दाक्षिणात्य सिनेमाचा आभासी दबदबा

अलिकडे बॉलीवूडच्या तुलनेत दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीचे सिनेमे भारतीय प्रेक्षकांना जास्त भुरळ घालताना दिसत आहेत. ‘पुष्पा’, ‘केजीएफ-२’, ‘आरआरआर’सारखे चित्रपट तुफान हिट ठरलेत.
Movies
MoviesSakal
Summary

अलिकडे बॉलीवूडच्या तुलनेत दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीचे सिनेमे भारतीय प्रेक्षकांना जास्त भुरळ घालताना दिसत आहेत. ‘पुष्पा’, ‘केजीएफ-२’, ‘आरआरआर’सारखे चित्रपट तुफान हिट ठरलेत.

- गिरीश वानखेडे

अलिकडे बॉलीवूडच्या तुलनेत दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीचे सिनेमे भारतीय प्रेक्षकांना जास्त भुरळ घालताना दिसत आहेत. ‘पुष्पा’, ‘केजीएफ-२’, ‘आरआरआर’सारखे चित्रपट तुफान हिट ठरलेत. त्या तुलनेत अक्षय कुमार, कंगना रनौत यांच्या चित्रपटांसोबत अनेक हिंदी सिनेमे बॉक्स ऑफिसवर धडाधडा कोसळत आहेत. याचे नेमके काय कारण आहे? प्रपोगंडा सिनेमे प्रेक्षकांना आवडत नाहीत, साऊथच्या सिनेमाने बॉलीवूडला मागे टाकले की ऑउट ऑफ बॉक्स विचार करणे बॉलीवूडने सोडून दिले का, यावरचा खास फोकस...

अक्षय कुमार, कंगना रनौत यांसारख्या आघाडीच्या बॉलीवूडच्या स्टारचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर एकापाठोपाठ एक कोसळत आहेत. अक्षय कुमारचे तर पाच चित्रपट ओळीने फ्लॉप झालेत. यात ‘बेलबॉटम’, ‘लक्ष्मी’, ‘अतरंगी रे’, ‘बच्चन पांडे’ आणि त्यात आता ‘पृथ्वीराज चौहान’ या चित्रपटाची भर पडली आहे. अक्षय कुमारचा विचार केला तर त्याने केलेल्या सहा चित्रपटांपैकी ‘सूर्यवंशी’ हिट झाला होता. मात्र ‘सूर्यवंशी’मध्ये अजय देवगण, रणवीर सिंगसारखे यशस्वी आणि कसलेले नटही होते. त्यामुळे या चित्रपटाचे श्रेय एकट्या अक्षय कुमारला देता येणार नाही.

अक्षय कुमारप्रमाणे कंगना रनौतचा ‘धाकड’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला. कंगनाचे ‘थलायवी’, ‘पंगा’, ‘जजमेंटल है क्या’ हे तीन चित्रपट ओळीने सुपरफ्लॉप झालेत. ‘धाकड’ हा त्यातील सलग चौथा अपयशी चित्रपट आहे. मध्यंतरी कंगनाचा ‘मनकर्णिका’ हा सुपर हिट झाल्याचे सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्षात हा चित्रपट ओव्हरेटेड होता, फारशी कमाई या चित्रपटाने केली नाही. ‘धाकड’ ही कंगनाची महिलाप्रधान ॲक्शन फिल्म होती. मात्र हॉलीवूडमध्ये या प्रकारच्या फिल्म येऊन गेल्यात. ‘धाकड’ची पटकथा, संगीत अतिशय कमजोर होते. प्रेक्षकांनी ओरीजनल हॉलीवूड फिल्म बघणे पसंत केले. त्यामुळे कंगनाच्या गाजावाजा केलेल्या ‘धाकड’कडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. त्यामुळे कंगनाचा सलग चौथा चित्रपट आपटला आहे.

‘धाकड’ आणि ‘पृथ्वीराज चौहान’ या चित्रपटांचा विचार करता दोन्हींची पटकथा अतिशय कमकुवत होती. चित्रपट भव्यदिव्य होते; मात्र पटकथेवर विशेष मेहनत घेतली गेली नाही. संगीत लक्षात ठेवण्याजोगे नव्हते. ‘पृथ्वीराज चौहान’च्या भूमिकेत अक्षय कुमारला लोकांनी मूळात स्वीकारले नाही. कॉमेडी अक्षय कुमारची सिरीयस भूमिका लोकांच्या पचनी पडली नाही. अक्षय कुमारची ‘बच्चन पांडे’ ही फिल्म एका साऊथ सिनेमाची रिमेक होती. ‘पृथ्वीराज चौहान’ची पटकथा सशक्त तर नव्हतीच, मात्र त्यात अनेक कच्चे दुवे होते.

प्रेक्षकांना सिनेमागृहापर्यंत खेचून आणण्यासाठी जो वेगळेपणा लागतो, तो या सिनेमांमध्ये नव्हता. किंबहुना या फिल्म सामान्य श्रेणीतील फिल्म होत्या, असे आपण म्हणू शकतो.

सर्वच प्रपोगंडा फिल्म चालत नाहीत

देशात सध्या प्रपोगंडा चित्रपटांची एक लाट आली आहे. मात्र सर्वच प्रपोगंडा फिल्म चालत नाहीत, हे आता सिद्ध झाले. ‘काश्मीर फाईल्स’ जोरात चालली. तो विषय ज्वलंत होता. त्यामध्ये स्टारडम नव्हता. इंग्रजीत ‘अर्ली बर्ड ॲडवांटेज’ असा वाक्‌प्रचार आहे. तो ॲडवांटेज ‘काश्मीर फाईल’ला मिळाला. अनेक जण प्रपोगंडा फिल्म करतात. मात्र त्या ओळीतील पहिली फिल्म हिट होऊन जाते. मात्र असले चित्रपट रिपीट व्हायला लागले तर प्रेक्षकांच्या ते पचनी पडत नाहीत. त्यामुळे प्रपोगंडा फिल्म प्रमोशनचा फायदा एखाद्या चित्रपटाला मिळून जातो. दुसऱ्या चित्रपटाला मिळेल याची शास्वती नसते. ‘पृथ्वीराज चौहान’चे प्रमोशन जोरदार करण्यात आले. अक्षय कुमारने फिल्मच्या प्रमोशनसाठी गंगेत डुबकी लावली, महाआरती केली. अगदी गृहमंत्र्यांपासून उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांसाठी विशेष शो ठेवला. आपल्या शालेय पाठ्यपुस्तकात हिंदू राजांबद्दल फार माहिती नाही, असे विधानही केले. माध्यमांमध्ये एवढी चर्चा झालेला ‘पृथ्वीराज चौहान’ सिनेमा मात्र प्रत्यक्षात प्रेक्षकांना चित्रपटगृहापर्यंत खेचून आणण्यात अपयशी ठरला. त्यामुळे प्रपोगंडा केल्यामुळे प्रत्येक फिल्म चालेल असे नाही. कंगना रनौतने ‘धाकड’ अशाच पद्धतीने प्रमोट करण्याचा प्रयत्न केला. तिनेही महाआरती केली. अगदी सलमान खानपासून ते अनेक सेलिब्रिटींकडून फिल्मसंदर्भात ट्विट करून घेतले. मात्र तरीही ‘धाकड’ फिल्म चालली नाही. त्याचप्रमाणे ‘काश्मीर फाईल्स’नंतर ‘लंडन फाईल’ आली, ती चालली नाही. प्रेक्षकांना प्रपोगंडा कळतो, ते सुज्ञ आहेत. त्याला बळी पडत नाहीत. त्यासोबत त्याला आपला आवडता अभिनेता एखाद्या विशिष्ट पक्षासोबत सार्वजनिक रूपाने जुळलेला आवडत नाही, हादेखील एक मुद्दा आहे.

दाक्षिणात्य चित्रपटांची केवळ हवा

गेल्या सहा महिन्यांत केवळ तीन दाक्षिणात्य चित्रपट सुपर हिट झाले. त्यात ‘पुष्पा’, ‘आरआरआर’ आणि ‘केजीएफ २’ या फिल्म आहेत. या फिल्ममुळे संपूर्ण देशात दाक्षिणात्य चित्रपटांची एक हवा, दबदबा तयार झाला. मात्र सर्वच्या सर्व दाक्षिणात्य चित्रपट सुपर हिट होतात. तिकीटबारीवर शेकडो कोटींचा गल्ला जमवत असल्याचा एक गैरसमजही आपल्याकडे पसरला आहे. आपल्याला फक्त या तीन चित्रपटांचे यश दिसते, मात्र फ्लॉप चित्रपटांची माहिती नसते. बॉलीवूडप्रमाणे दक्षिणेतही फ्लॉप चित्रपटांची संख्या ही जास्त आहे. गेल्या काही महिन्यांत साऊथ इंडियन फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुपरस्टार समजल्या जाणाऱ्या अनेक कलाकारांचे चित्रपट फ्लॉप झालेत. ‘जयभीम’च्या यशानंतर अभिनेता सूर्याची ‘अखारकुंज धंडी धवन’ एक बिगबजेट फिल्म बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरली. नागार्जुन, नागासेनाचा ‘बंगाराजू’ हा चित्रपट तिकीटबारीवर आपटला. विशाल आणि आर्याचा ‘एनम’ फ्लॉप ठरला. महेश बाबूच्या ‘सरकारु वारु पाटा’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटाने पहिल्या दिवशी मोठी ओपनिंग घेतली, मात्र दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने दम तोडला. बाहुबलीफेम प्रभासची ‘राधेश्याम’ बॉक्स ऑफिसवर जादू दाखवू शकली नाही. चिंरजीवी, रामचरण तेजाची ‘आचार्य’ वाईट रितीने अपयशी ठरली.

त्यापूर्वी रामचरणची आरआर वेगात चालली. रवि तेजासारख्या यशस्वी सुपरस्टारचा ‘खिलाडी’ सपशेल आपटला. अजित आणि विजयसारख्या सुपरस्टार कलाकारांचे चित्रपट फ्लॉप ठरले. ही एक मोठी यादी आहे. दहा दाक्षिणात्य चित्रपटांपैकी तीन चालले आणि बॉलीवूडचा १० पैकी एक चित्रपट चालतो, याचा अर्थ दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्री बॉलीवूडच्या खूप पुढे निघून गेली किंवा त्यांचा दबदबा झालाय, असे कदापि म्हणता येणार नाही. या उलट प्रादेशिक चित्रपटांची स्पेस कायम असते. बाहुबली, सैराट, जट-ज्यूलीयटच्या निमित्ताने हे प्रकर्षाने स्पष्ट झालेय. या शुक्रवारी जवळपास २५ चित्रपट प्रदर्शित झालेत. त्यामध्ये केवळ दोन हिंदी, दोन मराठी चित्रपट आहेत. त्यातील १५ चित्रपट दाक्षिणात्य फिल्मसृष्टीचे आहेत. या पंधरामधून दोन चालले, त्याची चर्चा होते, उरलेले १३ चित्रपट अपयशी ठरतात, त्याचा हिशोब नसतो.

सत्तर, ऐंशीच्या दशकाची रिमेक

अलिकडे सुपर हिट ठरलेल्या तीन दाक्षिणात्य चित्रपटांचा विचार केला तर त्यात ‘पुष्पा’ आणि ‘आरआरआर’मध्ये विषयाचे नावीन्य होते. ‘केजीएफ-२’मध्ये नॉवेल्टी आणि मार्केटिंग होती. तुम्ही हे चित्रपट बारकाईने बघितले तर या चित्रपटांत सत्तर, ऐंशीच्या काळात आलेल्या असंख्य हिंदी चित्रपटांची झलक पाहायला मिळेल. प्रेक्षकांना कायम ‘लार्जर दॅन लाईफ’ व्यक्तिरेखा असलेले चित्रपट पाहायला आवडतात. मात्र अलिकडे हिंदीत रिॲलिस्टीक चित्रपट तयार व्हायले लागले. त्यामुळे ‘पुष्पा’ जेव्हा ‘झुकेगा नही साला’ हा डॉयलॉग मारतो तेव्हा प्रेक्षक त्याला डोक्यावर घेतात. १९७०-८० मध्ये आलेला विश्वनाथ कालीचरण, ऐलाने जंग, बगावत, दिवार, नसीबमधील शत्रुघ्न सिन्हा, धर्मेंद्र, अमिताभचे हे कॅरेक्टर अशाच बंडखोर ‘पुष्पा’चे होते. ‘काला पत्थर’मध्ये ‘वो दिन क्या है, नाम क्या है, जा मंगल लिखले, ताश के त्रेपन्नवे पत्ते हम है,’ या शत्रुघ्न सिन्हा, धर्मेंद्रच्या डॉयलॉग स्टाईल व्यक्तिरेखा होत्या. ‘पुष्पा’ हा त्याचे छोटेसे रूप आहे. ‘दिवार’मध्ये अमिताभचे मंदिरात न जाणे, मालकांचे न ऐकणे हेच काम पुष्पाचे एक रूप आहे. त्यामुळे सध्याचे दाक्षिणात्य चित्रपट जुन्या हिंदी चित्रपटांचे मॉडर्न रूप आहेत.

ऑउट ऑफ बॉक्स कल्पना

अनेकांचा गैरसमज आहे की, केवळ साऊथचे चित्रपट वेगळे प्रयोग करत आहेत. ऑउट ऑफ बॉक्स आयडिया घेऊन येत आहेत. उलट दाक्षिणात्य चित्रपट बहुतांश हिंदीपासून प्रेरित झालेले असतात. अनेक कल्पना हॉलीवूड आणि बॉलीवूडपासून ते उचलतात. मात्र एक सत्य कबूल करावे लागेल की, ते अनेक धाडसी प्रयोग करतात. मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात. जुन्या पटकथांवर काम करण्याची रिस्क ते घेतात. अनेक हिंदी चित्रपटांची दक्षिणेत कॉपी केली जाते. मल्याळम सिनेमा सोडला तर तेलगू, कन्नड, तमीळ चित्रपटसृष्टी ही हिंदी चित्रपटापासून प्रभावित झालेली असून, अनेक आयडिया ते जशाच्या तशा उचलतात. मल्याळम आणि मराठी या दोनच भाषांत ओरीजनल, दर्जेदार चित्रपट तयार होतात. भलेही ते बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होतात. त्यामुळे केवळ दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी वेगवेगळे प्रयोग करत आहे, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. हिंदी चित्रपटांमध्ये वेगवेगळे प्रयोग कायम सुरू असतात. मात्र अलिकडे फ्लॉप चित्रपटांची संख्या जास्त झाल्यामुळे चांगले चित्रपट लक्षात राहत नाहीत. हे मात्र खरं आहे की, सध्या चांगले हिंदी चित्रपट तयार होत नाहीत. मात्र हा बॅड पॅच आहे. हे चित्रही लवकरच बदलेल, अशी अपेक्षा करू या.

(लेखक देशातील आघाडीचे फिल्म समीक्षक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com