'लग्नकल्लोळ' चित्रपटाला जॉनी लिवर यांची पहिली क्लॅप 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 मे 2019

'लग्नकल्लोळ' या चित्रपटाचा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मुहूर्त सोहळा मुंबईत दिमाखात संपन्न झाला.

लग्नानंतरचे सुगीचे, आनंदाचे असे नव्याचे नऊ दिवस संपले की, सुरवात होते ती खऱ्या आयुष्याला. सामान्य माणसापासून ते नावाजलेल्या व्यक्तीपर्यंत सर्वच लोक हे या अनुभवातून जातात. या संकल्पनेवर आधारित 'लग्नकल्लोळ' हा विनोदी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

सिद्धार्थ जाधव, भूषण प्रधान, मयुरी देशमुख यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मुहूर्त सोहळा मुंबईत दिमाखात संपन्न झाला. यावेळी हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेली दिग्दर्शक जोडी अब्बास-मस्तान यांनी चित्रपटाची घोषणा केली. तर विनोदाचे बादशाह जॉनी लिवर यांनी चित्रपटाला पहिली क्लॅप दिली.

मयूर तिरमखे फिल्म्स निर्मित आणि मोहम्मद बर्मावाला दिग्दर्शित 'लग्नकल्लोळ' हा चित्रपट येत्या काही महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात भारत गणेशपुरे, प्रिया बेर्डे, प्रतीक्षा लोणकर, सुप्रिया कर्णिक, विद्या करंजीकर, अमिता कुलकर्णी, संतोष तिरमखे आणि डॉ. आशिष गोखले हे कलाकार देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

डॉ. मयूर तिरमखे, अण्णासाहेब रामचंद्र तिरमखे, मंगलाबाई अण्णासाहेब तिरमखे यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी दिलशाद शेख यांनी सांभाळली असून चित्रपटाचे लेखन जितेंद्र परमार यांनी केले आहे. तर प्रफुल- स्वप्नील यांचे संगीत आहे. मंदार चोळकर आणि जय अत्रे यांनी चित्रपटातील गाण्यांना शब्दबद्ध केले आहे. डीओपीचे काम दिलशाद. व्हीए यांनी पाहिले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Johnny Lever gave first clap to Lagna Kallol Marathi Film