ह्रदयांतर : रिव्ह्यू #Live : चौकोनी कुटुंबाने केलेलं आयुष्याचं सेलिब्रेशन

सौमित्र पोटे/ कॅमेरा : योगेश बनकर
शुक्रवार, 7 जुलै 2017

ह्रदयांतर.. विक्रम फडणीस यांचा हा पहिला सिनेमा प्रेक्षकांना इमोशनल जर्नी घडवतो. उच्च तांत्रिक मूल्यं आणि कलाकारांचा कसदार अभिनय यामुळे हा सिनेमा आपला दर्जा राखतो. केवळ टाइमपास म्हणून सिनेमाकडे पाहणार्यांसाठी हा सिनेमा नाही. कुटुंबातल्या सर्वांनीी एकत्र पहावा असा हा सिनेमा आहे. या सिनेमाला ई सकाळकडून मिळतायत 4 चीअर्स

पुणे : विक्रम फडणीस हे नाव फॅशन इंड़स्ट्रीसाठी नवं नाही. गेली अनेक वर्ष हिंदीत काम करणार्या विक्रम यांनी दिग्दर्शनात पदार्पण करण्यासाठी मराठी सिनेमा निवडला. याचा विषयही निवडताना दिग्दर्शकाने चौकोनी कुटुंब निवडलं. सुबोध भावे, मुक्ता बर्वे, मीना नाईक यांच्यासह सोनाली खरे, तृष्णिका शिंदे, निष्ठा वैद्य यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका आहेत. ई सकाळच्या या व्यासपीठावर कघी नव्हे तो लाईव्ह रिव्ह्यूचा प्रयोग पहिल्यांदा करण्यात आला. या रिव्ह्यूमध्ये कलाकारांनाही सहभागी होता येतं. यावेळी ह्रदयांतरचा रिव्ह्यू करताना सिनेमाच्या कलाकार दिग्दर्शकांना उपस्थित राहता आलं नाही. 

व्हिडीओ रिव्ह्यु

प्रत्येक माणसाची आपली अशी प्रायोरिटी ठरलेली असते. रोजच्या दिनक्रमामध्ये या प्रायोरिटीज बदलत असतात. खरंतर त्या बदलल्या पाहिजेत. पण संपूर्ण दिवस जेव्हा कुटुंबातल्या कर्त्या माणसाला केवळ आपला उद्योग महत्वाचा वाटू लागतो, त्यावेळी मात्र गाडी हालू लागते. कारण पत्नी, मुलं यांचा विचार त्याच्याकडून दुय्यम होऊ लागतो. मग तंटे वाढतात. नवरा बायकोच्या नात्याला ग्रहण लागू लागतं. यात मुलंही होरपळतात. अशी स्थिती थोड्या फार फरकाने सगळ्या कुटुंबात असते. असा सगळा प्रकार चालू असताना, अचानक एक संकटाची मोठी लाट या कुटुंबासमोर येेते, आणि ती परिस्थिती सगळ्यांच्या प्रायोरिटीज बदलते. त्यातून तयार होणारा हा सिनेमा आहे. लाईव्ह रिव्ह्यू पाहताना या सिनेमातली गंमत आणखी समजेल. 

विक्रम फडणीस यांच्या दिग्दर्शनाची ही पहिलीच खेप आहे. या पहिल्याच प्रयत्नात त्यांनी अत्यंत महत्वाचा पण हळूवार, निरागस विषय हाताळला आहे. सुबोध भावे आणि मुक्ता बर्वे यांनी तर आपल्या अभिनयाने या सिनेमाचा स्तर कमालीचा उंचावला आहे. सिनेमातले अनेक प्रसंग पाहताना डोळ्यांच्या कडा ओलावतात. 

एकूणात, ह्रदयांतर हा एक अत्यंत भावनिक प्रवास आहे. तो शोकात्म नाही. जगण्याची उमेद देणारा आहे. उगाच टपोरीगिरी करायला हा सिनेमा पाहणार्यांनो हा सिनेमा तुमच्यासाठी नाही. पण काहीतरी वेगळं कौंटुंबिक मूल्य असणारं असं पाहायचं असेल तर हा सिनेमा आपलं चांगलं रंजन करू शकेल.  विक्रम फडणीस यांनी पहिल्याच प्रयत्नात केलेल्या कौतुकास्पद कामगिरीला ई सकाळचे 4 चीअर्स.

Web Title: hrudayantar film review live esakal news