चित्रडोसा : साऊथचे चित्रपट - एक पाहणे…

Introductory article on south Indian movie review for Chitradosa Column
Introductory article on south Indian movie review for Chitradosa Column

होय, आम्ही साऊथचे चित्रपट पाहतो. 

मन लावून पाहतो. रोजरोज पाहतो. रात्ररात्र जागून पाहतो. टीव्हीवर पाहतो. ओटीटीवर पाहतो. यूट्यूबवर पाहतो. झालेच तर टोरेन्टून पाहतो!

हे सांगताना आमच्या मनीं कोणतीही लाज, शरम वा हया नाही,किंबहुना नखशिखांत नि-र्लज्जपणे आम्ही हे जाहीर करू इच्छितो, की - होय, आम्ही साऊथचे चित्रपट पाहतो. 

मन लावून पाहतो. रोजरोज पाहतो. रात्ररात्र जागून पाहतो. टीव्हीवर पाहतो. ओटीटीवर पाहतो. यूट्यूबवर पाहतो. झालेच तर टोरेन्टून पाहतो!

आता ही अशी कबुली देण्यात काय वाईट्ट आहे, हेच मुळी आम्हांस समजत  नाही. तो का ताजीरातेहिंद दफा तीनसो दोचा गुन्हा आहे काय? परंतु साऊथचे चालू पिक्चर पाहतो म्हटल्यावर समोरची मंडळी असा काही लूक देतात, की वाटते आपण चुल्लूभर पाण्यात डुबून हुतात्मा व्हावे. 

अर्रे? साऊथचेच पिक्चर पाहतो ना आम्ही? कचेरीतील कलिगाकडून  मेमरी स्टिका आणून ते तसले कंट्रीवाईड क्लासरूम तर नाही ना पाहात  बसत? किंवा दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील ते अखिल भारतीय नळावरील  भांडणाचे कार्यक्रम तर नाही ना मिटक्या मारत पाहात बसत?   

वस्तुतः वृत्तवाहिन्यांवरील ते चर्चेचे कार्यक्रम आणि आमच्या साऊथच्या  चित्रपटांतील  महानायक आणि महाखलनायक हे एकमेकांच्या समोर आल्यानंतर एकमेकांस जी ‘अय…. अय…’ असे करीत हूल देतात, त्यांत अणुमात्र तरी फरक आहे का सांगा बरे?

टीव्ही पडद्यावरील त्या किमान सतरा  खिडक्यांत बसलेल्या सतरा विद्वत्जनांस आमचे परमआदर्श रुस्तुम-ए-रिपब्लिक  दे .  भ.  अर्णब  गोस्वामी  ज्याप्रकारे  धूधू  धुतात,  त्यांत आणि आमच्या साऊथच्या चित्रपटांतील कोणताही महानायक समोरील किमान तीनशे  गुंडांस ज्या प्रकारे लीलया लोळवतो त्यांत, काही तरी फरक आहे का सांगा  बरे? 

मग त्या वृत्तवाहिन्यांवरील राष्ट्रीय चर्चेचा हैदोसदुल्ला आवडीने पाहणारे ते  सारे नैशनल इंटरेस्टवाले आणि साऊथचे चित्रपट पाहणारे आम्ही मात्र  विधानसभेत 'आपली आवड’ पाहात बसणाऱ्या आमदारांच्या पंक्तीतले असा  दुजाभाव - का? क्यूं? व्हाय?

एक मान्यच, की आमच्या दृष्टीने चित्रपट पाहणे हा एक टैम्पासचा मार्ग आहे.फिल्म फेस्टिव्हली वा फिल्म क्लबी जावे, तेथे थोर्थोर दिग्दर्शकांचे थोर्थोर  चित्रपट पाहावेत आणि त्यांचा विचार करीत पुढचे चार दिवस तळमळत  काढावेत हे आम्हांस ना जमे. ते ज्यांस शक्य होते त्यांस आमुचा हार्दिक  चरणस्पर्श. ती आमच्या चिंटुकल्या मेंदूतील मूठभर करड्या पेशींच्या बस कीबात नव्हे. ज्या प्रमाणे कुणाकुणास पाब्लो पिकासो समजत नाही, काफ्का  कळत नाही वा गॅब्रियल गार्सिया मार्क्वेझ आकळत नाही, तद्वत आम्हांस  तुमचे ते माजिद मजिदी व कुरोसावा व सत्यजीत राय नाही समजत. त्यांस काय करणार? तो आमचा आवाका नाही. ती आमची झेप नाही. आमची धाव खरे तर मनमोहन देसाईते डेव्हिड धवन, झालेच तर गोलमालकार रोहित  शेट्टींपर्यंत. अगदीच टोकाचे पाऊल म्हणजेविशाल भारद्वाज व अनुराग  कश्यप व राजकुमार हिरानी. तेथून पुढे मात्र आमच्या लहानव मोठ्या अशा दोन्ही मेंदूंत पेटके येतात. डोळ्यांस दृष्टीलकवा येतो व ते आपोआप झाकूलागतात… आता येणेप्रकारे पाहाता पाहाता निद्रासुखाची प्राप्तीच करून घ्यावयाची असेल, तर मग थेटच जाऊन आपली सह्याद्री वाहिनी का बरे पाहू नये?

प्रंतु सहजसुलभ निद्राप्राप्ती हवी म्हणून का कोणी चित्रपट पाहावयास जात  असते? 

हां. आता जाणारे जातातही तसे. उदाहरणार्थ आमचे परमशेजारी रा. रा. लेले. ऐन उन्हाळ्यात चाळीचे पत्रे तापतात व पंखा पाचवर नेला तरी हवा नामक  पदार्थ खोलीत येतच नाही व परिणामी जगभरातील ग्लोबल वॉर्मिंग  आपल्याच खोलीत मुक्कामी आले आहे अशी स्थिती निर्माण होते, ते समयी रा. रा. लेले सरळ उठतात व सहकुटुंब सहपरिवार नजिकच्या मॉलमध्ये  जातात. म्हणतात - एकावर एक फ्री! गार्गार एसीची हवा वर विंडो शॉपिंग  मोफत! 

थलैवा रजनीचा 'दरबार' आलाय; फॅन्सची दिवानगी पाहून व्हाल थक्क

पूर्वी ते एकटेच होते, तेव्हा मुंबई सेंट्रली मराठा मंदिरात जात. तेथे फार  प्राचीन काळापासून दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे नावाचा चित्रपट दाखविला जात असे. वर्षानुवर्षे तोच चित्रपट. बहुधा तो चित्रपटगृहाच्या इंटेिरिअर  सजावटीचाच भाग असावा. त्याचे तिकिटदरही कमी असत. त्यामुळे आमचे रा. रा. लेले तेथे झोपण्यासाठी जात. लताचे ते मेरे ख्वाबों में जो आये सुरू  झाले की इकडे आमच्या रा. रा. लेलेंचे डोळे मिटू लागत ते थेट ‘जा सिमरन जा…’लाच उघडत. 

आम्ही मात्र असे चित्रपटद्रोही नाही. 

आम्ही चित्रपट पाहतो, डोळे उघडे ठेवून पाहतो. आणि खरे सांगतो, तुम्ही जर आमचे साऊथचे डब पिक्चर पाहणारे असाल, तर त्या निद्रादेवीची काय बिशाद आहे की तुमच्याजवळ येईल? मिनिटा मिनिटाला ते ‘अय… अय….’ आणि आकाशात उंच उडणारे ते वाहनांचे चेंडू आणि ती गाणी… जन्माची झोप उडेल तुमची. 

साऊथची ती डब चित्रपटातील डब गाणी. अहाहा! एक स्वतंत्र सार्वभौम लेख होईल हो त्याच्यावर. त्यांचे ते स्वर्गीय ढाणढाण संगीत व त्यात नायक-नायिकेच्या ओष्ठद्वयांच्या हालचालींबरहुकूम गुंफलेले हिंदी शब्द. हे सारे मिळून जो सांगितिक कल्लोळ निर्माण होतो ना, त्यास तुळणा नाही! मा. संपादक महोदय, ई सकाळ यांचे कृपाशीर्वादाने ही लेखमाला अशीच सुरु राहिली, तर त्या दक्षिणपंथी राष्ट्रभाषिक गानपरंपरेवर एक लेख लिहिण्याचा मानस मनी बाळगून आहोत. असो.

आता सगळेच साऊथचे चित्रपट असे टैम्पास नाहीत हे मान्यच. खूपखूप चांगलेही असतात त्यात. कोणत्याही फिल्म फेस्टिव्हलात खांद्यास फॅबिंडियाची शबनम लावून फिरणा-या कोणत्याही समिक्षकेस विचारा, तीही तुम्हांस हेच सांगेल, की - येह, दे आर सो नाईस ना… द जॉनर, द स्टोरीलाईन अॅन्‌ द डिरेक्शन… ब्लाब्लाब्ला! खरेच आहे म्हणा ते. परंतु आम्ही रोज रात्रीचे समयी याचि डोळा जे पाहतो ते चित्रवैभव काही आगळेच असते. 

तर येथून पुढे त्याविषयी...

WebTitle : Introductory article on south Indian movie review for Chitradosa Column: 


 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com