"मी थांबणार नाही, माझं काम करत राहीन"; वीर दासची रोखठोक भूमिका | Vir Das | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vir Das

"मी थांबणार नाही, माझं काम करत राहीन"; वीर दासची रोखठोक भूमिका

"मी इथे माझं काम करायला आलो आहे आणि ते मी करत राहीन. मी थांबणार नाही. लोकांना हसवण्याचं माझं काम आहे आणि जर माझे विनोद हसण्यासारखे तुम्हाला वाटत नसतील तर हसू नका. आतापर्यंत मी कधीच सेन्सॉरशिपचा सामना केला नाही", अशी रोखठोक भूमिका कॉमेडियन वीर दासने Vir Das मांडली. आपल्या ‘स्टॅन्ड अप’ कॉमेडी शोमध्ये भारताबद्दल आक्षेपार्ह भाषेत टिपणी केल्याचा आरोप त्याच्यावर गेल्या काही दिवसांपासून होत आहे. त्याच्याविरोधात दिल्ली आणि मुंबईत तक्रारीसुद्धा दाखल करण्यात आल्या आहेत. 'इंडिया टुडे'ला दिलेल्या मुलाखतीत वीर दासने त्याच्या कवितेवरून झालेल्या वादावर प्रतिक्रिया दिली. तसंच भारतातील लोकांना हसवण्यासाठी आणि अधिकाधिक लोकांपर्यंत आपलं प्रेम पोहोचवण्यासाठी आणखी कॉमेडी क्लब्सची गरज आहे, असं तो म्हणाला.

वीर दासने अमेरिकेतील वॉशिंग्टन येथील जॉन एफ केनेडी सेंटर ऑफ परफॉर्मिंग इथं सादर केलेल्या ‘आय कम फ्रॉम टू इंडियाज’ या कार्यक्रमाचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनेलवर टाकला होता. या व्हिडिओत तो म्हणतो, ‘‘मी अशा भारतातून आलो आहे, जिथे दिवसा महिलांची पूजा केली जाते, तर रात्री त्यांच्यावर बलात्कार होतो. मी अशा भारतातून आलो आहे, जिथे आम्हाला शाकाहारी असण्याचा अभिमान आहे, पण आम्ही भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकऱ्यांवर धावून जातो.’’ यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी या टिपणीसाठी वीर दासवर टीका केली. वादानंतर वीर दासने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित स्पष्टीकरण दिलं.

हेही वाचा: "चांगल्या-वाईट काळात.."; लग्नाच्या वाढदिवशी शिल्पाची खास पोस्ट

वीर दासचं स्पष्टीकरण-

"या व्हिडीओतून दोन विभिन्न भारतात घडणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टींच्या दोन बाजू उपहासात्मक पद्धतीने मांडण्याचा माझा प्रयत्न होता. प्रत्येक देशाची चांगली आणि वाईट बाजू असते. मी सांगितलेल्या गोष्टी आता कोणासाठी काही गुपित नाही. आपण महान आहोत हे कधीही विसरू नका आणि आपल्याला ज्या गोष्टी महान बनवतात त्यावर लक्ष केंद्रीत करण्याचं आवाहन करणारा हा व्हिडीओ आहे", असा खुलासा करणारं ‘ट्विट’ त्याने केलं.

loading image
go to top