अभिनेत्री तापसी पन्नू, अनुराग कश्यप यांच्या घरावर आयकर विभागाचे छापे

स्वाती वेमूल
Wednesday, 3 March 2021

आयकर विभागाची टीम मुंबई, पुणेसह २० जागांवर छापेमारीची कारवाई करत आहे. 

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू, निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि निर्माता मधू मंटेना यांच्या घरावर आयकर विभागाने धाड टाकली आहे. मधू मंटेना यांची टॅलेंट मॅनेजमेंट कंपनी क्वानच्या (Kwaan) ऑफिसमध्येही आयकर विभागाचे अधिकारी पोहोचले आहेत. कर बुडवल्याप्रकरणी ही छापेमारी करण्यात असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. याप्रकरणी 'फँटम फिल्म्स' कंपनीशी निगडीत असलेल्या इतर लोकांच्या घरीसुद्धा छापेमारी करण्यात येत आहे. यामध्ये अनुराग कश्यप, तापसीसह विकास बहलचाही समावेश आहे. आयकर विभागाची टीम मुंबई, पुणेसह २० जागांवर छापेमारीची कारवाई करत आहे. तापसी, अनुराग आणि विकास बहल यांच्या घरी व कार्यालयावर छापेमारी सुरू असून काही हस्तगत झाल्याची माहिती अद्याप समोर आली नाही. 

 

'फँटम फिल्म्स'चा वाद
फँटम फिल्म्स ही एक खासगी निर्मिती संस्था आहे. २०१० मध्ये याची स्थापना झाली. अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवाने, विकास बहल आणि मधू मंटेना यांनी मिळून या निर्मिती संस्थेची सुरुवात केली होती. ही कंपनी चित्रपट निर्मिती आणि वितरणाशी संबंधित काम करायची. पण विकास बहलवर एका महिलेने आणि अभिनेत्री कंगना रणौतने लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केल्यानंतर 'फँटम फिल्म्स' ही निर्मिती संस्था बंद करण्यात आली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IT raids at properties of Anurag Kashyap Taapsee Pannu in Mumbai