'नाझ सिनेमा' मोजतोय शेवटच्या घटका 

संतोष भिंगार्डे
मंगळवार, 1 नोव्हेंबर 2016

एकेकाळी नाझ हा चित्रपटसृष्टीचा गड होता. आता त्याचा ऱ्हास होताना पाहून दुःख वाटते. पूर्वी येथे मोठी गर्दी असायची. कित्येक मोठमोठे निर्माते आणि कलाकारांना दोन-दोन तास वाट पाहावी लागत असे; पण कॉर्पोरेट सेक्‍टर आले आणि सगळेच गणित बदलले.

मुंबई : एकेकाळी चित्रपटसृष्टीचा गड समजली जाणारी, निर्माते-दिग्दर्शक, कलाकार; तसेच वितरकांची वर्दळ अनुभवलेली आणि अनेक चित्रपटांच्या यशाची 70 ते 80 वर्षे साक्षीदार असलेली ग्रॅण्ट रोड येथील नाझ सिनेमाची इमारत आता शेवटच्या घटका मोजत आहे.

ही इमारत अतिशय जीर्ण झाली आहे. चित्रपटसृष्टीचे एकेकाळचे हे वैभव आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या इमारतीतील वितरकांची कार्यालये आता दुसरीकडे हलविण्यात आली आहेत. मोजकीच कार्यालये येथे उरली आहेत. 

नाझ सिनेमाची इमारत चित्रपटसृष्टीत खूपच प्रसिद्ध होती. चित्रपट हिट होणार की फ्लॉप, याचे अंदाज येथेच बांधले जात असत. अनेक मोठमोठे कलाकार; तसेच निर्माते व दिग्दर्शक येथे ये-जा करत. 'जंजीर', 'शोले', 'दीवार', 'जॉनी मेरा नाम', 'सरगम', 'रोटी कपडा और मकान', 'गुमनाम', 'राम और श्‍याम', 'अमर अकबर ऍन्थोनी' असे कित्येक यशस्वी चित्रपटांचे वितरण याच इमारतीतून झाले होते. राजेश खन्ना, मनोज कुमार, जितेंद्र असे अनेक कलाकार येथे येत असत. चित्रपटसृष्टीची ही पंढरीच होती; मात्र काही वर्षांत येथील वितरकांची कार्यालये सांताक्रुझ-अंधेरी-गोरेगाव अशा काही ठिकाणी स्थलांतरीत झाली. 

35 वर्षे वितरण क्षेत्रात असलेले आणि बिग बॅनर चित्रपट वितरित करणारे दिलीप धनवानी यांनी सांगितले की, एकेकाळी नाझ हा चित्रपटसृष्टीचा गड होता. आता त्याचा ऱ्हास होताना पाहून दुःख वाटते. पूर्वी येथे मोठी गर्दी असायची. कित्येक मोठमोठे निर्माते आणि कलाकारांना दोन-दोन तास वाट पाहावी लागत असे; पण कॉर्पोरेट सेक्‍टर आले आणि सगळेच गणित बदलले. कॉर्पोरेट कंपन्यांनी धंदा मोठा केला; पण तो खराबही केला. कारण, त्यांनी सगळे शेअर मार्केटचे पैसे आणले आणि वाट लावली. त्यांना वितरणाविषयी अजिबात ज्ञान नाही. 

दादा कोंडकेंच्या चित्रपटांचे वितरण 
या इमारतीत वितरकांची 100च्या आसपास कार्यालये होती. त्यातील काही स्थलांतरित झाली. काही बंद झाली आहेत. पाच-सहा कार्यालये आता उरली आहेत, असे निर्माते व वितरक विजय कोंडके यांनी सांगितले. या इमारतीचा एखादा भाग कधी कोसळेल, हे सांगता येत नाही. मराठी चित्रपटांसाठी हे एक बिझनेस सेंटर होते. दादांच्या (दादा कोंडके) चित्रपटांचे वितरण याच नाझ इमारतीतून झाले होते. आता या इमारतीला अवकळा आली आहे 

नाझ इमारतीतील वितरकांचे पडदे दिवाळीमध्ये येथील द न्यू सनलाईट लॉड्रीमध्ये धुण्यासाठी येत होते; मात्र गेल्या तीन-चारवर्षांत एकही पडदा धुण्यासाठी आलेला नाही. याबद्दल सांगताना या लॉड्रीचे मालक दिलीप भोमकर म्हणाले की, आमच्या आजोबांनी ही लॉड्री सन 1922 मध्ये सुरू केली. आजोबांनंतर माझे वडील आणि आता मी ती सांभाळीत आहे. दर वर्षी दिवाळीत नाझमधील वितरकांचे पडदे आणि सोफ्याची कव्हर्स आमच्याकडे धुण्यासाठी येत असत. आम्ही हे पडदे कधी येणार? याची वाट पाहत असायचो; पण येथील बहुतेक कार्यालये स्थलांतरित झाल्यामुळे आता पडदे येत नाहीत.

Web Title: Iconic Naaz Cinema on the verge of collapse