
केबीसीमध्ये येणा-या स्पर्धकांना अनेकदा अवघड प्रश्नांना सामोरे जावे लागते.
मुंबई - देनेवाला जब भी देता, देता छप्पर फाड के असे म्हटले जाते. कौन बनेगा करोडपती हा शो असा आहे ज्यात अनेकांनी आपले नशीब आजमावले आहे. या शो चे वैशिष्ट्य म्हणजे त्यात नशीबाबरोबरच तुमच्याकडे सामान्यज्ञान भरपूर हवे. अनेकदा साध्या प्रश्नांची उत्तरेही न देता आलेल्यांना लाखो रुपये गमावल्याची उदाहरणे समोर आहेत. सध्या टेलिव्हिजनवर केबीसीचा 12 वा सीझन सुरु आहे. त्यातील गंमतीशीर प्रसंगामुळे हा शो कमालीचा लोकप्रिय झाला आहे.
केबीसीमध्ये येणा-या स्पर्धकांना अनेकदा अवघड प्रश्नांना सामोरे जावे लागते. त्यात ब-याचवेळा नशीबावर हवाला ठेवून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे बरोबर आली आहेत. दुसरीकडे अतिआत्मविश्वासाच्या जोरावर साध्या प्रश्नांना उत्तरे देता न आल्याने खेळ सोडावा लागलेल्या स्पर्धकांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे गेल्या 12 वर्षांपासून हा शो होस्ट करत आहे. त्यांच्या आगळ्या वेगळ्या निवेदन शैलीमुळे या कार्यक्रमाची उंची वाढली आहे.
क्रिकेट हा भारतीय मनासाठी जीव की प्राण आहे. त्याविषयी घडणा-या अनेक चालु घडामोंडीविषयी लहानांपासून मोठ्यांपर्यत सर्वांना माहिती असते. सोमवारी झालेल्या कौन बनेगा करोडपतीच्या एका भागात उत्तराखंड मधील पंचनगर भागात राहणारे अमन कुमार हे सहभागी झाले होते. हॉट सीटवर बसलेल्या अमन यांनी सुरुवातीला सावधगिरीनं खेळत 6 लाख 40 हजार रुपये जिंकले. त्यानंतर विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावर त्यांची गाडी अडखळली. तो प्रश्न क्रिकेटविषयक होता. त्या प्रश्नाचे उत्तर त्यांना माहिती नव्हते. मदतीसाठी अमन यांच्याकडे कुठलीही लाईफ लाईन शिल्लक नव्हती. त्यामुळे त्यांनी कुठलीही रिस्क न घेता गेम सोडण्याचा निर्णय घेतला. अशाप्रकारे त्यांना 12 लाख 50 हजारावर पाणी सोडावे लागले.
हे ही वाचा: विकी कौशलच्या 'अश्वत्थामा' सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज होताच झाला व्हायरल
अमन यांना विचारण्यात आलेला प्रश्न असा होता, टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये हॅट्रिक घेणारा पहिला भारतीय खेळाडू कुठला, त्यासाठी त्यांना 1. दिपक चाहर 2. यजुवेंद्र चहल, 3. जसप्रीत बुमराह, 4. खलील अहमद असे चार पर्याय देण्यात आले होते. त्यांना त्याचे उत्तर काही आले नाही. सोनी वाहिनीनं अमन कुमार यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केला आहे. त्यात एका सर्वसामान्य परिवारातून आलेले अमन कुमार कशाप्रकारे जीवन व्यतीत करत आहे हे दाखविण्यात आले आहे.