सीरिज, शॉर्ट फिल्मच्या नावाखाली पॉर्नोग्राफिक व्हिडीओ तयार करून ते वेब साइटवर अपलोड करायची, असा तिच्यावर आरोप आहे. या आरोपाखाली पोलिसांनी गहनाला अटक केली.