
किरण माने : आता यांना ठेचून काढायला हवं.. केतकी सारख्या विकृत लोकांनी..
अभिनेता किरण माने (kiran mane) हे आता केवळ मराठीच नाही तर अवघ्या मनोरंजन विश्वला ठाऊक असलेले अभिनेते आहेत. त्यांचे 'मालिका' प्रकरण जितके गाजले तितक्याच त्यांच्या पोस्टही व्हायरल होत असतात. सतत नव्या विषयावर अत्यंत धिटाईने ते लिहीत असतात. किंवा केंद्र सरकारला धारेवर धरणारी विधाने करत असतात. कधी कला क्षेत्रातील बड्या मंडळींसोबत फोटो शेअर करून ते आपल्या आठवणी सांगतात तर कधी नुतक्याच घडून गेलेल्या घटनेवर भाष्य करतात. असेच भाष्य त्यांनी आज केतकी चितळे बाबत केले आहे. केवळ केतकीच नाही तर मनोरंजन विश्वात तिच्यासारखे असे अनेक विकृत भरलेत असे खळबळजनक विधान त्यांनी केले आहे. (kiran mane on ketali chitale)
हेही वाचा: 'विखारी आकसापोटी गरळ ओकण्याआधी..' अमोल कोल्हे यांचा केतकी चितळेला सल्ला
केतकी चितळेने (ketaki chitale) दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्यावर मर्यादा ओलांडून टीका केली होती. केतकीने 'तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक.. अशी कविता पोस्ट केली होती. नितीन भावे नावाच्या व्यक्तीच्या नावाने लिहिलेली ही कविता तिने पोस्ट केली. यातील मजकूर अत्यंत आक्षेपार्ह असल्याने केतकीवर गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या तिला पोलिसांनी अटक केली असली तरी समाजातील विविध स्तरातून तिच्यावर टीका होत आहे. यात आता किरण माने यांनी तर तिला विकृत म्हंटल आहे. (ketaki chitale arrested )
हेही वाचा: 'चितळेंची फक्त बाकरवाडी, केतकी तर..' राष्ट्रवादीच्या या नेत्याची गंभीर टीका
ते म्हणतात, 'केतकी चितळेची पोस्ट सगळ्यांनी वाचली असेलच. आता तुम्हाला सांगू इच्छीतो, अशा विकृत लोकांनी खच्चून भरलेल्या क्षेत्रात आम्ही करीयर करतोय. तुम्हाला ही प्रवृत्ती नविन असेल, आम्ही कित्येक वर्ष भोगतोय. विशेषत: जातवर्चस्ववादी विचारसरणीच्या केतकीसारख्या अनेक अभिनेत्री उन्माद आणि उच्छादाचा कळस करतात. मी स्वत: अशा दोन अभिनेत्रींचा जवळून अनुभव घेतलाय. त्यांच्या उन्मादानं बोलण्याला आपण विरोध केला की 'लेडीज कार्ड' खेळून 'गैरवर्तना'चे खोटे आरोप करतात. माझ्यासमोर एकदा एका अभिनेत्रीने एका थोर महामानवाविषयी अपशब्द वापरले होते. मी तात्काळ विरोध केला. तो राग मनात ठेवून त्या जातवर्चस्ववादी अभिनेत्रीने मनूवादी कलाकारांचा 'गट' जमवला..हळूहळू कुरबूरी सुरू केल्या.. आणि... असो. बात निकलेगी तो दूSर तलक जायेगी.'
पुढे ते म्हणतात, 'अशा विकृतांच्या अनेक हिडीस घटना, बेताल-बिभत्स वागणे आमच्या अख्ख्या युनिटने पाहिलेले आहे. पण अशा गोष्टी उघड करून कुणा भगिनीच्या चारीत्र्यावर चिखलफेक करणं ही आपली संस्कृती नाही. पण त्याचवेळी केवळ आपल्या विरोधी विचारसरणीचे आहेत म्हणून, नेत्यांपासून महामानवांबद्दल त्यांनी केलेले अर्वाच्य, घृणास्पद बोलणे सहन नाही करू शकत.'
'...असह्य होऊन आपण बंड करून उठलो, तर त्याच अभिनेत्री नंतर पुरोगामी विचारांच्या नेत्यांचे, खासदारांचे कान भरून 'उलट्या बोंबा' कशा मारतात आणि आपले नेते त्यांची बाजू कशी घेतात, ते ही मी 'याची देही याची डोळा ' पाहीलेय. मी भक्कम आहे. कुणाचा मिंधा नाही. पोटासाठी लाचार होणारा नाही. म्हणून पुरून उरलोय या विकृतांना. बाकी कलाकारांची काय घुसमट होत असेल कोण जाणे. सविस्तर लिहीणार आहे योग्य वेळी.' असेही ते म्हणाले आहेत.
'आधी कुजबूज स्वरूपात अशा वल्गना चालायच्या...गेल्या पाचसहा वर्षांत सेटवर मोठ्या आवाजात उघडपणे सुरू झाल्या.. आता पोस्ट करण्यापर्यन्त मजलगेली ! त्यामुळे ही प्रवृत्ती आता ठेचायची वेळ आली आहे.' अशा तीव्र शब्दात त्यांनी या घटनेचा समाचार घेतला आहे.
'असो. आज छ. संभाजी महाराज जयंती ! 'बुधभूषण' या ग्रंथात छ. संभाजी महाराज म्हणतात, "आपण एखाद्याच्या घरी गेलो आणि घरातला पुरूष घरात नसेल, तर त्या घराचा उंबराही ओलांडू नये." ..याला म्हणतात संस्कार ! तरीही मनूवाद्यांनी शंभूराजांना महिलांविषयी वर्तनाचे खोटे आरोप ठेवून बदनाम केले.. पण काळाच्या ओघात वर्चस्ववाद्यांचे कारस्थान भेदून राजेंचे स्वच्छ, नितळ, निर्मळ चारीत्र्य लखलखून वर आले. स्वत: सततच्या लढायांमध्ये गुंतलेले असताना शंभूराजेंनी रायगडाचा मुलकी व्यवहार महाराणी येसूबाईंच्या हाती सोपवला होता. महिलेला पंतप्रधानपद देणारा पहिला राज्यकर्ता ! एवढेच नव्हे, तर त्यांनी येसूबाईंची मुद्रा चलनी नाण्यावर छापली होती.. साडेतीनशे वर्षांपूर्वी महिलेला हा सन्मान देणार्या महापराक्रमी महापुत्राला विनम्र अभिवादन !!! अशी खळबळजनक पोस्ट किरण माने यांनी केली आहे.
Web Title: Kiran Mane Comment On Ketaki Chitale Controversial Post
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..