Jawan: "कर्जाच्या ओझ्यानं दबून शेतकरी आत्महत्या करतात, तर दूसरीकडे.." जवान पाहून किरण मानेंची पोस्ट व्हायरल

Kiran Mane News: किरण मानेंनी जवान पाहून परखड आणि स्पष्टपण स्वतःच्या भावना शेअर केल्या
kiran mane post on jawan shah rukh khan viral after watch movie jawan
kiran mane post on jawan shah rukh khan viral after watch movie jawanSAKAL

किरण माने हे मराठी मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेते. किरण माने शाहरुख खानचे जबरदस्त फॅन आहेत. जवान रिलीज झाल्यापासुनच किरण माने शाहरुख बद्दल अनेक पोस्ट शेअर करत आहेत. आता नुकतंच किरण मानेंनी जवान पाहून एक खास पोस्ट लिहीलंय.

किरण माने लिहीतात, "..आजच्या भवतालात अशा 'मसीहा'ची गरजय. बच्चनही 'बच्चन' राहिला नाही. ती कमी शाहरूखनं भरुन काढली. सर्वसामान्य प्रेक्षकांना जातपात, धर्म वगैरेंशी काहीही घेणंदेणं नाय. त्यांना रोजच्या जगण्याची भ्रांत पडलीय.

तीस-चाळीस हजारांच्या कर्जाच्या ओझ्यानं दबून शेतकरी आत्महत्या करतात, तर दूसरीकडं बड्या उद्योगपतींचं चाळीस हजार कोटींचं कर्ज माफ होतं.

(kiran mane post on jawan shah rukh khan)

kiran mane post on jawan shah rukh khan viral after watch movie jawan
Jawan in Kashmir: अतिरेकी भाग म्हणुन ओळखला जाणाऱ्या जम्मूमधील हंदवारा हॉलमध्ये होणार स्पेशल स्क्रिनींग

किरण माने जवान बद्दल पुढे सांगतात, "सरकारी हाॅस्पीटल्समध्ये सुविधांच्या अभावापोटी असंख्य चिमुरड्यांपास्नं वयोवृद्धांपर्यन्त किड्यामुंगीसारखे मरतायत.

महागाई, बेरोजगारी वाढतच चाललीय. बाॅर्डरवर उभ्या असलेल्या सैनिकांच्या हातातही अतिशय निकृष्ट दर्जाच्या रायफली असतात. नवनविन सरकारं आपण निवडून देतो, पन निवडणुकांमध्ये जी आश्वासनं दिली जातात, त्यांना नंतर हरताळ फासला जातो.

...अशा परिस्थितीत 'जवान'नं सगळ्या भारतीयांच्या मनोरंजनासोबतच, मनात खदखदत असणार्‍या गोष्टींना वाचा फोडली आहे... खर्‍या समस्या सोडवून 'न्याय' पण मिळवून दिला आहे.

सिनेमात का होईना 'काला धन' परत मिळवून गोरगरीबांच्या खात्यात जमा करण्यापास्नं लोकप्रतिनिधी, मंत्र्यासंत्र्यांना गुडघ्यावर आणून अत्यावश्यक सेवांबद्दल जाब विचारण्यापर्यन्त सगळं-सग्ग्गळं केलं त्यानं."

किरण माने पुढे लिहीतात, "पुर्वीच्या काळी अशा आशयाचे अनेक सिनेमे येऊन गेलेत. पण आज हे मांडणं लै लै लै धाडसाचं आणि गरजेचं आहे. त्याकाळात मुभा होती. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुल्यांची जपणूक होती.

'बायकाॅट ट्रेंड' नव्हता. त्यामुळं आज 'खर्‍याखुर्‍या' समस्यांवर परखडपणे बोलून वास्तवाचं भान देणार्‍या मनोरंजक फॅंटसीची लै लै लै गरज होती. प्रेक्षकांनी अक्षरश: दिवाळी-दसरा असल्यागत ही गोष्ट साजरी केली.

मनोरंजन करण्याबरोबर समाजभान असणारे कलावंत आज दुर्मिळ झाले आहेत. व्यवस्थेपुढं लोटांगण घालणार्‍या पायचाटू, लाळघोट्या सुमार कलावंतांची सद्दी आहे. त्यांच्या मुस्काडीत मारून पाठीचा कणा ताठ ठेवत, डोळ्यांत अंगार घेवून, फूल्ल ऑफ स्वॅगनं शाहरूख आलाय..."

किरण माने शेवटी लिहीतात, "लै दिसांनी थिएटरमध्ये हिरोच्या एन्ट्रीला टाळ्या,शिट्ट्यांचा छप्परतोड दनका अनुभवला. लै दिसांनी "बेटे को हाथ लगाने से पहले..." सारख्या डायलाॅगला प्रेक्षकांनी जल्लोष केलेला पाहिला. लै दिसांनी आमचा खराखुरा 'हिरो' आम्हाला दिसला !

आनंदाचे डोही आनंद तरंग घेऊन थिएटरबाहेर पडलो. बाहेर पडतानाबी लोकांना घरी जायची घाई नव्हती. मन भरलं नव्हतं. जाता-जाता शाहरूखच्या पोस्टर समोर सेल्फी काढायला रांग लागली होती. मी बी त्यात सामील झालो... कारण आम्हा सर्वांना तीन तासात 'पोएटिक जस्टीस' मिळाला होता !

लब्यू ॲटली...आणि शारख्या, तुला घट्ट घट्ट मिठी !" अशी पोस्ट करत किरण मानेंनी शाहरुखच्या जवानचं कौतुक केलंय.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com