Khari Biscuit Review : निरागस प्रेमाची हळवी गोष्ट

संतोष भिंगार्डे
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

Khari Biscuit Review : मराठी चित्रपटसृष्टीत वेगवेगळे विषय हाताळले जात आहेत आणि अशा चांगल्या विषयांचे प्रेक्षक स्वागत करीत आहेत. दिग्दर्शक संजय जाधवचा "खारी बिस्कीट' हा चित्रपटदेखील वेगळा विषय घेऊन आला आहे.

मराठी चित्रपटसृष्टीत वेगवेगळे विषय हाताळले जात आहेत आणि अशा चांगल्या विषयांचे प्रेक्षक स्वागत करीत आहेत. दिग्दर्शक संजय जाधवचा "खारी बिस्कीट' हा चित्रपटदेखील वेगळा विषय घेऊन आला आहे. खरे तर या चित्रपटाचे शीर्षक ऐकल्यानंतर नेमके यामध्ये काय असेल, याची उत्सुकता होती. कथेचा प्लॉट छोटा असला तरी दिग्दर्शक संजय जाधवने ही कथा पडद्यावर उत्तमरीत्या मांडली आहे. चित्रपटाच्या सरळ-साध्या कथेला सचिन मोटे यांनी पटकथेची उत्तम फोडणी दिली आहे. त्यामुळे चित्रपट नक्कीच खिळवून ठेवतो. बहीण आणि भावाच्या प्रेमळ आणि हळव्या नात्याची कथा हसतखेळत मांडण्यात आली आहे. 

बिस्कीट (आदर्श कदम) आणि खारी (वेदश्री खाडिलकर) हे दोघे भाऊ-बहीण. खारी पाचेक वर्षांची; तर बिस्कीट नऊ वर्षांचा. लहान असतानाच आई-वडिलांचे छत्र हरपलेले. त्यामुळे खारीसाठी बिस्कीट आणि बिस्कीटसाठी खारी जीव की प्राण. त्यांची परिस्थिती खूपच हलाखीची-गरिबीची. रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झोपडपट्टीत ते राहत असतात. खारी आपल्या डोळ्यांनी हे जग पाहू शकत नाही. मात्र ती स्वप्नं पाहत असते आणि आपल्या बहिणीच्या स्वप्नात रंग भरण्याचे काम तिचा भाऊ बिस्कीट करीत असतो. कारण तोच तिचा माता-पिता... तिचे डोळे सबकुछ असतो. हातावरच्या फोडाप्रमाणे तिला जपत असतो. खारीने एखादे स्वप्न पाहावे आणि त्याने ते पूर्ण करावे. एक दिवस खारी शाहरूखला भेटण्याचे स्वप्न पाहते आणि एक दिवस चक्क वर्ल्डकप पाहण्याचे स्वप्न पाहते. सन 2011 मध्ये झालेला भारत आणि श्रीलंकादरम्यानचा अंतिम सामना पाहण्याचे तिचे स्वप्न असते. मग तिची ही स्वप्ने पूर्ण करण्यासाठी बिस्कीट कोणत्या आणि कशा खटपटी आणि लटपटी करतो हे चित्रपटामध्ये पाहिलेले बरे. 
"झी स्टुडिओज्‌'ची ही निर्मिती आहे. दिग्दर्शक संजय जाधव आहे. त्याने आतापर्यंत वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट आणलेले आहेत. एक सिनेमॅटोग्राफर ते दिग्दर्शक असा यशस्वी प्रवास त्याने केला आहे. आपल्या बहिणीवर जीवापाड प्रेम करणाऱ्या भावाची भूमिका आदर्श कदम या मुलाने झकास साकारली आहे. त्याला उत्तम साथ वेदश्री खाडिलकरची लाभली आहे. या दोघांमधील नाते दिग्दर्शकाने उत्तम टिपले आहे.

खरे तर लहान मुलांकडून अभिनय करून घेणे... त्यांचा मूड आणि आवड-निवड सांभाळणे खूप कठीण काम असते. परंतु दिग्दर्शकाने त्यांच्याकडून उत्तम काम काढून घेतले आहे. आदर्श कदम, वेदश्री खाडिलकर यांनीही कमालीची मेहनत घेतली आहे. चेहऱ्यावरील भोळेभाबडे आणि निरागस भाव त्यांनी उत्तम सादर केले आहेत. वेदश्रीचे चुणचुणीत आणि खणखणीत बोलणे व्वा छानच. संजय नार्वेकर, सुशांत शेलार, नंदिता धुरी-पाटकर, सुयश झुंझुरके यांच्यासह अनेकांनी छोट्या भूमिकेतूनही आपली मोलाची कामगिरी केली आहे. त्यांनीही आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली आहे. चित्रपटाचे संगीत कथेला अनुसरूनच आहे. त्याबद्दल संगीतकार अमितराज, सायली खरे आणि सूरज-धीरज यांचे कौतुक करावेच लागेल. मृदुल सेन यांचे कॅमेरावर्क उत्तम. एकूणच बहीण आणि भावाच्या हळूवार आणि प्रेमळ नात्याची ही कहाणी आहे. 

चार स्टार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Khari Biscuit Review