
'इफ्फी'मध्ये यंदा 'OTT'वरील चित्रपटांचाही समावेश; अनुराग ठाकूर यांची घोषणा
नवी दिल्ली : भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) यंदा पहिल्यांदाच ओटीटी प्लॅटफॉर्मवरील सिनेमांचाही समावेश असणार आहे, अशी महत्वाची घोषणा माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी गुरुवारी केली. त्यामुळं कोविडच्या काळात चित्रपटगृहे बंद असल्यानं जे सिनेमे ओटीटीवर प्रदर्शित झाले त्यांच्या संपूर्ण टीमसाठी सरकारचा हा निर्णय दिलासादायक ठरणार आहे.
ठाकूर पुढे म्हणाले, इफ्फीमध्ये सत्यजीत रे जीवनगौरव पुरस्कार अमेरिकन फिल्ममेकर मार्टिन स्कॉर्सेस आणि हंगेरिअन फिल्ममेकर इस्तावन झाबो यांना देण्यात येणार आहे. त्याचबरोबर अनेक दशकांपासून भारतीय चित्रपट क्षेत्रात भरीव योगदान दिल्याबद्दल अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी तसेच सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष आणि गीतकार प्रसून जोशी यांना 'इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर' हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
यंदा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं २० नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर या काळात आयोजन करण्यात आलं आहे. दरसालप्रमाणं हा महोत्सव यंदाही गोव्यातच पार पडणार आहे.