'द काश्मीर फाइल्स'च्या लाइन प्रोड्युसरची आत्महत्या; अनुपम खेर हळहळले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sarahana and anupam kher

'द काश्मीर फाइल्स'च्या लाइन प्रोड्युसरची आत्महत्या; अनुपम खेर हळहळले

'द काश्मीर फाइल्स' The Kashmir Files या चित्रपटाच्या टीममध्ये काम केलेली लाइन प्रोड्युसर सराहना Sarahana हिने आत्महत्या केली. सराहनाच्या मृत्यूवर चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात असून ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर Anupam Kher यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. तरुणाईला नैराश्याने ग्रासल्याचं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलंय. 'द काश्मीर फाइल्स'मध्ये अनुपम खेर यांनी भूमिका साकारली होती. त्यावेळी त्यांचा सराहनासोबत संपर्क आला होता. सराहनाच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. (Kashmir Files line producer Sarahna dies by suicide Anupam Kher cites depression)

सराहनाचा फोटो पोस्ट करत अनुपम खेर यांनी लिहिलं, 'ही सराहना आहे. मी काश्मीर फाइल्स या चित्रपटासाठी देहरादून आणि मसूरी याठिकाणी शूटिंग करत असताना ती लाइन प्रोड्युसर म्हणून काम करत होती. गेल्या वर्षी २२ डिसेंबर रोजी चित्रपटाच्या युनिटने तिचा वाढदिवस साजरा केला होता. शूटिंग संपल्यानंतर लॉकडाउनमुळे ती तिच्या घरी अलिगढला परतली होती. ती अत्यंत हुशार, मदतीस धावून येणारी आणि कामात चोख असणारी मुलगी होती. माझ्या आईच्या वाढदिवसानिमित्त तिने शुभेच्छा देण्यासाठी मला मेसेज केला होता. त्यावेळी मी तिला कॉल केला आणि आईने तिला आशीर्वाद दिल्याचं सांगितलं. तेव्हा फोनवर बोलतानाही ती खूप चांगली होती आणि आज मला तिच्या फोनवरून हा मेसेज (चौथा फोटो) मिळाला. ते वाचून मला धक्काच बसला. तिच्या आईशी माझं बोलणं झालं. तरुणाईला नैराश्याचा सर्वाधिक फटका बसतोय. हे खरंच खूप दु:खदायक आहे.'

'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि लेखन विवेक अग्निहोत्री यांनी केलं. गेल्या वर्षी या चित्रपटाची शूटिंग देहरादून आणि मसूरी याठिकाणी पार पडली. काश्मिरी पंडितांच्याभोवती या चित्रपटाचं कथानक फिरतं.

टॅग्स :Entertainmentanupam kher