"गुलाम'मुळे मिळाली नवी ओळख (टर्निंग पॉइंट )

शब्दांकन : अरुण सुर्वे
सोमवार, 17 एप्रिल 2017

"कैसी ये यारियॉं'मधील भूमिका माझ्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली; पण "गुलाम'मधील शिवानीची भूमिका माझ्यासाठी फार महत्त्वाची आहे. कारण, या भूमिकेत मी माझं सर्वस्व ओतलं आहे. या मालिकेमुळंच माझ्याकडे समर्थ अभिनेत्री म्हणून बघितलं जात आहे. 
- नीती टेलर, अभिनेत्री 
 

"कैसी ये यारियॉं'मधील भूमिका माझ्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली; पण "गुलाम'मधील शिवानीची भूमिका माझ्यासाठी फार महत्त्वाची आहे. कारण, या भूमिकेत मी माझं सर्वस्व ओतलं आहे. या मालिकेमुळंच माझ्याकडे समर्थ अभिनेत्री म्हणून बघितलं जात आहे. 
- नीती टेलर, अभिनेत्री 

माझा जन्म गुरगावमध्ये झाला आणि मी तिथंच वाढले. मी जन्मत:च तिथल्या रुग्णालयाचं उद्‌घाटन केलं; कारण त्या रुग्णालयात जन्मलेली मी पहिलीच मुलगी होते. मी दिल्लीतल्या लॉरेटो कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकले. शाळेत असताना मी अनेक नाटकांमध्ये भूमिका साकारल्या. नृत्याचे कार्यक्रमही केले. कोणत्याही नृत्याच्या कार्यक्रमात मी असायचीच. कारण, माझ्या शाळेतली मी सर्वांत उत्तम नर्तिका होते. तेव्हा मी "रोमिओ ऍण्ड ज्युलिएट', "महाभारत' वगैरे नाटकांतून रंगमंचावर अभिनय केला. 
दरम्यान, सोफिया कॉलेजमधून मी समाजशास्त्रात बी. ए. पदवी घेतली. एक दिवस मला बालाजी टेलिफिल्म्समधून फोन आला. त्यांनी ऑडिशनसाठी बोलावलं होतं. वास्तविक मी त्यांना माझे फोटो पाठविले नव्हते आणि अभिनय करण्याचा विचारही माझ्या मनात डोकावला नव्हता. मी केवळ एक प्रयत्न म्हणून तिथं ऑडिशन दिली. तिथल्या क्रिएटिव्ह प्रमुखांनी मला तिथं पाहिलं. तेव्हा मी गुलाबी रंगाचा बेबी सूट घातला होता. मला तो क्षण अजूनही आठवतो आहे. तो सूट मी अजूनही जपून ठेवला आहे, कारण तो माझ्यासाठी "लकी' आहे, असं मला वाटतं. कृतिका कामरा आणि विवेक भातेना यांच्याबरोबर मी "प्यार का बंधन' या मालिकेत छोटीशी भूमिका साकारली. 
"प्यार का बंधन' ही खऱ्याअर्थाने माझी पहिली मालिका होती. त्यासाठी मला ऑडिशनला बोलावलं होतं; पण त्यांना त्या वेळी माझं नावही माहीत नव्हतं. "तुम्ही बहुधा चुकीच्या व्यक्तीला फोन केला असावा,' असंही मी त्यांना म्हणाले. पण ते म्हणाले, "नाही, आम्ही तुलाच बोलावलं होतं.' 
सध्या मी "गुलाम' मालिकेत शिवानीची भूमिका साकारत असून, हीच माझी आजवरची सर्वोत्तम भूमिका आहे. कारण, एकाच व्यक्तिरेखेत इतक्‍या विविध भावभावनांच्या छटा असतील, असं मला वाटलंच नाही. इतका सारा छळ सहन करणं, ही माझ्यासाठी नवी गोष्ट आहे; तसंच दिग्दर्शकाच्या मनासारखी भूमिका रंगविणं, ही सुद्धा माझ्या दृष्टीनं महत्त्वाची बाब आहे. मला उंचीची आणि पाण्याची अतिशय भीती वाटते; पण या मालिकेतील भूमिकेसाठी मला त्यावर मात करावी लागली; कारण मालिकेत एका प्रसंगात मला उंचावरून उडी मारावी लागली, तसेच थंड पाण्याखालीही काही काळ राहावं लागलं. शिवानीची व्यक्तिरेखा बहुपदरी असल्याने ती साकारताना मानसिक थकवा येतो, पण खूप मजा येते. 

"कैसी ये यारीयॉं' या मालिकेतील भूमिका माझ्या आयुष्याला कलाटणी देणारी होती. कारण, ही भूमिका अपेक्षेपेक्षा खूप चांगल्या पद्धतीनं रंगविता आली. त्यामुळंच लोक मला ओळखू लागले; पण "गुलाम'मधील शिवानीची भूमिका ही माझ्यासाठी फार महत्त्वाची आहे. कारण, यातील संवाद असोत की ऍक्‍शन प्रसंग, की दुसरं काही- ते सर्व फारच उच्च पातळीवरचं आहे. माझं हिंदी कच्चं आहे. आपण नेहमीच हिंदीतून बोलतो; पण "गुलाम'मधलं हिंदी हे खूपच उच्चस्तरावरचं आहे. या भूमिकेत मी माझं सर्वस्व ओतलं आहे आणि त्याचा चांगला परिणामही दिसून येतो आहे. या मालिकेमुळंच माझ्याकडे एक समर्थ अभिनेत्री म्हणून बघितलं जात आहे. या मालिकेमुळंच मला खूप संधी आल्या आहेत. भविष्यात मी तुम्हाला विविध मालिकांमध्ये आगळ्यावेगळ्या भूमिकेत दिसेन; पण सध्या "गुलाम'वरच लक्ष केंद्रित केलं आहे. 

Web Title: Gulam fame niti taylor interview