
Happy Birthday Jackie Shroff: चाळीतला जयकिशन काकुभाई कसा बनला जॅकी श्रॉफ?,आजची नेटवर्थ ऐकून व्हाल हैराण..
Happy Birthday Jackie Shroff: बॉलीवूडचा भिडू म्हणून ओळखला जाणारा जॅकी श्रॉफ सिनेइंडस्ट्रीतला एक सदाबहार अभिनेता आहे. त्यानं आपल्या करिअरमध्ये 'हीरो', 'राम लखन' आणि 'अल्लाह रक्खा' सारखे कितीतरी शानदार सिनेमे केले आहे आणि लोकांवर आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. आज १ फेब्रुवारी रोजी जॅकी श्रॉफच वाढदिवस असून ते ६६ वर्षांचे झाले आहेत. या खास दिनानिमित्तानं जॅकी श्रॉफशी जोडलेल्या काही खास गोष्टी आम्ही इथे शेअर करणार आहोत.
आज अभिनेता भले जॅकी श्रॉफ नावानं ओळखला जात असेल,पण त्यांचं खरं नाव जॅकी नसून जयकिशन काकुभाई असं आहे. तर चला जाणून घेऊया जयकिशन काकुभाई फिल्म इंडस्ट्रीत आल्यावर कसा बनला जॅकी श्रॉफ.
जयकिशन काकुभाई हे जॅकी श्रॉफ कसे बनले याविषयी बोललं जातं की जेव्हा ते शाळेत होते तेव्हा मोठं नाव असल्या कारणानं त्यांचे मित्र त्यांना जयकिशनच्या ऐवजी 'जॅकी' अशी हाक मारायचे आणि श्रॉफ त्यांचे आडनाव होते. १९८३ मध्ये जेव्हा दिग्दर्शक सुभाष घई यांनी त्यांची आपल्या सिनेमाचा लीड हिरो म्हणून निवड केली तेव्हा जयकिशनच्या जागी जॅकी श्रॉफ नावानं त्यांना लॉंच केलं गेलं आणि त्यानंतर ते त्याच नावानं प्रसिद्ध झाले.
आज जॅकी श्रॉफ यांचं नाव मोठं झालंय,त्यांच्या गडगंज संपत्ती आहे आणि त्यांच्याभोवती प्रसिद्धिचं वलयही आहे. पण एक वेळ अशी होती की ते एका चाळीत रहायचे. जॅकी यांचा जन्म १ फेब्रुवारी १९५७ साली महाराष्ट्रातील लातूर शहरात उदागीरमध्ये झाला होता. जिथे ते एका चाळीत रहायचे. त्यांनी आपल्या आयुष्याची ३३ वर्ष तिथे काढली.
त्यांच्या शिक्षणासाठी त्यांची आई साड्या आणि बांगड्या विकून पैसे कमवायची. पण आर्थिक स्थिती हलाखीची असल्याकारणानं जॅकी श्रॉफ यांना आपलं शिक्षण मध्येच सोडावं लागलं. माहितीनुसार जॅकी श्रॉफ हे फक्त ११ पर्यंत शिकले आहेत.
जॅकी श्रॉफ यांनी एकदा मुलाखतीत सांगितलं होतं की, ते चाळीत रहायचे तेव्हा त्यांना सिनेमात साइन करण्यासाठी किंवा स्क्रीप्ट ऐकवण्यासाठी निर्माते त्यांच्या चाळीत जायचे. त्यावेळी घरातील पाण्याचे ड्रम्स उलटे करून जॅकी आपल्याकडे मीटिंगला आलेल्यांना त्यावर बसवायचे.
जॅकी श्रॉफ यांनी सांगितलं होतं की 'हीरो' सिनेमाच्या रिलीजनंतरही ते ४ ते ५ वर्ष चाळीतच रहायचे. पुढे आपल्या मेहनतीच्या बळावर त्यांनी सिनेइंडस्ट्रीत आपलं एक स्थान निर्माण केलं. माहितीनुसार आज त्यांच्या नावावर २६ मिलियन डॉलर म्हणजे २०० करोडची संपत्ती आहे.
हॅप्पी बर्थ डे जॅकी दा!