esakal | ‘जय भवानी जय शिवाजी’ मालिकेची उत्सुकता शिगेला
sakal

बोलून बातमी शोधा

jai bhavani jai shivaji

‘जय भवानी जय शिवाजी’ मालिकेची उत्सुकता शिगेला

sakal_logo
By
स्वाती वेमूल

छत्रपती शिवाजी महाराज हे नाव जरी उच्चारलं तरी ऊर अभिमानाने भरुन येतो. रयतेचा राजा कसा असावा याचा पायंडा शिवरायांनी रचला आणि या जाणत्या राजाच्या स्वराज्य स्थापनेच्या स्वप्नपूर्ततेसाठी हजारो शिलेदारांनी जीव ओवाळून टाकला. याच शिलेदारांच्या शौर्याची गोष्ट सांगणारी ‘जय भवानी जय शिवाजी’ Jai Bhavani Jai Shivaji मालिका २६ जुलैपासून रात्री १० वाजता स्टार प्रवाहवर सुरु होत आहे. नेताजी पालकर, बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशिद, जीवा महाला, तान्हाजी मालुसरे, कान्होजी जेधे, प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते, मुरारबाजी देशपांडे, कोंढाजी फर्जंद या शूरवीरांची नावं आपल्याला परिचित आहेत. ‘जय भवानी जय शिवाजी’ ही मालिका या लवढय्यांच्या शौर्याला अर्पण असेल. अभिनेता भूषण प्रधान Bhushan Pradhan या मालिकेत छत्रपती शिवरायांची भूमिका साकारणार असून सुप्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव बाजीप्रभू देशपांडेंच्या भुमिकेत दिसतील. तर अभिनेता कश्यप परुळेकर Kashyap Parulekar नेताजी पालकरांची भूमिका साकारणार आहे. (Jai Bhavani Jai Shivaji new historical tv serial coming soon)

या मालिकेविषयी विषयी सांगताना भूषण प्रधान म्हणाला, ‘छत्रपती शिवाजी महाराज साकारणं हे प्रत्येक अभिनेत्याचं स्वप्न असतं. माझंदेखील स्वप्न पूर्ण होत आहे. मी बऱ्याच वर्षांपासून वाट पहात होतो की आपल्याला कधी महाराजांची भूमिका साकारायला मिळेल. जबाबदारीचं भान नक्कीच आहे. त्यामुळे उत्सुकता आणि धाकधूक दोन्ही वाढली आहे. ही जबाबदारी पूर्ण करण्यासाठी माझ्यासोबतच संपूर्ण टीम मेहनत घेते आहे.’

हेही वाचा: 'बिग बॉस मराठी'साठी अभिनेत्रीने सोडली 'देवमाणूस' मालिका?

बाजीप्रभू देशपांडेंची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी अभिनेते अजिंक्य देवही खूपच उत्सुक आहेत. ‘माझ्या करिअरची सुरुवातच सर्जा सिनेमातल्या ऐतिहासिक व्यक्तिरेखेने झाली होती. त्यामुळे बाजीप्रभू साकारताना प्रचंड आनंद होत आहे. बाजीप्रभूंच्या शौर्याच्या कथा आपण ऐकल्या आहेत, वाचल्या आहेत. पावनखिंडीमध्ये जीवाची बाजी लावत ते शेवटच्या श्वासापर्यंत लढले. अशा या शूरवीराची भूमिका साकारायला मिळणं हे माझ्यासाठी नवं आव्हान असणार आहे. या भूमिकेसाठीचा लूकही माझ्यासाठी नवा आहे. फिटनेसच्या बाबतीत मी नेहमीच जागरूक असतो. व्यायाम आणि खाण्यावरचं नियंत्रण यामुळेच मी फिट आहे. मी दररोज पाच ते सहा किलोमीटर धावतो. उत्तम आरोग्यासाठी हे सर्व गरजेचं आहे असं मला वाटतं. या सगळ्याचा उपयोग मला जय भवानी जय शिवाजी मालिकेत बाजीप्रभू साकारताना होतो आहे.'

स्टार प्रवाह प्रस्तुत या मालिकेची निर्मिती दशमी क्रिएशन्सची आहे. २६ जुलैपासून रात्री १० वाजता छत्रपती शिवरायांच्या शिलेदारांची ही गोष्ट भेटीला येणार आहे.

loading image