आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे गोव्यात शानदार उद्‌घाटन

International-Film-festival
International-Film-festival

पणजी - आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) उद्‌घाटन समारंभाच्या किंचित फिकट चित्राची चौकट आज पूर्ण झाली ती चक्क सुरांनी! शंकर महादेवन आणि लुईस बॅंक यांच्या फ्युजन संगीताचा ४४० वोल्टचा झटका बसला आणि कार्यक्रमाला विलक्षण ऊर्जा मिळाली.

अमिताभ बच्चन आणि रजनीकांत असे दोन सुपरस्टार एकत्र येणे हे यंदाच्या उद्‌घाटन समारंभाचे वैशिष्ट्य होते. या दोघांनी स्वतःच्या विनम्रतेचे कोंदण या चित्राला दिले आणि त्यातले रंग रसिकांच्या मनामध्येही भरत गेले. नेहमीसारखे चकचकाटी नृत्य आणि कलांचे प्रदर्शन नसले तरी काही उत्कट क्षण दिल्याने हा समारंभ उल्लेखनीय ठरला.

प्रयाण, एन्काउंटर, सूर निरागस हो अशा एकामागोमाग एक येणाऱ्या फ्युजन रचनांनी या संपूर्ण कार्यक्रमाचा पटच व्यापून टाकला. कोकण एक्‍सप्रेससारख्या रचनेत केवळ वाद्यांनी तयार केलेला रेल्वेचा आभास आणि शेवटी वैष्णव जन तो ही रचना जगभरातल्या भाषेतून सादर करण्याचा प्रयोग अशा गोष्टी कल्पक आणि सर्जनशीलतेचा आनंद देणाऱ्या होत्या.

अमिताभ बच्चन यांच्या छोटेखानी भाषणाने रसिकांचे हृदय जिंकले. माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षणात बरोबर असणाऱ्या चहात्यांमुळेच मी आहे असे त्यांनी प्रांजळपणे सांगितले. रजनीकांत यांनीही त्यांना मिळालेला पुरस्कार चाहत्यांना अर्पण केला. रजनीकांत यांनी अमिताभ बच्चन यांच्या पायाला हात लावून केलेला नमस्कार आणि अमिता बियाणी त्यांना प्रेमभरानं आलिंगन देणे हा ‘शो स्टीलर मोमेंट’ ठरला.

माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी चित्रपट ही भारताची ‘सॉफ्ट पॉवर’ असल्याचे सांगितले आणि चित्रीकरण परवान्यांसाठी सिंगल विंडो यंत्रणेसाठी पाऊल उचलत असल्याची घोषणा केली.

या कार्यक्रमाने इफ्फी नावाच्या चित्रपटात वारीचा प्रारंभ झाला. सुमारे साडेतीनशे चित्रपट आता रसिकांना भेटतील आणि ही वारी आनंददायी बनत जाईल. त्याची नांदी उत्तम सुरांनी झाली एवढं नक्की!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com