Indian Idol: जाणून घ्या विजेत्यांना बक्षिस म्हणून किती रक्कम मिळते? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

indian idol winners

Indian Idol: जाणून घ्या विजेत्यांना बक्षिस म्हणून किती रक्कम मिळते?

१५ ऑगस्ट रोजी 'इंडियन आयडॉल'च्या Indian Idol बाराव्या पर्वाचा ग्रँड फिनाले पार पडला. तब्बल १२ तास हा कार्यक्रम सुरू होता. उत्तराखंडच्या पवनदीप राजनने Pawandeep Rajan 'इंडियन आयडॉल'च्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. सर्वांत लोकप्रिय आणि चर्चेत असणाऱ्या या रिअॅलिटी शोच्या विजेत्यांना बक्षिस म्हणून नेमकं काय काय मिळतं असा प्रश्न अनेकांना पडत असेल. तर या पर्वाच्या विजेत्याला २५ लाख रुपयांचा धनादेश मिळाला. त्याचसोबत त्याला एक कार आणि म्युझिक इंडस्ट्रीमध्ये एका अल्बमचा करार मिळाला.

'इंडियन आयडॉल'चं पहिलं सिझन खूप गाजलं होतं. पहिल्या सिझनचा विजेता मराठमोळा अभिजीत सावंत ठरला होता. त्यावेळी अभिजीतला ५० लाख रुपये आणि टी सीरिजसोबत एका अल्बमचा करार बक्षिस म्हणून मिळालं होतं. बक्षिसाची ही रक्कम नंतरच्या काही सिझन्समध्ये वाढवण्यात आली होती. सिझन दोन, तीन आणि चारचे विजेते संदीप आचार्य, प्रशांत तमांग आणि सौरभी देबबर्मा हे अनुक्रमे ठरले होते. या तिघांनाही एक कोटी रुपयांचं बक्षिस मिळालं होतं. यंदाच्या सिझनसाठी बक्षिसाची रक्कम इतर सिझन्सपेक्षा कमी करण्यात आली होती.

हेही वाचा: Indian Idol: ".. तर मी शांत बसणार नाही"; आदित्य नारायणची सडेतोड भूमिका

हेही वाचा: Indian Idol 12: कोण आहे पवनदीप राजन? वयाच्या अवघ्या दुसऱ्या वर्षी केला होता रेकॉर्ड

१५ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजल्यापासून मध्यरात्री १२ वाजेपर्यंत ग्रँड फिनाले पार पडला होता. पवनदीप राजनने विजेतेपद पटकावलं तर अरुणिता कांजिलाल ही दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली होती. शोदरम्यान पवनदीप आणि अरुणिता यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र आम्ही खूप चांगले मित्र आहोत, असं दोघांनी नंतर स्पष्ट केलं. सायली कांबळे तिसऱ्या क्रमांकावर विजयी ठरली होती. अरुणिता आणि सायलीला पाच लाख रुपयांचा धनादेश बक्षिस म्हणून देण्यात आला. मोहम्मद दानिश आणि निहाल तौरो हे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर होते. या दोघांना तीन लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.

पवनदीप रंजन, अरुणिता कांजिलाल, मोहम्मद दानिश, निहाल तौरो, सायली कांबळे आणि शण्मुखप्रिया या सहा जणांनी ग्रँड फिनालेमध्ये अप्रतिम गाणी सादर केली. गायक सुखविंदर सिंग, मिका सिंग, अमित मिश्रा, कुमार सानू, जावेद अली, अल्का याग्निक, उदित नारायण या सेलिब्रिटींनी कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

Web Title: Indian Idol 12 Grand Prize Money How Much Amount The Winner Will Take Back Home

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..