कर्नाटकमध्ये 'कटप्पा'मुळे 'बाहुबली'वर संक्रांत..?

वृत्तसंस्था
गुरुवार, 20 एप्रिल 2017

सत्यराज यांनी नऊ वर्षांपूर्वी संबंधित व्यक्तव्य केले असून, त्यानंतर आतापर्यंत त्यांची भूमिका असले 30पेक्षा अधिक चित्रपट कर्नाटकात प्रदर्शित झाले आहेत. ते त्यांचे वैयक्तिक मत असून, त्याचा आताच्या परिस्थितीशी संबंध जोडून चित्रपट प्रदर्शन रोखणे हे चित्रपटसृष्टीच्या हिताचे नाही.
- एस. एस. राजामौली, दिग्दर्शक

बंगळूर - कावेरी खोऱ्यातील पाणीवाटपावरून कर्नाटक व तमिळनाडूत काही महिन्यांपासून संघर्ष सुरू आहे. त्यावरून अजून एक नवा वाद या दोन राज्यांमध्ये निर्माण झाला आहे. या वादाचे कारण बाहुबलीत "कटप्पा'ची भूमिका साकारणारे तमिळ अभिनेते सत्यराज हे आहेत. त्यांच्या निषेधार्थ "बाहुबली - द कन्क्‍लुजन' या चित्रपटाचे येत्या 28 रोजी कर्नाटकमध्ये होणारे प्रदर्शन रोखण्यासाठी आमदार वटल नागराज यांच्या नेतृत्वाखालील कर्नाटकवादी संघटनांनी या दिवशी राज्यात "बंद' पाळण्याचा निर्णय घेतला आहे.

सत्यराज यांनी नऊ वर्षांपूर्वी केलेल्या विधानाची चित्रफीत गेल्या महिन्यात सोशल मीडियावर व्हायरल झाली. सत्यराज यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून "बंद'चे आवाहन केले आहे. चित्रपट प्रदर्शनाच्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत संपूर्ण बंगळूर शहर बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबत पत्रकार परिषदेत बोलताना नागराज म्हणाले, ""आमचा रोष "बाहुबली' चित्रपटावर नाही, तर सत्यराज यांच्यावर आहे. त्यांनी कन्नड नागरिक व कन्नड नेत्यांविषयी अपमानास्पद विधाने केली आहेत. याबद्दल त्यांनी जनतेची माफी मागितली तरच "बाहुबली-2' कर्नाटकात दाखविण्यास परवानगी देऊ.'' कर्नाटक रक्षा वेदिका या संघटनेच्या कार्यकर्त्यांनीही आज कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सच्या बंगळूरमधील कार्यालयासमोर निदर्शने केली.

कावेरी नदीबद्दल वादग्रस्त विधाने
सत्यराज यांनी केलेल्या विधानाबाबत बोलताना वटल नागराज म्हणाले, की ज्या कावेरी नदीला आम्ही मातेसमान मानतो तिची तुलना सत्यराज यांनी त्यांच्या पत्नीशी करून अवमानकारक विधाने केली. त्यांनी माझा व अन्य कार्यकर्त्यांचा, तसेच कन्नड नागरिकांचाच अपमान केला आहे. या कार्यक्रमावेळी रजनीकांत, कमल हसन असे ज्येष्ठ अभिनेते व्यासपीठावर उपस्थित असताना सत्यराज यांनी अत्यंत तिरस्कारपूर्ण भाषण केले.

चित्रपट वितरण संघटना नाराज
"बाहुबली-2'चे हक्क कोणत्याही स्थानिक वितरकांना विकलेले नाहीत. निर्मात्यांकडूनच तो प्रदर्शित करण्याच्या निर्णयाला अनेक चित्रपट वितरण संघटनांनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळे कर्नाटकमधील एकाही चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित करू नये, असे लेखी पत्र संघटनांनी चित्रपटगृहमालकांना पाठविले आहे.

सत्यराज यांनी नऊ वर्षांपूर्वी संबंधित व्यक्तव्य केले असून, त्यानंतर आतापर्यंत त्यांची भूमिका असले 30पेक्षा अधिक चित्रपट कर्नाटकात प्रदर्शित झाले आहेत. ते त्यांचे वैयक्तिक मत असून, त्याचा आताच्या परिस्थितीशी संबंध जोडून चित्रपट प्रदर्शन रोखणे हे चित्रपटसृष्टीच्या हिताचे नाही.
- एस. एस. राजामौली, दिग्दर्शक

Web Title: Kannada Group Holds Protest Against Baahubali Actor Sathyaraj